स्थगन प्रस्तावावरील चर्चेस अध्यक्षांच्या नकारामुळे विरोधकांचा सभात्याग !

विधानसभेतून…

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ

मुंबई, १७ जुलै (वार्ता.) – ‘वन्दे मातरम्’ने १७ जुलैपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ झाल्यानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नावर स्थगन प्रस्ताव मांडला. ‘राज्यातील शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात यावी’, अशी त्यांनी मागणी केली; मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत सभात्याग केला.

स्थगन प्रस्ताव मांडतांना बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यातील पावसाची परिस्थिती गांभीर्याने पहायला हवी. ५० टक्क्यांहून अधिक भागात पाऊस नसल्याने केवळ २० टक्के पेरण्या झालेल्या आहेत. शेतकरी अस्वस्थ झाला आहे. अतीवृष्टी आणि गारपीट यांमुळे शेतकर्‍यांची हानी झाली आहे. कांद्याला ३५० रुपये अनुदान घोषित झालेले नाही; आणि त्यांना साहाय्यही मिळालेले नाही. बाजारात मोठ्या प्रमाणात बनावट बियाणे आले आहे. काही टोळ्या सरकारी असल्याचे दाखवून हप्ते वसुली करत आहेत; पण दुर्दैवाने सरकारचे शेतकर्‍यांकडे लक्ष नाही. मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटप, देहली दौरा यांमुळे शेतकरी आणि महाराष्ट्र यांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे.

आम्ही शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

याला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दुबार पेरणीची वेळ आल्यास सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी आहे. आम्ही शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही. बनावट बियाणांच्या विरोधात कायदा अधिक कडक करण्यात येईल.

काही भागांत अल्प पाऊस झाल्याने पेरण्या होऊ शकल्या नाहीत. मागील वर्षीच्या तुलनेत ८० टक्केच पेरण्या झाल्या आहेत. हवामान विभागाने पुढील आठवड्यात पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पेरण्या योग्य प्रकारे होतील. गेल्या वर्षभरात १० सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य शेतकर्‍यांना केले आहे. नियमित कर्ज भरणार्‍या १६ लाख शेतकर्‍यांपैकी फक्त ५० सहस्र जण बाकी आहेत. इतर सर्वांना कर्जवाटप करण्यात आले आहे.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात माजी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली !

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये माजी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वहाण्यात आली. विधान परिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी दिवंगत माजी विधान परिषद सदस्य डॉ. माणिकराव मंगुडकर आणि प्रभाकर दलाल यांच्या निधनाविषयी शोकप्रस्ताव मांडला, तर विधानसभेत विधानसभा अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी दिवंगत सदस्यांविषयीचा शोकप्रस्ताव मांडला. माजी मंत्री, विद्यमान खासदार आणि माजी आमदार गिरीश बापट, विद्यमान लोकसभेचे सदस्य आणि माजी विधानसभा सदस्य सुरेश उपाख्य बाळू धानोरकर, माजी विधानसभा सदस्य शंकरराव वाकुळणीकर (कोळकर), बाबूराव वाघमारे आणि अवसरे या दिवंगत सदस्यांच्या निधनाविषयी विधानसभेत श्रद्धांजली वहाण्यात आली. शोकप्रस्ताव मांडल्यानंतर दोन्ही सभागृहांतील उपस्थित सदस्यांनी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिली.