फोंडा (गोवा) येथील पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांच्या संतसन्मान सोहळ्याचे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

१२.३.२०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण या सूक्ष्म परीक्षणाचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग येथे दिला आहे. 

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/891880.html

पू. (सौ.) ज्योती ढवळीकर

८. संतपदाची घोषणा झाल्यानंतर पू. (सौ.) ढवळीकर यांनी शिष्यभावात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना नमस्कार करून समष्टीला चैतन्याचा प्रसाद देणे

संतपदाची घोषणा झाल्यानंतर पू. (सौ.) ज्योती ढवळीकर काही वेळ भावसमाधीत होत्या. नंतर त्यांनी डोळे उघडले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना नमस्कार केला. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी पू. (सौ.) ढवळीकर यांना आलिंगन दिले. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि पू. (सौ.) ढवळीकर यांच्याकडून प्रकाशस्वरूपात पुष्कळ चैतन्य उपस्थित समष्टीत प्रक्षेपित झाले. या संदर्भात देवाने सांगितले, ‘पू. (सौ.) ढवळीकर भावसमाधीत राहून श्री गुरु देत असलेला आनंद अनुभवत होत्या; मात्र त्यांची समष्टी साधना असल्याने त्या केवळ आनंद अनुभवण्याच्या टप्प्याला सीमित न रहाता त्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिष्यभावाच्या स्तरावर आल्या. त्यांनी भानावर येऊन गुरुस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना नमस्कार केला आणि त्यांना व्यष्टी आनंदासह श्री गुरूंचे कृपाशीर्वादही मिळाले अन् त्यांनी समष्टीला चैतन्याचा प्रसाद दिला.’

श्री. निषाद देशमुख

९. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा आशीर्वादरूपी संदेश श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी वाचून दाखवतांना दिसलेले दृश्य 

९ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हातातून पांढर्‍या रंगाचा प्रकाशझोत प्रक्षेपित होऊन तो पू. (सौ.) ढवळीकर यांच्या आज्ञाचक्रात जाणे आणि पू. (सौ.) ढवळीकर यांच्यामधील आध्यात्मिक क्षमतांमध्ये वृद्धी होणे : या सोहळ्यानिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेला आशीर्वादरूपी संदेश श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी वाचून दाखवला. त्या वेळी मला सूक्ष्मातून दिसले, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले त्यांचा उजवा हात उचलून आशीर्वाद देत आहेत. गुरुदेवांच्या हातातून पांढर्‍या रंगाचा प्रकाशझोत प्रक्षेपित होऊन तो थेट पू. (सौ.) ढवळीकर यांच्या आज्ञाचक्रात जात आहे. त्यामुळे त्यांचे आज्ञाचक्र आणि अन्य कुंडलिनीचक्रे जागृत होत आहेत.’ या संदर्भात देवाने सांगितले, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश, म्हणजे आकाशतत्त्वयुक्त आशीर्वाद ! या आशीर्वादामुळे पू. (सौ.) ढवळीकर यांच्यामधील ज्ञान, भक्ती आणि वैराग्य, तसेच क्रियाशक्ती म्हणजे विविध आध्यात्मिक क्षमता यांमध्ये वृद्धी होत आहे. यामुळे त्यांची पुढील आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी साहाय्य होणार आहे. याची दृश्य प्रक्रिया म्हणजे त्यांची सर्व कुंडलिनीचक्रे जागृत होतांना दिसणे.’

पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेणार्‍या सौ. लता ढवळीकर !

‘पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांच्या संतसन्मान सोहळ्यात त्यांच्या जाऊबाई सौ. लता दीपक ढवळीकर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६५ वर्षे) याही व्यासपिठावर उपस्थित होत्या. त्यांच्या संदर्भात देवाने पुढील सूत्रे सांगितली.

सौ. लता ढवळीकर

१. मायेतील नातेसंबंध आध्यात्मिक स्तरावर अनुभवल्यामुळे अधिक उच्च भावाच्या स्तरावर जाता येणे

‘पू. (सौ.) ज्योती ढवळीकर आणि सौ. लता ढवळीकर यांच्यात मायेतील बंधन म्हणजे देवाण-घेवाणीचे नाते होते; मात्र दोघींनी साधनेने त्यावर मात करून आध्यात्मिक नाते निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याचा त्यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ झाला. पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांच्यात व्यक्त भाव अधिक प्रमाणात होता, तर सौ. लता ढवळीकर यांच्यात अव्यक्त भाव अधिक प्रमाणात होता. त्यांच्यातील आध्यात्मिक नाते आणि साधना यांमुळे पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांच्यात व्यक्त-अव्यक्त भाव निर्माण झाला, तर सौ. लता ढवळीकर यांच्यात अव्यक्त-व्यक्त भाव निर्माण झाला. त्यामुळे कर्करोगासारख्या कठीण आजारातही सौ. लता ढवळीकर यांना व्यक्त भावामुळे देवाचे साहाय्य घेऊन आजारपणावर मात करणे सोपे झाले. यांतून नातेवाईक विविध प्रकृतींचे असले, तरीही साधना करणारे नातेवाईक जीवनात असण्याचे महत्त्व लक्षात आले.

