गोवा : करासवाडा, म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना !

  • हिंदू संतप्त !

  • घटनेच्या निषेधार्थ सहस्रो शिवप्रेमींची घटनास्थळी उपस्थिती

  • सायंकाळपर्यंत दुसरा पुतळा बसवला !

  • गुन्हेगाराला शोधून कारवाई करण्यासाठी पोलिसांना ७ दिवसांची समयमर्यादा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना !

म्हापसा, १४ ऑगस्ट (वार्ता.) – करासवाडा, म्हापसा येथे गेल्या वर्षी उभारलेल्या सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची  १३ ऑगस्टच्या रात्री अज्ञातांनी तोडफोड करून विटंबना केली आहे. यामुळे म्हापसा परिसरात तणावाचे वातावरण आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सहस्रो शिवप्रेमी घटनास्थळी जमले. गोव्यातील शांत आणि सहिष्णू हिंदु समाजाच्या भावना भडकावण्याचा कुणी प्रयत्न करू नये, अशी चेतावणी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ आणि शिवप्रेमी यांनी दिली आहे. सायंकाळपर्यंत शिवप्रेमींनी दुसरा पुतळा त्याजागी बसवला. तशी कल्पना दुपारीच त्यांनी दिली होती. पुतळ्याची विटंबना करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना ७ दिवसांची समयमर्यादा देण्यात आली आहे.

पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून प्रथमदर्शनी अहवाल नोंद केला आहे. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी सांगितले की, म्हापसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अन्य अधिकार्‍यांच्या साहाय्याने या घटनेचे अन्वेषण करतील. गुन्हे अन्वेषण विभागालाही या घटनेचे अन्वेषण करण्यास सांगण्यात आले आहे. पोलिसांच्या श्वानपथकाच्या माध्यमातून अन्वेषणाचे कार्य चालू आहे. त्याचप्रमाणे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील चित्रीकरणाचाही अन्वेषणासाठी वापर करण्यात येणार आहे.

सायंकाळी शिवप्रेमी आणि उपस्थित हिंदू यांनी छत्रपत्री शिवाजी महाराजांचा पूर्वीसारखाच सिंहासनाधिष्ठित नवीन पुतळा आणून विटंबना झालेल्या पुतळ्याच्या  ठिकाणी त्याची स्थापना केली. मान्यवरांच्या हस्ते पुतळ्यावर जलाभिषेक करण्यात आला.

केवळ हिंदूंनीच संयम का बाळगावा ? – सुभाष फळदेसाई, पुरातत्व मंत्री

करासवाडा येथे बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नव्या पुतळ्यावर जलाभिषेक करतांना मंत्री श्री. सुभाष फळदेसाई

जर अन्य धर्मियांना वाद हवा असेल, तर आम्ही त्यासाठी सिद्ध आहोत. केवळ हिंदूंनीच संयम का बाळगावा ? असा संतप्त प्रश्न पुरातत्व मंत्री सुभाष फळदेसाई यांनी उपस्थित केला आहे.

विधानसभेत बाणावलीचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी शिवजयंतीवरील खर्चावर प्रश्न विचारला होता. आजच्या घटनेवरून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना फळदेसाई म्हणाले, ‘‘हे लोक शिवजयंतीला फेरी काढली जाते, त्याला अनावश्यक खर्च म्हणतात. ६०० वाहनांसह जवळपास ३० कि.मी. फेरीचा खर्च मी स्वतः केला होता, तो सरकारचा नव्हता. आम्हाला सरकारकडून कोणतीही आर्थिक साहाय्य नको आहे. आमच्या भावना दुखवू नका.’’

गोव्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या घटनेचा निषेध करतांना ‘अशा घटना या गोव्यातील शांतता भंग करण्यासाठीचा डाव आहे’, असे सांगितले.

हे हिंदूंच्या धर्मभावना दुखावण्याचे षड्यंत्र ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

ही घटना निंदनीय आहे. हिंदूंच्या भावना पद्धतशीरपणे भडकावण्यासाठीचे हे षड्यंत्र आहे.

आधी मणीपूर येथील घटनेवरून हिंदूंना लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर पाद्री बोलमॅक्स यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांना काही जणांनी पाठिंबाही दिला. त्यानंतर ही घटना घडली आहे. हिंदूंच्या भावनांना ठेच पोचवण्याचे प्रयत्न चालू आहेत.

(सौजन्य : RDXGOA GOA NEWS)

अशा घटना या देशाच्या संस्कृतीवरील आघात ! – श्रीपाद नाईक, खासदार

आज जी घटना घडली आहे, अशा घटना या देशाची संस्कृती आणि एकता यांवरील आघात आहेत. हा अपमान आहे. यासाठी सर्वांनी जागरूक रहाणे आवश्यक आहे.

भाजपचे म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनीही घटनास्थळी भेट देऊन या कृत्याचा निषेध केला.

सर्वांनी शांतता राखली आणि नवीन पुतळा स्थापन झाला याविषयी अभिनंदन ! – काँग्रेसचे आमदार कार्लाेस फेरेरा

काँग्रेसचे स्थानिक आमदार कार्लाेस फेरेरा यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेचा निषेध केला.

 (सौजन्य : Shekhar Naik Goa)

ते म्हणाले, ‘‘या ठिकाणी आता नवीन पुतळा बसवला ते चांगले झाले. सकाळपासूनचा तणाव त्यामुळे निवळला. सर्वांनी शांतता राखली याविषयी अभिनंदन ! याला म्हणतात खरे गोमंतकीय ! जिथे पुतळे आहेत, तेथे सीसीटीव्ही बसवायला हवेत.’’ त्याआधी दुपारी त्यांनी ‘मडगाव येथून आज सायंकाळपर्यंत नवीन पुतळा आणून या ठिकाणी बसवला जाईल. मी औद्योगिक विकास महामंडळाला  पुतळा उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती करणार आहे’, असे म्हटले होते.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

संपादकीय भूमिका

  • संघटित होऊन मूर्तीभंजनाच्या कृत्याचा निषेध करणारे आणि तत्परतेने शिवरायांचा पुतळा पुन्हा उभारणारे गोव्यातील शिवप्रेमी अन् हिंदुत्वनिष्ठ यांचे अभिनंदन !
  • हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या भंजनाचा कुणी विचारही करू शकणार नाही, असे संघटन गोमंतकातील हिंदूंनी उभे करायला हवे !