सिंधुदुर्ग ते मुंबई ‘शिवशौर्य यात्रा’ : उद्या दोडामार्ग येथून प्रारंभ

विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने आयोजन

दोडामार्ग – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर ‘दोडामार्ग ते दादर (मुंबई)’ शिवशौर्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ३० सप्टेंबर या दिवशी दोडामार्ग येथे प्रारंभ होऊन १५ ऑक्टोबर या दिवशी दादर येथे यात्रेची सांगता होणार आहे. विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

दोडामार्ग शहरातील सिद्धिविनायक मंदिरात ३० सप्टेंबर या दिवशी सकाळी ७.३० वाजता सर्व शिवप्रेमी यात्रेसाठी एकत्र जमणार आहेत. तत्पूर्वी यात्रेसाठी बनवण्यात आलेल्या सुंदर आणि आकर्षक रथाचे दोडामार्गमध्ये आगमन होणार आहे. या रथाचे पूजन आणि अभिषेक केला जाणार आहे. त्यानंतर बांदा, सावंतवाडी, कुडाळमार्गे मालवण येथे आल्यावर यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. येथे सायंकाळी ७ वाजता मामा वरेरकर नाट्यगृहात सभा होणार आहे. रात्री मालवण येथे मुक्काम करून १ ऑक्टोबर या दिवशी सकाळी १० वाजता कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे यात्रेचे आगमन होणार आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान, पोवाडे, विविध गीते आदी सादर केले जाणार आहेत. दुपारी नांदगाव, कासार्डे, तळेरे, खारेपाटणमार्गे रत्नागिरीकडे मार्गस्थ होणार आहे. या यात्रेत हिंदूंनी मोठ्या संख्येने आणि पारंपरिक वेषात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

(सौजन्य : Alert Bharat News)