मुंबई, २६ जुलै (वार्ता.) – राज्यातील ३० सहस्र शिक्षकांची रिक्त पदे ‘पवित्र प्रणाली’द्वारे भरण्याची प्रक्रिया चालू आहे. ही प्रक्रिया ऑक्टोबर २०२३ पर्यंत पूर्ण करून शिक्षकभरती केली जाईल, तर न्यायालयाने शिक्षकेतर कर्मचार्यांच्या आकृतीबंधास अंतरिम स्थगिती दिली असल्याने शिक्षकेतर कर्मचार्यांचे समायोजन, तसेच पदभरती या संदर्भात कार्यवाही करणे सध्या शक्य नाही, असे स्पष्टीकरण शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्नास उत्तर देतांना २५ जुलै या दिवशी ते बोलत होते. केसरकर पुढे म्हणाले, ‘‘पवित्र प्रणालीपूर्वी पूर्वानुमती न घेता शिक्षकभरती केलेल्याची माहिती दिली जाईल. अधिकारी दोषी आढळल्यास कारवाई होईल.’’