तीर्थक्षेत्रांच्‍या सुधारित विकास आराखड्यास राज्‍यशासनाची मान्‍यता !

परळी वैजनाथ, घृष्‍णेश्‍वर आणि सप्‍तशृंगी या तीर्थक्षेत्रांचा समावेश

परळी वैजनाथ मंदिर

मुंबई – श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्‍योतिर्लिंग, घृष्‍णेश्‍वर आणि सप्‍तश्रृंगीदेवी या तीर्थक्षेत्रांच्‍या सुधारित विकास आराखड्याला राज्‍यशासनाने मान्‍यता दिली आहे. यासाठी ५३१ कोटी रुपयांचे प्रावधान शासनाकडून करण्‍यात आले आहे. ९ ऑक्‍टोबर या दिवशी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्‍या शिखर समितीच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला.

या बैठकीला उपमुख्‍यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांसह प्रशासकीय अधिकारी उपस्‍थित होते. श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्‍योतिर्लिंग विकासासाठी २८६ कोटी ६८ लाख रुपये, श्री क्षेत्र घृष्‍णेश्‍वर तीर्थक्षेत्रासाठी १६३ कोटी रुपये आणि श्रीक्षेत्र सप्‍तश्रृंगीदेवी या तीर्थक्षेत्रासाठी ८१ कोटी ८६ लाख रुपये इतक्‍या सुधारित आराखड्यास राज्‍यशासनाने अनुमती दिली आहे.