Exclusive : एस्.टी. महामंडळाच्या ३० बसस्थानकांवर ‘बी.ओ.टी.’ तत्त्वावर गाळे बांधणार !

मुंबई, १४ नोव्हेंबर (वार्ता.) – राज्य परिवहन महामंडळाच्या (’एस्.टी.’च्या) उत्पनात वाढ व्हावी, यासाठी राज्यातील ३० बसस्थानकांवर व्यावसायिक गाळे बांधून ते ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बी.ओ.टी.) या तत्त्वावर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय एस्.टी. महामंडळाने घेतला. यासाठी सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात येणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही होईल, अशी माहिती एस्.टी. महामंडळाच्या एका अधिकर्‍याने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.

‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर जी बसस्थानके देण्यात येणार आहेत, त्या बसस्थानकांची प्रथम सल्लागार समितीकडून पहाणी करण्यात येणार आहे. यामध्ये बसस्थानकांवर गाळे बांधण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे ना ?, याची प्रामुख्याने पहाणी केली जाणार आहे. या पहाणीनंतर सल्लागार समिती एस्.टी. महामंडळाला अहवाल सादर करणार आहे. यामध्ये एस्.टी. महामंडळ आणि कंत्राटदार यांना किती टक्के आर्थिक लाभ होईल ? याचाही अभ्यास केला जाणार आहे. प्रस्ताव संमत झालेल्या बसस्थानकांवर ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ तत्त्वावर देण्यासाठी किती मजली इमारत उभारावी ? त्यामध्ये किती गाळे द्यावेत ? भाड्याची रक्कम किती असावी ? हा अभ्यास करून मगच बसस्थानकांवर इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. या कामासाठी निविदा काढल्या जाणार आहेत. हे गाळे ३० वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात येणार आहेत. भविष्यात आणखीही काही बसस्थानके ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर देता येतील, अशी माहिती या अधिकार्‍यांनी दिली.

सरकार आणि प्रशासन यांकडून विलंब !

एस्.टी. महामंडळाची बसस्थानके तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी अगदी मोक्याच्या ठिकाणी आहेत. बसस्थानकांवर इमारत बांधून त्यातील गाळे ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर देण्याचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वीच सिद्ध करण्यात आला होता; मात्र यावर प्रत्यक्ष कारवाई होण्यास विलंब केला जात आहे. एस्.टी. महामंडळाची आर्थिक स्थिती डबघाईला असतांना खरतर याविषयी जलदगतीने कार्यवाही होणे अपेक्षित होते. त्यामुळे इतक्या वर्षांत एस्.टी. महामंडळाला मोठा आर्थिक लाभ झाला असता; परंतु एस्.टी. महामंडळ यांच्याकडून या कामाला विलंब झाला. यामुळे एकप्रकारे एस्.टी.ची आर्थिक हानी झाली आहे.