Diwali : सुख, आरोग्‍य आणि समाधान मुक्‍तहस्‍ते प्रदान करणारी अन् अतिप्राचीन असलेली औदार्यशील दिवाळी !

१. दीपावलीचा प्राचीन इतिहास !

‘दीपावली हा पुष्‍कळ प्राचीन सण आहे. अतिप्राचीन काळापासून तो साजरा केला जातो. वेदांमध्‍ये या सणाचा उल्लेख आढळतो. वात्‍स्‍यायनाच्‍या ‘कामसूत्रा’मध्‍ये याचा उल्लेख आढळतो. हा दीपोत्‍सव ‘दीपालिका’, म्‍हणजे दिवाळीचाच उत्‍सव मानला जात असे. हर्षाच्‍या ‘नागानंद’ नाटकात ‘दीप प्रतिपद-उत्‍सवा’चे वर्णन येते. काश्‍मीरमधील ‘नीलमत पुराण’ या ग्रंथात ‘दीपमाला उत्‍सव’ कशा तर्‍हेने साजरा केला जायचा, त्‍याचे वर्णन आहे. सोमदेव सुरी या जैन ग्रंथकाराने आपल्‍या ‘यशस्‍तिलक चंपू’ या गद्यकाव्‍यात मालखेडच्‍या राष्‍ट्रकुट राजाच्‍या काळातील दीपावली उत्‍सवाचे वर्णन केले आहे. वर्ष १२९२ मध्‍ये लिहिलेल्‍या ‘रुक्‍मिणी स्‍वयंवर’ या ग्रंथात कवी नरेंद्राने विदर्भातील दीपावलीचे रसभरीत वर्णन केले आहे. महानुभाव पंथियांच्‍या ‘लीळाचरित्रात’ चक्रधर स्‍वामींची शिष्‍या महदांबाने त्‍या काळी साजर्‍या केल्‍या जाणार्‍या दीपावली उत्‍सवाचे फार सुरेख वर्णन केले आहे. ‘ऐने अकबरी’ या पर्शियन ग्रंथात देहलीतील मोगलकालीन दीपावलीचे वर्णन आढळते. सारांश दीपावलीचा इतिहास पुष्‍कळच विस्‍तृत आहे. अनेक प्राचीन ग्रंथात ‘दीपावली’चे शेकडो संदर्भ पहावयास मिळतात.

२. औदार्यशील दिवाळी !

दिवाळी ही आनंदाची लयलूट, भारतीय संस्‍कृतीची जोपासना करणारी, पूर्वपरंपरांचे संवर्धन करणारी, आबालवृद्धांना आपल्‍या आगमनाची प्रतीक्षा करावयास लावणारी, तसेच अज्ञान, मोह यांच्‍या अंधःकारातून ज्ञानमय प्रकाशात वाटचाल करणारी आहे. ‘देव रंगारी रंगारी । त्रिभुवनाचा रंग करी ।’, हे सत्‍य अनुभवाला आणून देणारी दीपावली. प्रकाश, ज्ञान, समता, एकता, माणुसकी, विश्‍वबंधुत्‍व यांचे दर्शन घडवणारी दीपावली. दुःख आणि दारिद्य्र यांचे निर्मूलन करून सुख, समृद्धी, आरोग्‍य, शांती, समाधान मुक्‍तहस्‍ते प्रदान करणारी औदार्यशील दिवाळी !

३. कलावंताच्‍या कलेचे मनोज्ञ दर्शन करवणारी दिवाळी !

पाककला, हस्‍तकला, चित्रकला, रांगोळीकला अशा अनेक कलांना दीपावलीत पुष्‍कळच वाव मिळतो. दिवाळी चालू होण्‍यापूर्वी १५ दिवस अगोदर दिवाळीच्‍या फराळाची सिद्धता चालू केली जाते. विभक्‍त कुटुंबपद्धतीत माणसे मिळत नसल्‍यामुळे सिद्ध केलेल्‍या फराळावर लोक समाधान मानतात. बाजारात चकल्‍या, करंज्‍या, लाडू यांची सजलेली ताटे दिवाळीच्‍या दिवसात दिसू लागतात. दीपावली म्‍हणजे पंचेंद्रियांची तृप्‍ती, विविध प्रकारचा फराळ खाऊन रसना तृप्‍त होते. आकाशकंदील, विविध प्रकारच्‍या रांगोळ्‍या, घरादाराची रंगरंगोटी, नव्‍या खरेदीतील पोशाख-वैविध्‍य हे सारे नयनतृप्‍ती देतात.

दीपावलीच्‍या दिवसात मुले किल्ले बनवतात. समुद्रकिनारी वाळूच्‍या किल्‍ल्‍यांसमवेतच वाळूशिल्‍पे आकार घेतात, ती नयनसुख देतात. आकाशदिवे सिद्ध करणारे कलावंत आपली कला पणाला लावून विविध तर्‍हेचे आकाशदिवे सिद्ध करतात. दीपावलीच्‍या शुभेच्‍छा देणारी शुभेच्‍छापत्रे कलावंताच्‍या कलेचे मनोज्ञ दर्शन घडवतात. दिवाळीत रंगभूषा, वेशभूषा, केशभूषा या सर्वच कलांना वाव मिळतो. दिवाळीला प्रकाशित होणारे सहस्रो दिवाळी अंक, म्‍हणजे बौद्धिक मेजवानी असते.

४. स्नेहबंध दृढ करणारी दीपावली !

दीपावली नातेसंबंध जोपासते. बहीण, भाऊ, आजोबा-आजी आणि नातवंडे, पती अन् पत्नी, शेजारी, मित्रपरिवार यांचे प्रेमसंबंध, स्नेहबंध दृढ करण्‍याचे काम दीपावली करते. श्रमप्रधान आणि कृषीप्रधान संस्‍कृतीत दीपावली थकल्‍या भागल्‍या मनाला बहुआयामी आनंद बहाल करते; म्‍हणूनच ‘दिवाळी सण मोठा । नाही आनंदाला तोटा ।’, असे म्‍हणतात.

–  प्रा. रवींद्र धामापूरकर, मालवण, जिल्‍हा सिंधुदुर्ग.

(साभार : ‘आदिमाता’, दीपावली विशेषांक २०११)