सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ‘ब्रह्मोत्‍सवा’च्‍या संदर्भात सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८१ वा ब्रह्मोत्सव !

सप्तर्षींच्या आज्ञेने रथात विराजमान श्रीविष्णुरूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले, त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (डावीकडे) आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (उजवीकडे)

१. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या जन्‍मोत्‍सवासाठी जाण्‍याचे समजल्‍यावर भावजागृती होऊन कृतज्ञता वाटणे

‘देहली येथे धर्मप्रचाराचे कार्य चालू असल्‍यामुळे ब्रह्मोत्‍सवासाठी प्रत्‍यक्ष जायला मिळणार नाही’, असे मला वाटले होते. त्‍यामुळे प्रतिवर्षीप्रमाणे हा जन्‍मोत्‍सव निर्गुण स्‍वरूपात, म्‍हणजे प्रत्‍यक्ष सोहळ्‍याला न जाता येथेच अनुभवण्‍यासाठी प्रयत्न प्रारंभ केले; परंतु मला जन्‍मोत्‍सवाच्‍या कार्यक्रमाला येण्‍याविषयी निरोप मिळाला. तेव्‍हा ‘हा जन्‍मोत्‍सव वेगळा असणार आहे’, असे जाणवून माझी भावजागृती झाली आणि मनात कृतज्ञताभाव दाटून आला. ‘एकदा तरी ‘गुरुदेवांचा जन्‍मोत्‍सव सोहळा प्रत्‍यक्ष पाहिला पाहिजे’, असा विचार माझ्‍या अंतर्मनात होता’, हेही लक्षात आले.

२. गोवा येथे आल्‍यावर जगन्‍नाथपुरीच्‍या मंदिराची स्‍पंदने जाणवल्‍यावर प्रत्‍यक्ष भगवान जगन्‍नाथ मंदिर दिसणे आणि कार्यक्रमाच्‍या सूत्रसंचालनात ‘भगवान जगन्‍नाथाप्रमाणे रथोत्‍सव आणि तिरुपती बालाजीप्रमाणे ब्रह्मोत्‍सव साजरा होत आहे’, असे लक्षात येणे

भगवान जगन्‍नाथाचे गोवा येथील मंदिर

गोवा येथे आल्‍यावर विमानतळाहून आश्रमाकडे जातांना वाटेत मंदिराचे २ – ३ कळस दिसले. तेव्‍हा मला जगन्‍नाथपुरीच्‍या मंदिराची स्‍पंदने जाणवू लागली. प्रत्‍यक्षात आम्‍ही मंदिराजवळ आल्‍यावर ते मंदिर पुष्‍कळ लहान होते; परंतु ते भगवान जगन्‍नाथाचेच मंदिर होते. मी साधक श्री. सागर म्‍हात्रे याला विचारले, ‘‘गोव्‍यात आता जगन्‍नाथ अवतरले आहेत का ?’’ त्‍यावर तो काही बोलला नाही; मात्र हे मंदिर पहातांना मला काही तरी विशेष जाणवले. प्रत्‍यक्ष कार्यक्रमाच्‍या सूत्रसंचालनात ‘भगवान जगन्‍नाथाप्रमाणे रथोत्‍सव आणि तिरुपती बालाजीप्रमाणे ब्रह्मोत्‍सव साजरा होत आहे’, असे श्री. विनायक शानभाग (आध्‍यात्मिक पातळी ६७ टक्‍के, वय ४० वर्षे) म्‍हणाले. तेव्‍हा ‘गुरुदेव सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी गोव्‍यात येताच कार्यक्रमाविषयी संकेत दिला होता’, ते माझ्‍या लक्षात आले.

३. शरीर हलके होणे

अ. रामनाथी आश्रमात पोचल्‍यावर माझे शरीर हलके झाल्‍याचे जाणवत होते आणि ‘गुरुदेवांच्‍या सगुण सत्‍संगात आलो आहे’, या विचारामुळे माझी सतत भावजागृती होत होती.

आ. जन्‍मोत्‍सव सोहळ्‍याच्‍या आदल्‍या दिवशी रंगीत तालमीसाठी सोहळ्‍यासाठीच्‍या मैदानात पोचलो. तेव्‍हा शरीर एकदम हलके होऊन ‘मी अधांतरी आहे’, असे जाणवत होते.

