सिंधुदुर्ग : धोकादायक असूनही स्वत:च्या लाभासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील दुभाजक फोडण्याचे प्रकार 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कायदेशीर कारवाईचा अवलंब

कुडाळ – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील दुभाजक अवैधपणे तोडणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतली आहे. या अनुषंगाने ३ ठिकाणी दुभाजक तोडणार्‍या अज्ञातांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सावंतवाडी उपविभागाचे प्रभारी उपअभियंता मुकेश साळुंखे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. (रस्त्यांचे दुभाजक कोण फोडतो, हे समजण्यासाठी स्थानिक पातळीवरच जागरूकता असणे आवश्यक आहे ! दुभाजक तोडण्यासारखी कृत्ये करणार्‍यांवर वचक बसेल, अशी कठोर कारवाई प्रशासनाने करणे आवश्यक आहे ! – संपादक)

२६ ते ३० जून २०२३ या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावर काही लोकांनी त्यांच्या सोयीच्या दृष्टीने अवैधपणे दुभाजक तोडले होते. हे दुभाजक पूर्वस्थितीत करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार ३० जून या दिवशी महामार्गावरील पावशी येथे ४ ठिकाणी, तर तेर्सेबांबर्डे श्री माऊली मंदिरनजीक एक ठिकाणी तोडलेला दुभाजक पुन्हा बंद करून सुस्थितीत करण्यात आला होता; मात्र ४ जुलै या दिवशी पावशी येथे ४ ठिकाणी बंद करण्यात आलेल्या दुभाजकांपैकी २ ठिकाणी आणि तेर्सेबांबर्डे येथील ‘रत्ना एंटरप्रायझेस’समोरील दुभाजक तोडल्याचे निदर्शनास आले. तोडलेले दुभाजक पोलीस बंदोबस्तात बंद करूनही पुन्हा ते तोडण्याचे प्रमाण वाढत आहेत. त्यामुळे असे प्रकार करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची भूमिका राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने घेतली आहे.