सध्या वाढदिवस साजरा केल्याची छायाचित्रे सामाजिक माध्यमातून प्रसारित करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. गेले काही दिवस तलवारीचा वापर करून केक कापण्याची पद्धत समाजात रूढ होत आहे. अशा काही घटना आतापर्यंत समोर आल्या असून अनेक जणांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यात गल्लीबोळातील भाऊ, दादांपासून बड्या लोकप्रतिनिधींपर्यंत अनेकांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात पुणे येथे एका तरुणाने चारचाकी वाहनाच्या टपावर बसून तलवारीने केक कापला आणि समवेत असलेल्या मित्रांनी धिंगाणा घातला, फटाके फोडले. परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे तलवारीने केक कापल्याप्रकरणी नुकताच ८ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
‘तलवारीने केक कापणे, हा गुन्हा आहे’, हे ठाऊक असूनही असे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. याचा अर्थ समाजात पोलिसांचा धाक उरलेला नाही. विनापरवाना शस्त्र बाळगणे, हा भारतीय दंड संहिता कलम १४३/१४४ अंतर्गत आणि शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा ठरतो. पहिली घटना घडताक्षणी ते कृत्य करणार्यांना कठोर शिक्षा झाली असती, तर अशा घटनांना प्रतिबंध लागला असता. याचा पोलीस प्रशासनाने गांभीर्याने विचार करायला हवा. ‘केक कापून वाढदिवस साजरा करणे’, ही भारतीय संस्कृती नाही. ते पाश्चात्त्य विकृतीचे अंधानुकरण आहे. भारतीय संस्कृतीनुसार ताटात ठेवलेले अन्न कापणे अयोग्य आहे. आपण पुरणपोळीचे हाताने हळूवार दोन भाग करतो. कात्री वा सुरीने कापत नाही. हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. ‘तलवार’ हा शब्द उच्चारला की, डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारख्या तेजस्वी लढवय्यांची मालिका उभी रहाते. या पार्श्वभूमीवर कुणी ‘हातात तलवार घेऊन केक कापणे’, हा ‘महाराष्ट्र धर्मा’साठी आपले घरदार, संसार, संपूर्ण जीवनच पणाला लावणार्या व्यक्तींचा घोर अपमान वाटतो. अशा व्यक्तींच्या घरातील वडीलधार्यांनी त्यांच्यावर किमान आवश्यक संस्कारही केले नाहीत, याची त्यांना खंत वाटायला हवी. धर्मशास्त्रानुसार औक्षण करूनच वाढदिवस साजरा करायला हवा. तिथीनुसार वाढदिवस साजरा करतांना औक्षण केल्याने देवतेचे तत्त्व ज्याचा वाढदिवस आहे, त्याला मिळते. औक्षण करतांना श्रीरामरक्षेतील ‘शिरो मे राघवः पातु’ ते ‘विजयी विनयी भवेत’पर्यंतचे श्लोक म्हणावेत. त्यामुळे संपूर्ण शरिराभोवती संरक्षणकवच निर्माण होते.’
– श्री. नीलेश पाटील, जळगाव