४. जाणवलेली सूत्रे

सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

४ अ. आदल्‍या दिवशी रंगीत तालीम चालू असतांना

१. विविध सेवांची रंगीत तालीम चालू असतांना आकाशात इंद्रधनुष्‍य प्रकट झाले होते. ‘प्रत्‍यक्ष महर्षि आणि सप्‍तर्षि ही रंगीत तालीम पहाण्‍यासाठी तेथे उपस्‍थित आहेत’, असे अनुभवता आले. ‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्‍या कार्यक्रमाच्‍या पूर्वसिद्धतेसाठी सप्‍तर्षींसह देवताही लक्ष ठेवून आहेत’, असे जाणवले.

२. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या मोक्षगुरु असूनही सर्व साधकांच्‍या समवेत ब्रह्मोत्‍सवाच्‍या कार्यक्रमाचे नियोजन परिपूर्ण होण्‍यासाठी प्रत्‍यक्ष उभ्‍या राहून मार्गदर्शन करत होत्‍या. तेव्‍हा ‘साक्षात् श्री महालक्ष्मीदेवी मानवीदेहामध्‍ये आल्‍यानंतर सामान्‍य मानवाप्रमाणे सहजतेने गुरुकार्य करत आहे’, हे पाहून ‘मलाही पुष्‍कळ गुरुकार्य करायला पाहिजे’, याची जाणीव झाली.

३. वादनाची रंगीत तालीम घेतांना श्री. मनोज सहस्रबुद्धे (आध्‍यात्मिक पातळी ६० टक्‍के, वय ५४ वर्षे) सतार आणि श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांचे तबलावादन चालू होते. तेव्‍हा प्रत्‍यक्ष गायन किंवा शब्‍द उच्‍चारण होत नसतांनाही ‘तबला आणि सतार यांच्‍या नादातून नाद ऐकू न येता प्रत्‍यक्ष शब्‍दच ऐकू येत आहेत’, असे जाणवले.

४ आ. ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी कार्यक्रमस्‍थळी जाणवलेली सूत्रे

४ आ १. ‘व्‍यासपीठ आणि आकाश एक झाले असून हे २ तत्त्वांच्‍या संधीचे स्‍थान आहे’, असे जाणवणे : ‘कार्यक्रमस्‍थळी मध्‍यभागी जे व्‍यासपीठ उभारले होते, ते व्‍यासपीठ आणि आकाश हे एक झाले असून येथे आकाश आणि पृथ्‍वीचा मीलन बिंदू म्‍हणजे हे क्षेत्र आहे’, असे जाणवले. ‘त्र्यंबकेश्‍वरला (त्रिपिंडी श्राद्ध किंवा नारायण नागबली करण्‍याचे क्षेत्र) भू आणि भुवलोक यांच्‍या संधीचे क्षेत्र आहे’, असे म्‍हटले जाते, तसेच ‘हे ठिकाण म्‍हणजे पृथ्‍वी आणि आकाश या २ तत्त्वांच्‍या संधीचे स्‍थान आहे’, असे मला जाणवले.

४ आ २. ‘आकाशतत्त्वरूपी तिन्‍ही मोक्षगुरु पृथ्‍वीतत्त्वरूपी सर्व साधकांशी एकरूपता साधून त्‍यांना आकाशतत्त्वात सामावून घेत आहेत’, असे हे क्षेत्र असल्‍याचे जाणवणे : प्रत्‍यक्षात व्‍यासपिठाला आकाशी रंगाचे कापड लावले होते. त्‍याच्‍याशी एकरूप झालेले त्‍याच रंगाचे आकाश सर्वत्र दिसून येेत होते. जसे गीत रामायणात वर्णन केले आहे ‘आकाशाशी भिडले नाते धरणीमातेचे । स्‍वयंवर झाले सीतेचे ॥’, तसेच या ठिकाणी ‘आकाशतत्त्वरूपी तिन्‍ही मोक्षगुरु (सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) हे पृथ्‍वीतत्त्वरूपी सर्व साधकांशी एकरूपता साधून त्‍यांना आकाशतत्त्वात सामावून घेत आहेत, असे हे क्षेत्र आहे’, असे मला जाणवले.

४ आ ३. ‘या सोहळ्‍यानिमित्त सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव डॉ. आठवले हे सर्व साधकरूपी जीवात्‍मे, संत आणि सद़्‍गुरुरूपी शिवात्‍मे यांना आपल्‍या परमात्‍मास्‍वरूपात विलीन करून घेत आहेत’, याची अनुभूती देणारे हे क्षेत्र असल्‍याचे जाणवले.

