महाराष्ट्रात ‘ऑनलाईन गेमिंग’द्वारे चालणार्‍या जुगारावर बंदी घालावी ! – आमदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेस

आमदार प्रतिभा धानोरकर

मुंबई – महाराष्ट्रातील जुगारबंदी कायद्याला बगल देऊन ‘ऑनलाईन ॲप’द्वारे  उघडपणे जुगार चालू आहेत. यामध्ये अधिकोषातून पैसे ‘ऑनलाईन’ अन्य खात्यांमध्ये वळवले जात आहेत. या जुगारामुळे तरुण व्यसनाधीन होत असून चंद्रपूर येथील एका युवकाने ‘ऑनलाईन’ जुगारामुळे आत्महत्या केली आहे. ‘ऑनलाईन’ जुगाराचे अनेक अपप्रकार देशात चालू आहेत. केवळ महसुलासाठी या जुगाराला मान्यता देणे तरुणांसाठी धोकादायक आहे. तामिळनाडू राज्याने ज्याप्रमाणे ‘ऑनलाईन गेमिंग’वर बंदी घातली आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्रातही बंदी घालण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या आमदार श्रीमती प्रतिभा धानोरकर यांनी २७ जुलै या दिवशी विधानसभेत औचित्याच्या सूत्राच्या अंतर्गत केली.

संपादकीय भूमिका

बहुतांश ‘ऑनलाईन’ खेळ हे पैसे लावून खेळले जातात. हा एक प्रकारे अधिकृत करण्यात आलेला जुगारच नव्हे का ? ‘ऑनलाईन’ खेळांचा अपलाभ धर्मांध, तसेच अन्य गुन्हेगार घेत आहेत. यामध्ये मुलींना फसवण्यापासून हिंदु मुलांचे धर्मांतर करण्यापर्यंत अनेक अपप्रकार उघड होत आहेत. मोठ्या व्यक्तीही यात गुंतत जाऊन कर्जबाजारी होत आहेत. देशातील जनतेला अमूल्य वेळ खर्ची घालायला लावून समाजाची फलनिष्पत्ती न्यून करणार्‍या आणि देशाच्या भावी पिढीला अधोगतीकडे नेणार्‍या ‘ऑनलाईन’ खेळांविषयी गांभीर्याने विचार झाला पाहिजे !