गोवा : वाहनचालकाला मद्यालयात जाऊन दंडाची रक्कम भरण्याची सूचना देणारा मुख्य पोलीस हवालदार निलंबित

पणजी, १२ जुलै (वार्ता.) – वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी कोलवा पोलीस ठाण्यातील मुख्य पोलीस हवालदार प्रशांत वेळीप यांनी संबंधित वाहनचालकाला ‘मद्यविक्री दुकानात जा आणि दंडाची रक्कम गूगल पे (पैशांचा ऑनलाईन व्यवहार करणारे ॲप) कर’, अशी सूचना केली. या प्रकरणी मुख्य हवालदार प्रशांत वेळीप याला पोलीस खात्याने ११ जुलै या दिवशी सायंकाळी सेवेतून निलंबित केले आहे. ‘द गोवन’ या इंग्रजी वृत्तपत्राने कोलवा येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना मद्यविक्रीच्या दुकानात जाऊन दंड भरण्यास सांगितले जात असल्याचा प्रकार उघडकीस आणल्यानंतर पोलीस खात्याने ही कारवाई केली आहे.

संबंधित वाहनचालकाने रक्कम ‘गूगल पे’ केली; मात्र मुख्य हवालदार वेळीप यांनी त्याला त्याची पोचपावती दिली नाही. ‘द गोवन’ वृत्तपत्राच्या ११ जुलैच्या अंकात यासंबंधी वृत्त प्रसिद्ध झाले. असे प्रकार कोलवा येथे सातत्याने होत असल्याचे वृत्तात म्हटले होते. या वृत्ताची गंभीर नोंद घेऊन पोलिसांनी १२ जुलै या दिवशी वेळीप याच्यावर निलंबनाची कारवाई केली, तसेच या प्रकरणी खात्याच्या अंतर्गत प्राथमिक अन्वेषणही चालू केले आहे. या प्रकरणात १ ‘होम गार्ड’ही गुंतलेला आहे आणि त्याच्यावर कारवाईसाठी ‘होमगार्ड कमांडर’कडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.