४ आ ४. ‘सर्व साधकांना परमात्‍मस्‍वरूपात सामावून घेणे आणि ती जाणीव सर्व साधक, संत अन् सद़्‍गुरु यांमध्‍ये जागृत करणे, हेच या कार्यक्रमाचे प्रयोजन आहे’, असे जाणवले.

४ आ ५. रथ फिरण्‍याचा मार्ग वैदिक कालचक्र दर्शवणारा परिक्रमामार्ग असल्‍याचे लक्षात येणे : ब्रह्मोत्‍सवाच्‍या वेळी रथ फिरण्‍याचा जो मार्ग होता, तो लंबचक्राकार होता. ‘मध्‍यभागी असलेले व्‍यासपीठ, म्‍हणजे पृथ्‍वी आणि रथाचा मार्ग हा पृथ्‍वीभोवतीचा आकाशातील एक परिक्रमामार्ग आहे’, असे मला जाणवले. त्‍या वेळी ‘या परिक्रमामार्गाचे काहीतरी वैशिष्‍ट्य आहे’, असे मला जाणवत होते. देहली येथे आल्‍यानंतर या मार्गाचे वैशिष्‍ट्य दर्शवणारे एक चित्र मला मिळाले. त्‍यानुसार ‘हा वैदिक कालचक्र दर्शवणारा परिक्रमामार्ग आहे’, हे स्‍पष्‍ट झाले.

५. ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती !

५ अ. जाणवलेली सूत्रे

१. सर्व साधकांच्‍या मनात ‘आपत्‍काळात साधकांच्‍या रक्षणासाठी गुरुदेवांनी भावभक्‍तीरूपी अनन्‍य कृपाशीर्वाद दिला आहे’, असा विचार यायला लागला. बर्‍याच साधकांनी कार्यक्रमानंतर असे विचार व्‍यक्‍तही केले. साधकांच्‍या मनात ‘आता आपत्‍काळच काय, तर जीवनातील कोणत्‍याही संकटाला तोंड देत गुरुचरणांशी आणि गुरु सेवेत राहू, असा दृढभाव निर्माण झाला’, असे जाणवले.

२. गुरुदेवांनी रथोत्‍सवात रथाद्वारे जी लंबवलयकारक प्रदक्षिणा घातली, त्‍यांद्वारे साधकांच्‍या मनात भावभक्‍ती आणि गुरुकृपा यांचे सुदर्शनचक्राकार वलय निर्माण केले. ‘एक प्रकारे गुरूंनी सुदर्शनचक्राप्रमाणे एक वलय कार्यरत करून साधकांच्‍या रक्षणासाठी सुरक्षाकवच प्रदान केले’, असे जाणवले.

३. ‘गुरुदेवांनी या ब्रह्मोत्‍सवाद्वारे साधकांच्‍या हृदयात तिन्‍ही मोक्षगुरूंची छबी अंकित करून ठेवली’, असे जाणवले.

४. ‘गुरुदेवांनी साधकांना हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेचे अभियान परिपूर्ण स्‍थितीत नेण्‍यासाठी भावभक्‍तीच्‍या स्‍थितीत नेले’, असे जाणवले.

५. ‘या ब्रह्मोत्‍सवात गुरुदेवांनी साधकांना गाव, शहर, जिल्‍हा, प्रांत, भाषा, जाती, आर्थिक स्‍थिती, शैक्षणिक स्‍थिती, शारीरिक आणि मानसिक क्षमता आदी सर्व बाह्य विविधतेतून भावभक्‍तीरूपी ईश्‍वर स्‍मरणात, म्‍हणजेच एका विचारात, एकत्‍वात बांधले आहे’, असे जाणवले.

६. गुरुदेवांचा रथ व्‍यासपिठाजवळ आला. तेव्‍हा ‘व्‍यासपीठ हे जणू पृथ्‍वी आहे आणि गुरुदेवांचा रथ अधांतरी आकाशात आहे’, असे मला जाणवले.

७. ‘येणार्‍या काळात पृथ्‍वीवर विनाशकारी घडामोडी चालू असतांना आकाशातून तिन्‍ही मोक्षगुरु साधकांच्‍या सेवांचे निरीक्षण करत साधकांना भरभरून आशीर्वाद देत आहेत’, असे जाणवले.

८. ‘या जन्‍मोत्‍सवामुळे सर्व साधकांमध्‍ये अनन्‍य कृतज्ञताभाव जागृत झाला आहे’, असे जाणवले.