२. प्रांजळपणे कृतज्ञता व्यक्त करून गुरुतत्त्वाचा कृपाशीर्वाद मिळवणे

पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांचे संतपद घोषित झाल्यानंतर सौ. लता ढवळीकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करतांना सांगितले, ‘‘आमच्या कुटुंबात संतांची परंपरा आहे. पू. (सौ.) ज्योतीताई यांनी ती परंपरा पुढे चालवली आहे. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.’’ तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘पुढे ही परंपरा तुम्हाला चालवायची आहे.’’ त्यांचे बोलणे ऐकून सौ. लता ढवळीकर यांनी नम्रपणे नमस्कार केला. त्या वेळी गुरुतत्त्वाकडून मोठ्या प्रमाणात आशीर्वादाचा झोत सौ. लता ढवळीकर यांच्या दिशेने प्रक्षेपित झाला. या संदर्भात देवाने सांगितले, ‘सौ. लता ढवळीकर यांनी अगदी प्रांजळपणे कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे त्यांच्या पुढील आध्यात्मिक प्रगतीसाठी श्री गुरूंचा संकल्प झाला आणि त्यांना गुरुतत्त्वाकडून कृपाशीर्वादही मिळाले.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.२.२०२५)

१०. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मुलाखत घेण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीमुळे साधकांनी भावस्थिती अनुभवणे आणि त्यांच्या मनावर साधनेचे संस्कार होणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पू. (सौ.) ज्योती ढवळीकर आणि सौ. लता ढवळीकर (पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांच्या जाऊबाई, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६५ वर्षे) यांची वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मुलाखत घेतली. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी उपयुक्त प्रश्न विचारून पू. (सौ.) ज्योती ढवळीकर आणि सौ. लता ढवळीकर यांना बोलते केले. त्यांच्याकडून मिळालेल्या उत्तरांचे विश्लेषण करून श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ त्यात ‘गुरूंची कृपा आणि पू. (सौ.) ज्योती ढवळीकर अन् सौ. लता ढवळीकर यांचे साधनेचे प्रयत्न किंवा त्यांचे वैशिष्ट्य कसे आहे ?’, यांविषयी स्पष्ट करून सांगत असत. याचे एक उदाहरण म्हणजे, ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी विचारले, ‘‘तुम्हा जावांमध्ये कधी भांडणे झाली का आणि आताही होतात का ?’’ त्या वेळी पू. (सौ.) ज्योती ढवळीकर म्हणाल्या, ‘‘हो. आरंभी आमच्यात भांडणे होत असत. त्या वेळी एकमेकींची मते न पटल्याने आम्ही एकमेकींशी बोलत नसू. हळूहळू साधनेने ते न्यून होऊन आमचे एकामेकींना समजून घेण्याचे प्रमाण वाढले.’’ तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी साधकांना उद्देशून सांगितले, ‘‘साधना केल्यावर व्यक्तीगत जीवनातही स्वभावदोष अल्प होऊन कशा प्रकारे गुणवृद्धी होण्यास साहाय्य होते, ते स्पष्ट होते.’’

या प्रक्रियेचा समष्टी स्तरावर लाभ असा झाला की, ‘कार्यक्रमाच्या आरंभी उपस्थित साधकांची भावावस्था केवळ२० टक्के प्रमाणात होती. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी घेतलेल्या अशा मुलाखतीमुळे साधकांची भावावस्था ५० टक्के प्रमाणात झाली. साधकांची भावस्थिती वाढल्याने त्यांच्या मनावर सहजतेने साधनेचे संस्कार होण्यास साहाय्य झाले, तसेच त्यांच्यामधील भाव वाढल्याने त्यांना संतसन्मान सोहळ्यातून प्रक्षेपित होत असलेले चैतन्यही सहजतेने ग्रहण करणे शक्य झाले.’

११. कृतज्ञता 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सांगतात, ‘‘साधक पृथ्वीच्या पाठीवर कुठेही राहून नियमित साधना करत असला, तरीही त्याची आध्यात्मिक प्रगती होते.’’ ‘श्री गुरूंनी सांगितलेला हा सिद्धांत आचरणात आणून संसारात राहून आपत्काळातही संतपद गाठण्याचा विक्रम करणार्‍या थोर संत म्हणजे पू. (सौ.) ज्योती ढवळीकर ! अशा थोर संतांच्या संतसन्मान सोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण करण्याची आणि त्यांच्या संदर्भात दोन शब्द लिहिण्याची संधी मला मिळाली’, याबद्दल मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

(समाप्त)

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.२.२०२५)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक