यवतमाळ, १६ ऑक्टोबर (वार्ता.) – राष्ट्राच्या हितासाठी मारक असणारी आणि सनातन धर्माला विरोध करणारी जमात एकच आहे, असे विधान सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘मी सनातन धर्मरक्षक’ या अभियानांतर्गत १२ ऑक्टोबर या दिवशी येथे झालेल्या सभेत केले.
ते पुढे म्हणाले,
१. उदयनिधी यांच्या विरोधात आम्ही गप्प का आहोत ? जितेंद्र आव्हाड, प्रियांक खर्गे, निखिल वागळे हे सगळे उदयनिधींची ‘री’ ओढत आहेत, तरीही सनातन धर्मीय गप्प का?
२. गोंदियातील अंनिसचे प्रमुख नरेश बन्सोडे यांनी ४ पोलिसांच्या हत्या केल्यानंतर ‘त्याला अटक करू नका’, असे निवेदन डॉ. दाभोलकर यांनी पोलिसांकडे केले होते. यावरून त्यांची स्वार्थी विचारसरणी लक्षात येते.
३. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर सर्वप्रथम गुंड विकास खंडेलवाल आणि मनीष नागोरी यांना अटक करण्यात आली; मात्र दाभोलकर कुटुंबियांच्या दबावामुळे त्यांचे अन्वेषण थांबवण्यात आले. दाभोलकर कुटुंबियांच्या दबावामुळे आजपर्यंत सनातन संस्थेचे डॉ. वीरेंद्र तावडे यांना नाहक अटक करून या प्रकरणात गोवण्यात आले आहे. प्रत्येक वेळी सनातन धर्मियांनाच षड्यंत्रात गोवले जाते आणि त्यांच्यावरच अत्याचार केले जातात. आपण सर्वांनी ही षड्यंत्रे ओळखून त्यांचा निषेधही केला पाहिजे.
४. स्वतःला विवेकी विचारवंत म्हणवणारे कित्येक महाभाग एकविसाव्या शतकातील माथेफिरू स्टॅलीनचे समर्थक म्हणून पुढे येऊ पहात आहेत. ‘खोटे बोला; पण रेटून बोला’, असे असणारे निखिल वागळे हे ‘फेसबुक’ खात्यावर सनातनद्वेषी विधाने करतात.
५. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर सनातन संस्थेवर बेछूटपणे आरोप करणारे निखिल वागळे हे हमीद दाभोलकर यांनी न्यायालयात शपथेवर दिलेल्या साक्षीनंतर काही काळ शांत झाले होते. ‘सनातन संस्थेविषयी केलेल्या आरोपांचा कोणताही पुरावा आपणाजवळ नाही’, असे हमीद दाभोलकरांनी न्यायालयात सांगितल्यावर ‘कुठे तोंड लपवावे’, अशी निखिल वागळे यांची स्थिती झाली होती.
६. जोसेफ स्टॅलीनच्या मृत्यूला ७० वर्षे लोटली आहेत; पण पेरियार, दाभोलकर, निखिल वागळे यांसारख्या मंडळींनी स्टॅलीन यांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवली आहे आणि आता ती उदयनिधी स्टॅलीन यांच्या हवाली केली आहे, हेच सिद्ध होते.
‘अशा हिंदुद्रोहींच्या विरोधात कोण उभे रहाणार ?’ असे विचारल्यावर सभागृहातील सर्वांनी हात वर करून प्रतिसाद दिला. या सभेला १५० हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.