वैभववाडी – तालुक्यातील दिगशी – तिथवली मार्गावरील लहान पूल (कॉजवे) पुराच्या पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. गेले ४ दिवस मार्गावर पाणी असल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची असुविधा झाली आहे.
तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावे, वाड्या यांचा संपर्क तुटला आहे. या पावसाचा फटका दिगशी – तिथवली मार्गाला बसला आहे. मार्गावरील मोरेवाडीनजीकचा ‘कॉजवे’ गेले ४ दिवस पाण्याखाली आहे. तिथवली विद्यालय आणि प्राथमिक शाळेत जाणार्या मुलांची यामुळे शैक्षणिक हानी होत आहे.
या मार्गाचे काम ५ वर्षांपूर्वी ‘पंतप्रधान ग्रामसडक योजने’तून करण्यात आले होते. त्यापूर्वीही येथे ‘कॉजवे’ होता. नवीन काम करण्यापूर्वी या ‘कॉजवे’ची उंची वाढवण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती; परंतु संबंधित विभागाने ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून त्याच उंचीचा ‘कॉजवे’ बांधला. त्याचा नाहक त्रास आता वाहनचालक, प्रवासी आणि नागरिक यांना सहन करावा लागत आहे. (पुलाचे काम करतांना प्रशासन ग्रामस्थांना होणार्या असुविधा-सुविधांचा विचार करून त्यांची मते ग्राह्य धरत नाही का ? – संपादक)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५९ घरांची अतीवृष्टीमुळे हानी
सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २ सहस्र ७५ मि.मी. पाऊस पडला. एकूण २ जणांचा मृत्यू झाला आहे. ९ सार्वजनिक मालमत्तांची हानी झाली, तर सध्या एकूण ८ जणांच्या २ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तिलारी धरणासह १८ लघु आणि ३ मध्यम, अशी एकूण २२ धरणे भरली असून त्यातून अतिरिक्त पाणी सोडण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण २२८ पक्की घरे, ३१ कच्ची घरे, ३ झोपड्या, ३२ गोठे आणि १ पोल्ट्रीफार्म यांची पावसामुळे हानी झाली आहे. पुराच्या पाण्यात ७ मोठी गुरे वाहून गेल्याने मृत्यूमुखी पडली आहेत.
भुईबावडा घाटात दरडी कोसळल्या
वैभववाडी – तालुक्यात सलग तिसर्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसाने तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी, नाले यांना पूर आला आहे. कुसुर, दिगशी, तिरवडे तर्फ खारेपाटण, उंबर्डे या भागात रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसामुळे भुईबावडा घाटात दरडी कोसळल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या हटवून मार्ग सुरळीत केला आहे.