संत नामदेव महाराज !

संत नामदेव महाराजांनी जीवनभर भगवंताच्या नामाचा प्रसार केला. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले. संत नामदेवांचे अनुमाने २५०० अभंग असलेली अभंगगाथा प्रसिद्ध आहे. त्यांनी हिंदी भाषेत काही अभंगरचना (अनुमाने १२५ पदे) केली. त्यातील साधारण ६२ अभंग ‘नामदेवजी की मुखबानी’ या शीख पंथाच्या ‘गुरुग्रंथ साहेब’मध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांना मराठी भाषेतील पहिले आत्मचरित्रकार आणि चरित्रकार मानले जाते. संत नामदेवांनी आदि, समाधी आणि तीर्थावळी या गाथेतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वर यांचे चरित्र सांगितले आहे.

दाही दिशा मना धांवसीं तूं सईरा । न चुकती येरझारा कल्पकोटी ।। १ ।।
विठोबाचे नामीं दृढ धरीं भाव । तेर सांडीं वाव मृगजळ ।। २ ।।
भक्तिमुक्ति सिद्धि जोडोनियां कर । करिति निरंतर वळगणें ।। ३ ।।
नामा म्हणे मना धरीं तूं विश्वास । मग गर्भवास नहे तुज ।। ४ ।।

भावार्थ : हे मना, जरी तू दाही दिशा धावलास, तरी जन्म-मृत्यूचे फेरे काळाच्या अंतीही तुला सुटणार नाहीत. विठ्ठलाच्या नामावर दृढ श्रद्धा ठेव ! हेच नाम संसाररूपी मृगजळ नष्ट करून भक्ती, मुक्ती आणि सिद्धी हे निरंतर तुझ्यापुढे हात जोडून उभ्या रहातील. तू विश्वास ठेव, मग तुला गर्भवास (पुनर्जन्म) नाही.

संत नामदेवांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील पायरीवर समाधी घेतली. आपला अहं कधीच वाढू नये; म्हणून संत नामदेव भगवंताच्या चरणीच विलीन झाले. संत नामदेवांनी समाधी घेतलेली ही पायरी ‘नामदेव पायरी’ या नावाने प्रसिद्ध आहे.