डॉ. रिबेलो, भेंब्रे आणि पिशाच्च

उदय भेंब्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गोव्यातील शासनकाळाविषयी टीका केली होती. त्याचे समर्थन करणारा डॉ. ऑस्कर रिबेलो यांचा ५ मार्च २०२५ या दिवशी दैनिक ‘गोमन्तक’मध्ये लेख प्रसिद्ध झाला होता. अधिवक्ता उदय भेंब्रे यांची तळी उचलून धरतांना डॉक्टरबाबूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘कात्रज घाट युद्धनीती’चा अवलंब केला आहे (!) आधी दगड मारून मोहोळ उठवायचे आणि नंतर चावतो म्हणून गळा काढायचा. उदय भेंब्रेंचे हे वर्तन समर्थनीय आहे का ? (‘शक्तीहीन’, ‘शक्तीमान’ वगैरे विशेषणे लावली तरी नाही). आधी या वादाची पार्श्वभूमी पाहू. दोन वर्षांपूर्वी भेंब्रे यांनी केलेली इतिहासाची मांडणी, सचिन मदगे यांनी दिलेले सप्रमाण प्रत्युत्तर आणि नंतर उदय भेंब्रेंनी केलेली सारवासारव हा इतिहास आहे. मग आता पुन्हा शिळ्या कढीला ऊत का ? राष्ट्रपुरुषांविषयी दायित्वशून्य विधाने केल्याने लोकांच्या भावना क्षुब्ध झाल्या, तरी ‘भवती ना भवती’च्या वादात फुकट प्रसिद्धी मिळाली, तर ‘फायदे का सौदा’ म्हणून का ?

छत्रपती शिवाजी महाराज यांची गोव्यात राजवट होती हे निर्विवाद सत्य !

दुसरी एक संभाव्य कारणमीमांसा मला वाटते. प्रसिद्धीसाठी अंगावरचे कपडे फाडणे, हा शास्त्रमान्य मार्ग. सुभाषित आहे तसे; पण ते युग वेगळे. आता त्यासाठी दुसर्‍याचे कपडे फाडायलाही आम्ही सिद्ध ! ऐतिहासिक असामी तावडीत सापडला, तर अधिक उत्तम. ऐतिहासिक व्यक्तीमत्त्व काही प्रतिवाद करायला येणार नाही. आमच्यासारख्यांचे दुबळे प्रयत्न अभिव्यक्तीस्वातंत्र्य या घटनादत्त अधिकाराचा वापर करून झटकून देता येतात. श्रीराम, श्रीकृष्ण यांना देवत्व प्राप्त झाले आहे, त्यामुळे पुरोगामी मंडळीची अडचण झाली आहे, हे आपले नशीब ! अजून एक शक्यता मला वाटते.

सध्या ‘छावा’ चित्रपट गाजत आहे. छत्रपतींच्या याच छाव्याला घाबरून पोर्तुगीज ‘गोयांच्या सायबाला (?)’ शरण आले होते. नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिर जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील. ‘गोवा ४५० वर्षे पोर्तुगीज राजवटीखाली होता’, हे अर्धसत्य आहे. नाविक शक्ती हेच पोर्तुगीज सत्तेचे बलस्थान होते. त्यामुळे मुरगाव, साष्ट (सासष्टी) आणि बार्देश यांपलीकडे (मराठी साम्राज्याच्या सुवर्ण काळात) पोर्तुगीज प्रभावी होऊ शकले नाहीत, याला इतिहास साक्षी आहे. सत्तरी, फोंडे, सांगे, काणकोण  हा दूरस्थ प्रदेश. ‘एन्.सी. गोवा’ (एन्.सी. म्हणजे न्यूली कॉन्कर्ड – नव्याने जिंकलेले) या नावाने आजही टपालाच्या पत्त्यासाठी सरकारमान्य आहे. पोर्तुगीज सत्तेच्या दमनचक्रामुळे परागंदा झालेली देवळे आणि देवता याच प्रदेशात आली, ती कोणत्या भरवशावर ? काणकोण महालात सौंदे संस्थानाचे राज्य होते. आता प्रश्न असा आहे की, पोर्तुगीज सत्तेच्या ताब्यात हा प्रदेश कसा आला ? कुणी दिला ? सत्तरीमध्ये राणे दीर्घकाळ प्रभावी होते. कृपया इतिहासकारांनीच यावर प्रकाश टाकावा. नव्याने इतिहासात रुची घेणार्‍या तरुण पिढीला आवाहन आहे. इतिहास हा केवळ वैयक्तिक किंवा सामूहिक अभिनिवेश नसतो. भविष्याचा विचार त्यात अनुस्यूत असतो. ऐतिहासिक कागदपत्रे, गोव्यातील भूमीच्या मालकी हक्काचे जुने तपशील मोडी लिपीमध्ये आहेत. पोर्तुगीज भाषा आणि मोडी लिपी यांचे जाणकार हवेत, तरच भाषा अभिनिवेश बाजूला ठेवून लोककल्याणकारी मार्ग प्रशस्त करता येईल.

शक्तीहीनतेसह नीती-अनीती यांचाही विचार करणे आवश्यक !

लेखात डॉ. ऑस्कर रिबेलोंनी हा ‘शक्तीहीन विरुद्ध शक्तीमान’, असा संघर्ष असल्याचे प्रतिपादन केले आहे त्याविषयी. महाभारतातील एक रूपक-कथा वाचनात आली, ती सांगावीशी वाटते. युद्ध चालू होण्यापूर्वी राजे आपल्या मर्जीनुसार कौरव-पांडवांच्या बाजूने लढायला सिद्ध होते. एक पिशाच्च भगवान कृष्णाकडे युद्धात भाग घेण्यासाठी अनुमती मागतो. कृष्ण विचारतो, ‘तू कोणत्या बाजूने लढायला सिद्ध आहेस ?’ पिशाच्च म्हणतो, ‘कमकुवत असेल त्या बाजूने. पांडवांच्या बाजूने लढतांना कौरवांची शक्ती न्यून होत आहे, असे मला वाटले, तर मी त्यांना सामील होईन आणि पांडवांच्या विरुद्ध युद्ध करीन !’ तात्पर्य सर्वनाश !! कृष्ण युक्तीने त्याला युद्धापासून परावृत्त करतो; कारण हे धर्मयुद्ध धर्माच्या रक्षणासाठी आहे, ही गोष्ट त्याला ठाऊक होती. त्यामुळे शक्तीहीनतेसह नीती-अनीती यांचाही विचार केला पाहिजे, असे मला वाटते !

– सतीश भट, गोवा

(साभार : दैनिक ‘गोमन्तक’, १०.३.२०२५)