वेद, उपनिषदे आणि भारतीय जीवनपद्धत यांविषयी पाश्‍चात्त्य विचारवंतांचे कौतुकोद़्‍गार !

सध्‍या आपल्‍या जीवनावर पाश्‍चात्त्य जीवनपद्धतीचा प्रचंड प्रभाव जाणवतो. आपण आपल्‍या जीवनपद्धतीला पोषक नसलेल्‍या अनेक पाश्‍चात्त्य गोष्‍टी डोळे बंद करून स्‍वीकारल्‍या आहेत. त्‍यामुळे आपण आपली संस्‍कृती आणि जीवनपद्धत यांची हानी केली आहे. ‘जे जे पाश्‍चात्त्यांकडून आले, ते ते उत्तम आहे’, असा आपला ग्रह झाला आहे. यामागचे खरे कारण, म्‍हणजे आपली मानसिक आणि बौद्धिक गुलामगिरी होय ! ‘देश स्‍वतंत्र झाला; पण मानसिक आणि बौद्धिक गुलामगिरीतून आपण स्‍वतंत्र झालो आहोत’, असे म्‍हणता येत नाही.

१. घटस्‍फोट ही भारतीय जीवनपद्धतीला छेद देणारी पद्धत !

आपल्‍या देशात घटस्‍फोटाचा निर्बंध (कायदा) अस्‍तित्‍वात आला. तो आपल्‍या जीवनपद्धतीला हानीकारक असूनही आपण त्‍याचा स्‍वीकार केला. त्‍याला आपण कोणत्‍याही प्रकारे विरोध केला नाही. तथापि आपल्‍या मनावर हे ठसवण्‍यात आले नाही की, घटस्‍फोटाचा कायदा अस्‍तित्‍वात आला असला, तरी तो हिंदूंनी हिंदु संस्‍कृती आणि भारतीय जीवनपद्धत यांना हानिकारक आहे; म्‍हणून त्‍याचा कधीही आधार घ्‍यायचा नाही किंवा त्‍याचा उपयोग करायचा नाही. जर या कायद्याचा उपयोग केला, तर आपली विवाह संस्‍था उद़्‍ध्‍वस्‍त होईल. सध्‍या देशात घटस्‍फोटांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, हे चिंतेचे आहे.

‘विवाह ७ जन्‍मांचे बंधन आहे’, अशी आपली भारतीय जीवनपद्धत सांगते. आपल्‍या जीवनपद्धतीला छेद देणारी घटस्‍फोटाची पद्धत आपण स्‍वीकारली. विवाह हा संस्‍कार असून पाश्‍चात्त्यांप्रमाणे तो करार नाही. अग्‍नि, देव आणि ब्राह्मण यांना साक्षी ठेवून पती-पत्नीने ‘७ जन्‍म परस्‍परांची साथ सोडायची नाही’, अशी शपथ घेतलेली असते. घटस्‍फोटाच्‍या या कायद्याने या वचनाचे स्‍मरण राहू दिले नाही. ‘विवाह करार नाही’, या गोष्‍टीचाही आपल्‍याला विसर पडला. त्‍यात ‘लिव्‍ह इन रिलेशनशिप’चाही आपण स्‍वीकार करत आहोत. जगातील सर्व विद्वान आणि विचारवंत यांनी ‘भारतीय जीवनपद्धत सर्वश्रेष्‍ठ आहे’, असा गौरव केला आहे. त्‍याचेही आपल्‍याला भान राहिले नाही.

श्री. दुर्गेश परुळकर

२. भारतभूमीला पोषक ठरणार्‍या वानप्रस्‍थाश्रमाचे महत्त्व !

