दीड कोटींचे अनधिकृत कपाशी बियाणे जप्त !
नागपूर – राज्यातील गुणवत्ता नियंत्रण पथकांनी कारवाई करत आतापर्यंत खते, बियाणे आणि कीटकनाशके यांचा एकूण ३४०.१५ मे. टन साठा जप्त करण्यात आला असून ३५६ विक्रेत्यांचे परवाने रहित करण्यात आले आहे, तर १ सहस्र २८९ विक्रेत्यांना विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहे. ही कारवाई यापुढेही चालू रहाणार आहे, अशी माहिती राज्याचे संचालक (निविष्ठा आणि गुणनियंत्रण) अविनाश पाटील यांनी ५ जुलै या दिवशी येथे दिली. राज्यात तणनाशक बियाण्याच्या विक्रीला अनुमती नाही.
अधिक दराने कापूस बियाण्यांची विक्री केल्याविषयी ४ बियाणे उत्पादक आस्थापनांना ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात आली आहे. राज्यात या हंगामासाठी २ कोटी ३ लाख कापूस बियाण्यांची पाकिटे पुरवण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार २१ जूनपर्यंत १ कोटी ८४ लाख कापूस बियाणे पाकिटांचा पुरवठा उत्पादक आस्थापनांद्वारे करण्यात आल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. चालू खरीप हंगामात ९ जिल्ह्यांत अनधिकृत कापूस बियाण्यांची १ कोटी ५३ लाख ५७ सहस्र रुपयांची ३ सहस्र ७४२ पाकिटे आणि १४ सहस्र २३१ सुटे बियाणे जप्त करण्यात आले आहे.
राज्यात तणप्रतिबंधक बीटी बियाण्यांच्या विक्रीवर बंदी असली, तरी शेजारील राज्यातून आणून महाराष्ट्रात बियाण्यांची विक्री केली जाते. अनेक ठिकाणी घरांमध्ये साठा करून गुपचुप विक्री करण्यात येते. कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकांच्या वतीने अशा चोरट्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे.