वर्ष २०२२ मध्‍ये गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी आश्रमाच्‍या प्रवेशद्वाराच्‍या ठिकाणी काढलेल्‍या श्री गुरुपादुकांच्‍या रांगोळीचा आध्‍यात्मिक भावार्थ !

वर्ष २०२२ मध्‍ये ‘गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी रामनाथी आश्रमाच्‍या प्रवेशद्वाराच्‍या ठिकाणी एका उमललेल्‍या कमळाच्‍या पाकळ्‍यांच्‍या मध्‍यभागी श्री गुरुपादुकांची रंगीत रांगोळी काढली होती. ही रांगोळी पहात असतांना तिचा मला उमजलेला भावार्थ पुढीलप्रमाणे आहे.

१. रांगोळीतील गुरुपादुकांचे आध्‍यात्मिक महत्त्व

पादुकांच्‍या ठिकाणी श्री अनंतानंद साईश यांच्‍या पादुका असल्‍याचे जाणवले. या पादुकांमधून चैतन्‍यमय ज्ञानाच्‍या पिवळसर रंगाच्‍या लहरींचे वायूमंडलात प्रक्षेपण होत होते. या पादुका प्रत्‍यक्ष असून त्‍यांची हालचालही होतांना जाणवली.

कु. मधुरा भोसले

२. श्रीगुरुपादुकांच्‍या भोवती असणार्‍या पिवळ्‍या रंगाच्‍या वलयाचा आध्‍यात्मिक भावार्थ

श्री गुरुपादुकांच्‍या भोवती निर्माण झालेल्‍या ज्ञानमय तेजाचे वलय रांगोळीमध्‍ये पिवळ्‍या रंगाच्‍या वलयाच्‍या स्‍वरूपात दाखवले आहे.

३. कमळाच्‍या १२ पाकळ्‍यांच्‍या २ आकृतींचा आध्‍यात्मिक भावार्थ

पिवळ्‍या रंगाच्‍या वलयाच्‍या बाहेर कमळाच्‍या १२ पाकळ्‍यांच्‍या २ आकृती आहेत. द्वादश पाकळ्‍यांची २ कमळे ही ‘ज्ञानकमळाचे प्रतीक आहे. पहिले आतील पाकळ्‍यांचे कमळ ‘श्री गुरूंच्‍या कृपेमुळे साधक किंवा शिष्‍य यांचे ज्ञानकमळ उमलून त्‍यांना आत्‍मज्ञानाची अनुभूती येते’, या दिव्‍य घटनेचेे प्रतीक आहे. बाहेरील आणखी १२ पाकळ्‍यांचे कमळ हे ‘श्री गुरूंच्‍या कृपेमुळे साधक किंवा शिष्‍य यांचे ज्ञानकमळ उमलून त्‍यांना ब्रह्मज्ञानाची अनुभूती येते’, या दिव्‍य घटनेचे प्रतीक आहे.

४. निळ्‍या रंगाच्‍या वलयाचा आध्‍यात्मिक भावार्थ

याच्‍या बाहेर निळसर रंगाचे वलय आहे. हे वलय भक्‍तीचे आहे. ज्‍या साधकाच्‍या हृदयात श्री गुरूंप्रतीची भक्‍ती जागृत होते, त्‍याच्‍यावर श्री गुरूंची दिव्‍य कृपा होऊन त्‍याच्‍या हृदयात श्री गुरुपादुकांची सूक्ष्मातून स्‍थापना होते. या गुरुपादुकांचे नित्‍य स्‍मरण, पूजन आणि वंदन केल्‍यामुळे या पादुकारूपी निर्गुण-सगुण गुरुतत्त्वाचा कृपावर्षाव साधकावर होऊन त्‍याचे ज्ञानकमळ उमलते. त्‍यामुळे त्‍याला प्रथम आत्‍मज्ञान (आत्‍म्‍याचे ज्ञान) आणि नंतर ब्रह्मज्ञान (अखिल ब्रह्मांडाचे म्‍हणजे चराचर सृष्‍टीचे ज्ञान) प्राप्‍त होते.

अशा प्रकारे श्री गुरुपादुकांची स्‍थापना साधकाच्‍या हृदयात झाल्‍यावर त्‍याच्‍या हृदयात साक्षात् श्री गुरूंचेच दिव्‍य आणि चैतन्‍यदायी स्‍थान निर्माण होऊन साधकाला आत्‍मज्ञानाची आणि नंतर ब्रह्मज्ञानाची प्राप्‍ती होते. त्‍यामुळे या रांगोळीच्‍या खाली लिहिलेल्‍या ‘नमस्‍कार साष्‍टांग गुरुपादुकांना’ या वाक्‍यातून श्री गुरूंच्‍या महात्‍म्‍याची प्रचीती येते.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.७.२०२२)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक