श्री शनिशिंगणापूर देवस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍थेची सव्‍वाचार लाखांची फसवणूक !

नेवासा (जिल्‍हा अहिल्‍यानगर) – येथील श्री शनिशिंगणापूर देवस्‍थानला एका भामट्याने ४ लाख २८ सहस्र रुपयांना फसवल्‍याची घटना घडली आहे. या प्रकरणी योगेश वाबळे यांनी दिलेल्‍या तक्रारीवरून गोवा येथील आरोपी जगदीश भट याच्‍यावर गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. महाराष्‍ट्रातील कलाकुसरीचे काम करणारे कारागिर सोडून गोव्‍यातील हा जगदीश भट कुणी शोधला ? त्‍याला कुणाच्‍या शिफारशीने काम देण्‍यात आले ? याची चर्चा आता श्री शनिशिंगणापूर, सोनई परिसरात होत आहे.

वाबळे या तरुणाने तक्रारीत म्‍हटले आहे की, श्री शनैश्‍वर देवस्‍थानचे दीपस्‍तंभावर ‘ब्रांझ’ आणि ‘गोल्‍ड प्‍लेटिंग’चा कलश बसवण्‍यासाठी ४ लाख २८ सहस्र रुपयांचा धनादेश आरोपीला देऊनही कळसाचे काम त्‍याने अद्यापपर्यंत प्रामाणिकपणे पूर्ण केलेले नाही. आरोपीने तक्रारदार आणि विश्‍वस्‍त, प्रशासकीय अधिकारी श्री शनैश्‍वर देवस्‍थान, शनिशिंगणापूर यांचा विश्‍वास संपादन करून फसवणूक केली आहे.

संपादकीय भूमिका 

कलियुगात मनुष्‍याची पातळी इतकी खालावली आहे की, तो देवालाही फसवायला मागेपुढे पहात नाही, मनुष्‍याचे याहून दुसरे अधःपतन काय असू शकते ? यावरून समाजाला धर्मशिक्षण देणे का आवश्‍यक आहे, हे लक्षात येते !