उदयनिधी स्‍टॅलिन, प्रियांक खर्गे आणि ए. राजा यांच्‍या विरोधात कठोर कारवाईची मागणी !

धनबाद येथे हिंदु संघटनांचे आंदोलन !

आंदोलनात सहभागी हिंदुत्‍वनिष्‍ठ

धनबाद (झारखंड) – सनातन धर्माविषयी अत्‍यंत आक्षेपार्ह आणि धार्मिक भावना दुखावणारी विधाने करणारे तमिळनाडूतील मंत्री उदयनिधी स्‍टॅलिन, कर्नाटकातील मंत्री प्रियांक खर्गे आणि द्रमुकचे खासदार ए. राजा यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी धनबादमधील रणधीर वर्मा चौकात एक दिवसीय आंदोलनात करण्‍यात आली.

१. या वेळी धनबादमधील भाजपचे आमदार राज सिन्‍हा उपस्‍थित होते. उपस्‍थितांना संबोधित करतांना ते म्‍हणाले की, सनातन धर्माची अपकीर्ती करणार्‍यांचा निषेध करण्‍यासाठी हा विषय प्रत्‍येक गावागावांत पोचवण्‍याची आवश्‍यकता आहे. राजकारणासाठी सनातन धर्माची अपकीर्ती करणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे.

२. ‘तरुण हिंदु’ संघटनेचे डॉ. निशांत दास म्‍हणाले की, तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्‍टॅलिन, कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे आणि द्रमुकचे खासदार ए. राजा हे तिघेही घटनात्‍मक पदे भूषवत आहेत आणि तरीही त्‍यांनी वरील विधाने केली आहेत. यामुळे हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावल्‍या गेल्‍या आहेत. संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे.

या आंदोलनात ‘तरुण हिंदु’चे संस्‍थापक डॉ. नील माधव दास, अधिवक्‍ता लल्लन सिंह, हिंदु जनजागृती समितीचे अमरजीत प्रसाद, दीपक केशरी, समितीचे पूर्व आणि ईशान्‍य भारत राज्‍य समन्‍वयक श्री. शंभू गवारे, तसेच विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल यांसह अनेक हिंदु संघटना सहभागी झाल्‍या होत्‍या.

झारखंडमधील जमदेशपूर आणि बोकारो येथेही आंदोलन

अशाच प्रकारचे आंदोलन झारखंडमधील जमदेशपूर आणि बोकारो येथेही करण्‍यात आले.