९. ‘प्रातिनिधिक स्‍वरूपात काही संत आणि साधक यांना परिचयासाठी व्‍यासपिठावर बोलावले. तेव्‍हा ‘त्‍यांच्‍या माध्‍यमातून सर्व साधकांना त्‍यांनी कृपाशीर्वाद प्रक्षेपित केला आहे’, असे जाणवले.

१०. या कार्यक्रमासाठी रथ निर्माण करण्‍याची प्रक्रिया किती प्रतिकूलता आणि संघर्षमय स्‍थितीत झाली, ते ऐकल्‍यानंतर साधकांचे अथक प्रयत्न, संत आणि गुरुदेव यांचे मार्गदर्शन यांमुळे या रथासंबंधी दिव्‍य आणि चैतन्‍याची अनुभूती का आली, ते कळले.

५ आ. अनुभूती

१. ११.५.२०२३ या दिवशी कार्यक्रमाची विराटता पाहून, साधारण १० सहस्र साधकांना पाहून गुरूंचे विराट रूप आणि अध्‍यात्‍मप्रसाराचे कार्य याची अनुभूती येत होती.

२. ‘हा सोहळा पृथ्‍वीवर नव्‍हे, तर प्रत्‍यक्ष विष्‍णुलोकात होत आहे’, असे मला अनुभवता आले. तिन्‍ही मोक्षगुरूंना रथात पाहूनच माझी, तसेच सर्व साधकांची भावजागृती झाली आणि सर्व साधकांच्‍या डोळ्‍यांतून भावाश्रू वाहू लागले.

३. तिन्‍ही गुरु साधकांकडे स्‍मितहास्‍य करत पहात होते. तेव्‍हा ‘आम्‍हा साधकांना आपले जीवन कृतार्थ झाले, आमच्‍यावर गुरूंची दृष्‍टी पडली, गुरूंनी आम्‍हाला तारून नेले, गुरूंनी आम्‍हाला आपल्‍या चरणांशी घेतले’, असा भाव निर्माण झाला आणि ‘कृतज्ञतारूपी भावाश्रूंनी गुरुचरणांना अभिषेक घातला जात होता’, असे अनुभवता आले.

४. गुरुदेवांच्‍या या जन्‍मोत्‍सवात साक्षात् जगन्‍नाथपुरीच्‍या रथयात्रेचा, तसेच तिरुपती बालाजीच्‍या ब्रह्मोत्‍सवाची दिव्‍यता आणि आनंद अनुभवता आला. या वेळी ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांच्‍या रूपात साक्षात् श्रीहरि विष्‍णु, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या साक्षात् महालक्ष्मी असून त्‍यांचे सगुण दर्शन अन् आशीर्वाद लाभत आहेत’, असे वाटले.

५. ‘हा ब्रह्मोत्‍सव खर्‍या अर्थाने आम्‍हा साधकांच्‍या दृष्‍टीने महाकुंभच होता’, अशी अनुभूती आली. शास्‍त्राप्रमाणे प्रत्‍येक १२ वर्षांत ४ वेगवेगळ्‍या ठिकाणी कुंभमेळ्‍याचे आयोजन होते; परंतु ‘आजचा हा सोहळा साधकांचा खरा महाकुंभ मेळा असून भगवंत साधकांचा साधनाकुंभ स्‍वतः भरून देत आहे’, असे जाणवले.

६. ‘पुरुषसूक्‍तामध्‍ये केलेल्‍या वर्णनाप्रमाणे भगवंताचे, म्‍हणजे विराट पुरुषाचे सहस्र शीर्ष आणि सहस्र बाहू आदी वर्णनाप्रमाणे गुरुदेवांच्‍या विराट रूपाचे दर्शन आज होत आहे’, असे अनुभवावयास आले. त्‍यांच्‍या विराट रूपाच्‍या तुलनेत ‘आम्‍ही सर्व साधक, संत आणि सद़्‍गुरु हे सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे इतके लहान प्रतिबिंब आहोत की, त्‍यांच्‍या एका पेशी पेशी समान त्‍यांची चरणधूळ आहोत’, असे जाणवले.’

७. १५.५.२०२३ या दिवशी श्री. विनायक शानबाग यांनी सांगितले, ‘‘सर्व साधक यापूर्वीही सतत श्री गुरुदेवांच्‍या अवतारांसह वारंवार कार्यासाठी जन्‍माला आलेले आहेत. त्‍यामुळे सर्व साधकही एक प्रकारे अवतारच आहेत.’’

– (सद़्‍गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती, देहली (१५.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार सद्गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक