मंत्री शंभूराज देसाई यांच्‍या तालुक्‍यातच कृषी विभागातील ५० टक्‍के पदे रिक्‍त !

शंभूराज देसाई

सातारा, २६ जुलै (वार्ता.) – पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्‍या पाटण तालुक्‍यात कृषी विभागात अधिकारी आणि कर्मचारी यांची ५० टक्‍के पदे रिक्‍त आहेत. संपूर्ण जग आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवनवीन प्रयोग शेतात करत आहे; मात्र रिक्‍त पदांमुळे पाटण तालुक्‍यातील शेतकरी आधुनिक शेती कुणाच्‍या जीवावर करणार ? असा प्रश्‍न उपस्‍थित होत आहे.

तालुक्‍याचे लागवडयोग्‍य क्षेत्र ७४ सहस्र ९६ हेक्‍टर आहे. तालुक्‍यातील शेतकर्‍यांची संख्‍या १ लाख ५० सहस्र असून शेतमजूरांची संख्‍या याहून अधिक आहे. खरीप हंगामावर अवलंबून असलेला शेतकरीवर्ग डोंगर आणि दुर्गम भागात विखुरला गेला आहे. पाटण तालुका भूकंपप्रवण क्षेत्र असल्‍यामुळे तालुक्‍यात छोटे-मोठे उद्योग पहायला मिळत नाहीत. त्‍यामुळे पावसावर अवलंबून राहून शेतकरी बांधव केवळ खरीप पिकांवर कुटुंबाचा गाडा हाकू शकत नाहीत. परिणामी मुंबईसारख्‍या शहरात शेतकरी कुटुंबे स्‍थलांतरीत होतात.  तालुका कृषी अधिकारी पदेही गत अनेक वर्षांपासून रिक्‍त असून या ठिकाणी प्रभारी अधिकारी कामकाज पहात आहेत. तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री यांनी कोट्यवधी रुपयांची प्रशासकीय इमारत संमत केली   आहेत; मात्र याच कार्यालयातील ५० टक्‍के पदे रिक्‍त आहेत.

नेत्‍यांच्‍या गावातच कृषी साहाय्‍यकांची वानवा !

संमत ४ लिपिक पदांपैकी २, अनुरेखक ६, वाहनचालक १, शिपाई ७ पैकी ५ आणि सर्वांत महत्त्वाचे कृषी साहाय्‍यक ४९ पदांपैकी केवळ १९ पदे कार्यरत आहेत. यामध्‍ये माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पाटण, राज्‍य उत्‍पादनशुल्‍क मंत्री तथा जिल्‍हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे मरळी, खासदार श्रीनिवास पाटील यांचे मारुल हवेली आणि माजी मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यांचे कुंभारगाव या गावांना कृषी साहाय्‍यक नाहीत.

संपादकीय भूमिका

एकीकडे तरुणवर्ग नोकरीसाठी वणवण फिरतो आहे, तर दुसरीकडे पदे रिक्‍त रहात आहेत, हे अनाकलीन आणि गंभीर आहे. पदे रिक्‍त राहिल्‍यामुळे कामकाजावर होणार्‍या परिणामाचे दायित्‍व कुणाचे ?