अमेरिका भारत आणि रशिया यांच्यातील संबंध बिघडवू पहात आहे !  

भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांचा आरोप !

भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह

नवी देहली – ‘भारत आणि रशिया यांच्यातील संबंध बिघडवायचे आहेत’, असे अमेरिका उघडपणे म्हणत आहे, असा आरोप रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. अमेरिकेचा हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डेनिस पुढे म्हणाले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरभाष करून ‘चंद्रयान-३’च्या यशासाठी अभिनंदन केले आहे. भारतासमवेत अंतराळ कार्यक्रम करण्याची रशियाची योजना आहे. रशिया ‘जी-२०’ परिषदेत भारताच्या प्राधान्यक्रमांना पूर्ण पाठिंबा देतो. आफ्रिकी देशांचा ‘जी-२०’ मध्ये समावेश करण्याच्या निर्णयाला रशिया पूर्ण पाठिंबा देईल. युक्रेनचे सूत्र ‘जी-२०’ मध्ये समाविष्ट करण्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे संयुक्त निवेदन प्रसारित करण्यात अडथळे येत आहेत. एका बाजूला ‘जी-७’ देश आहेत, तर दुसर्‍या बाजूला रशिया आणि चीन एकत्र आले आहेत. सध्या चर्चा ठप्प झाल्याचे दिसते.