वास्‍तविक आपल्‍याकडे वानप्रस्‍थाश्रम ही संकल्‍पना अत्‍यंत जुनी आहे. एकत्र कुटुंबपद्धत किंवा गृहस्‍थाश्रम हा आपल्‍या सामाजिक आणि राष्‍ट्रीय जीवनाचा मूलाधार आहे. पाश्‍चात्त्य जीवनपद्धतीचा स्‍वीकार केल्‍यामुळे आपण या गोष्‍टींकडे लक्ष दिले नाही. परिणामी अनाथ आश्रम, वृद्धाश्रम अशा संस्‍था भारताच्‍या पवित्र भूमीत अस्‍तित्‍वात आल्‍या. भारतीय जीवनपद्धतीला अशा संस्‍थांचे अस्‍तित्‍व लांच्‍छनास्‍पद आहे, हेसुद्धा आपल्‍या ध्‍यानात येत नाही. इतके आपण पाश्‍चात्त्य जीवनपद्धत स्‍वीकारल्‍यामुळे बौद्धिक आणि मानसिक दृष्‍ट्या बधीर झालो आहोत. वानप्रस्‍थाश्रम स्‍वीकारलेल्‍या लोकांचे कार्य समाजाला सावरण्‍याचे आणि मार्गदर्शन करण्‍याचे आहे. अनुभवाने संपन्‍न असलेल्‍या ज्‍येष्‍ठ नागरिकांनी भारतीय संस्‍कृतीतील उच्‍च मूल्‍यांचे संरक्षण करण्‍यासाठी स्‍वतःचे जीवन व्‍यतित करायचे आहे. उगवत्‍या पिढीला योग्‍य मार्गदर्शन करून संपूर्ण जग सुसंस्‍कृत सुविधा करण्‍याची वेदांची उद़्‍घोषणा किती महत्त्वाची आहे, ते त्‍यांना पटवून देण्‍याचे महान कार्य ज्‍येष्‍ठ नागरिकांनी करायचे आहे. आज त्‍याचाही आपल्‍याला विसर पडला. भारतभूमीला पोषक ठरणारा वानप्रस्‍थाश्रम न स्‍वीकारता आपण वेगळ्‍याच मार्गाने वाटचाल करत आहोत.

३. पाश्‍चात्त्य जीवनपद्धत स्‍वीकारणे, हे बुद्धीहीनतेचे लक्षण !

आपण आपल्‍या संस्‍कृतीचा अभ्‍यास करणे केव्‍हाच सोडून दिले आहे. आपल्‍यालाच आपले वेद आणि उपनिषदे यांविषयी आवश्‍यक तेवढे सखोल ज्ञान नाही. परिणामी आज आपली जीवनपद्धत दिवसेंदिवस लयाला चालली आहे, हे जाणवते. संयम आणि सात्त्विकता यांना आपण कधीच सोडचिठ्ठी दिली आहे. आपण साजरे करत असलेले सण आणि उत्‍सव यांत सात्त्विकता अन् सज्‍जनता आढळत नाही. भक्‍तीभावाचा तिथे मागामूसही आढळत नाही. आपणच आपल्‍यातील हे दोष दूर करणे नितांत आवश्‍यक आहे, तसेच आपण आंधळेपणाने पाश्‍चात्त्य जीवनपद्धत स्‍वीकारली आहे. तिचा आपण सर्वस्‍वी त्‍याग करण्‍यास आरंभ केला पाहिजे. ‘आपली सर्वांत श्रेष्‍ठ असलेली जीवनपद्धत टाकून त्‍या तुलनेत अत्‍यंत दुय्‍यम असलेली जीवनपद्धत स्‍वीकारणे’, हे बुद्धीहीनतेचे लक्षण आहे.

४. पाश्‍चात्त्य विचारवंतांचे भारतीय जीवनपद्धतीविषयीचे कौतुकोद़्‍गार !

मी असे का म्‍हणतो, त्‍याचे कारण पाश्‍चात्त्य विचारवंतांच्‍या उद़्‍गारांमध्‍ये दडले आहे. त्‍यातील काही मोजक्‍याच पाश्‍चात्त्य विचारवंतांची मते वानगीदाखल आपल्‍यासमोर ठेवत आहे. हे वाचून आपण स्‍वतःतील दोष दूर करण्‍याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करावा.

