महात्मा फुले जनआरोग्य योजनेत ‘अपेंडिक्स’वरील उपचारांसाठी त्याच्या लांबीची मर्यादा रहित !

राज्यशासनाची घोषणा !

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत

मुंबई – महात्मा फुले जनआरोग्य योजनेत ‘अपेंडिक्स’वरील उपचारांसाठी त्याच्या लांबीची मर्यादा रहित करण्यात येत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी २७ जुलै या दिवशी विधानसभेत केली. आमदार दीपक चव्हाण यांनी ‘अपेंडिक्स’, तसेच अन्य काही रोगांच्या उपचारांचा महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करण्याची मागणी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केली होती. त्यावर आरोग्यमंत्र्यांनी वरील घोषणा केली.

यापूर्वी ‘अपेंडिक्स’च्या लांबीवरून उपचार केले जात होते. यापुढे ‘अपेंडिक्स’वर सरसकट उपचार केले जातील. या उपचारांसाठीही या योजनेतून पैसे उपलब्ध केले जातील. यासह अन्य काही उपचारांचा समावेश या योजनेत करता येईल का ? याविषयी विधीमंडळाच्या सदस्यांसमवेत बैठक घेऊन त्या उपचारांचा या योजनेत समावेश करण्यात येईल.

यापूर्वी महात्मा फुले जन आरोग्य योजनेत ९९६ उपचारांचा समावेश होता. ही मर्यादा आता १ सहस्र ३५६ इतकी करण्यात आली आहे. यामध्ये आणखी उपचार वाढवायचे का ? किंवा कोणते उपचार रहित करावेत, याविषयी बैठकीनंतर निर्णय घेण्यात येईल.