अ. अल्‍बर्ट आईन्‍स्‍टाईन, जगविख्‍यात शास्‍त्रज्ञ : अल्‍बर्ट आईन्‍स्‍टाईन म्‍हणतात, ‘‘We owe a lot to Indians who taught us how to count, no worth while scientific discovery could have been made.’’

आशय : भारताने आम्‍हाला अंक मोजायला शिकवले; म्‍हणून आम्‍ही भारताचे ऋणी आहोत. वैज्ञानिक संशोधनावाचून इतकी अचूकता शक्‍य नाही.

याचा अर्थ ‘आपल्‍या देशात जगाच्‍या तुलनेत वैज्ञानिक प्रगती सर्वोच्‍च स्‍थानी पोचली होती’, असे अल्‍बर्ट आईन्‍स्‍टाईन सांगतात.

आ. मार्क ट्‌वेन (वर्ष १८३५ ते १९१०) : अल्‍बर्ट आईन्‍स्‍टाईन यांच्‍या विचारांची पुस्‍ती जोडणारे विचार मार्क ट्‌वेन यांनी मांडले आहेत. ते म्‍हणतात, ‘‘Land of religions, cradle of human race, birthplace of human speech, grandmother of legend, great grandmother of tradition. The land that men with intellectual bent desire to see and having seen once even by a glimpse would not give that glimpse for the shows of the rest of the globe combined.’’

आशय : भारताची भूमी सर्व धर्माचे माहेर आहे, मानवी वंशाचा पाळणा आहे, मानवी शब्‍दांची भूमी आहे, दंतकथांची आजी आहे, परंपरेची पणजी आहे. अशा प्रकारची बुद्धीमत्ता असलेली माणसे नम्रतेने इच्‍छा बाळगून शोधायचे ठरवले, तर संपूर्ण जगात अन्‍यत्र कुठेही ती आपल्‍याला दिसत नाहीत. एवढेच नव्‍हे, तर त्‍यांचे ओझरते दर्शनही घडत नाही.

अशी आपली ओळख असतांना आपल्‍याला आपल्‍यापेक्षाही तुलनेने हीन विचारांचे आकर्षण वाटते. याचा अर्थ ‘आपल्‍याला आपली स्‍वतःची खरी ओळख झाली नाही’, असा होतो. जगातील जुने जाणते लोक आपल्‍याला श्रेष्‍ठ मानतात. ही गोष्‍ट आपल्‍या ध्‍यानीमनीही नाही. ‘मार्क ट्‌वेन यांनी काढलेले वरील उद़्‍गार हे भारत देश पारतंत्र्यात असतांना काढलेले आहेत’, हे आपण हेतूत: जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

इ. ज्‍युलिअस रॉबर्ट ओपनहायमर, अणूबाँबचा जनक (वर्ष १९०४ ते १९६७) : ओपनहायमर म्‍हणतात, ‘‘Access of  the Vedas is the greatest privilege this country may claim over all previous centuries.’’

आशय : वेदांकडे जाण्‍याचा सर्वोच्‍च अधिकार कित्‍येक शतके या (भारताचा) देशाचा आहे, असे हा देश म्‍हणू शकतो.

हे उद़्‍गार काढणारी व्‍यक्‍ती अणूबाँबचा जनक आहे, ही गोष्‍ट आपण ध्‍यानात घेतली पाहिजे.

ई. जॉर्ज बर्नार्ड शॉ, नाटककार आणि ‘नोबेल’ पुरस्‍कार विजेते (वर्ष १८५६ ते १९५०) : जॉर्ज बर्नार्ड शॉ म्‍हणतात, ‘‘The Indian way of life provides the vision of the natural real way of life we western veil ourselves with unnatural  masks. On the face of India are the tender expressions which carry the mark of  creators hand.’’

आशय : भारतीय जीवनशैलीने खर्‍या जीवनशैलीची नैसर्गिक दृष्‍टी दिली आहे. आम्‍ही पाश्‍चात्त्यांनी मात्र अनैसर्गिक मुखवटा धारण केला. (तो पाहून) भारताच्‍या मुखावर हळूवार भाव व्‍यक्‍त झाले. ती निर्मात्‍याची खूण आहे.

असे उद़्‍गार काढणारा माणूस नाटककार असून त्‍यांना साहित्‍याचा ‘नोबेल’ पुरस्‍कार प्राप्‍त झाला आहे. त्‍यांच्‍या लेखी भारताची जीवनशैली ही नैसर्गिक आहे. या जीवनशैलीला कृत्रिमतेचा स्‍पर्शही झालेला नाही, तसेच ‘पाश्‍चात्त्यांची जीवनशैली ही कृत्रिम आहे’, हे मोकळेपणाने बर्नार्ड शॉ मान्‍य करतात. असे असूनही आपण मात्र ही कृत्रिम जीवनशैली स्‍वीकारून स्‍वतःची श्रेष्‍ठ असलेली नैसर्गिक जीवनशैली फेकून दिली आहे. आता आपणच विचार करायला हवा की, आपण जे करतो, ते शहाणपणाचे लक्षण आहे का ?

उ. सर विल्‍यम जोन्‍स, भाषाशास्‍त्रज्ञ : ‘संस्‍कृत’ भाषेला जगातील लबाड लोकांनी ‘मृत भाषा’ म्‍हणून घोषित केले. आपणही त्‍याचा स्‍वीकार केला. आज आपल्‍याला संस्‍कृत भाषा येत नाही. संस्‍कृत भाषेच्‍या श्रेष्‍ठत्‍वाविषयी भाषाशास्‍त्रज्ञ सर विल्‍यम जोन्‍स म्‍हणतात, ‘‘The Sanskrit language whatever be it antiquity is of a wonderful structure, more perfect than the Greek more copious than the Latin and more exquisitely refined than either.’’

आशय : संस्‍कृत भाषा ही ग्रीक भाषेच्‍या तुलनेत प्राचीन, सुंदर आणि अधिक परिपूर्ण आहे. ती लॅटिन भाषेपेक्षा समृद्ध आहे. याचसमवेत या दोन्‍ही भाषांपेक्षा संस्‍कृत भाषा सर्वोत्तम आणि सुसंस्‍कृत आहे. हेच तिचे प्राचीनत्‍व आहे.

असे शेकडो पाश्‍चात्त्य विचारवंत, लेखक, भाषाशास्‍त्रज्ञ, वैज्ञानिक आपल्‍या देशाच्‍या जीवनशैलीचे आणि वेद-उपनिषदांचे भरभरून कौतुक करतात अन् श्रेष्‍ठत्‍व खुल्‍या मनाने, तसेच उच्‍चरवाने अख्‍ख्‍या जगाला सांगतात. आपण मात्र त्‍यांच्‍या बोलण्‍याकडे दुर्लक्ष करत आहोत. आपल्‍याकडून असे दुर्लक्ष होऊन आपणच आपली आत्‍मवंचना करून घेणे योग्‍य नाही. माझी माझ्‍या बांधवांना नम्र विनंती आहे की, त्‍यांनी ‘गूगल’वर ‘opinions of historical figures on Indian culture, religion and achievements’, याचा शोध घ्‍यावा. स्‍वतःतील दोष दूर करण्‍यासाठी विद्वानांची मते आणि विचार आपल्‍याला उपयुक्‍त ठरतील, अशी मला खात्री आहे.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, व्‍याख्‍याते आणि लेखक, डोंबिवली. (१०.१०.२०२३)