‘गुरुकृपाही केवलं शिष्‍यपरममंगलम् ।’ याची दिव्‍यानुभूती प्रत्‍येक क्षणी घेणारे आणि विकलांग असूनही सतत आनंदावस्‍थेत असलेले सनातनचे संत पू. सौरभ जोशी !

‘गुरुकृपाही केवलं शिष्‍यपरममंगलम् ।’
(‘केवळ गुरुकृपेनेच शिष्‍याचे जीवन परम मंगल होते’)

‘गुरुपौर्णिमेच्‍या कालावधीत गुरूंचे महत्त्व विशद करणारी ‘सनातन प्रभात’मध्‍ये प्रसिद्ध झालेली सूत्रे आणि पू. सौरभदादांच्‍या साधनाप्रवासाच्‍या संदर्भात मी त्‍या अनुषंगाने अनुभवलेले त्‍यांचे महत्त्व परात्‍पर गुरुदेवांच्‍या सुकोमल चरणी अर्पण करतो. २७ जून या दिवशी या लेखातील काही भाग आपण पाहिला. आज उर्वरित सूत्रे पाहूया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/696171.html


पू. सौरभ जोशी

सूत्र क्र. ६. – गुरु हे सर्वज्ञ असल्‍याने ते शिष्‍याला सतत शिकवू शकतात.

६ अ. पू. सौरभदादांना पूर्वी बोलता येत नसणे आणि आता ते मराठीच नाही, तर काही इंग्रजी शब्‍दही बोलू शकत असणे : पू. दादांना पूर्वी बोलता येत नव्‍हते. आता ते काही शब्‍द व्‍यवस्‍थित बोलतात, तर काही शब्‍द बोलण्‍याचा प्रयत्न करतात. ते इंग्रजी भाषिक साधक भेटायला आल्‍यावर त्‍यांच्‍याशी इंग्रजी भाषेतही एखादा शब्‍द बोलतात, उदा. ‘नाईस’, ‘हॅलो’ इत्‍यादी. पू. दादांसाठी एका साधिकेने खाऊ आणला होता. त्‍या वेळी पू. दादांनी हातात खाऊ घेतला आणि ते ‘‘आय लाईक’’, असे म्‍हणाले.

६ आ. मनातील संघर्ष ओळखून त्‍याचे उत्तर देणे : माझ्‍या मनात पू. दादांच्‍या संदर्भात घडलेल्‍या एका प्रसंगामुळे संघर्ष चालू होता. काही केल्‍या माझ्‍या मनातील तो विचार जात नव्‍हता; म्‍हणून मी मनातूनच पू. दादांच्‍या चरणी प्रार्थना केली, ‘पू. दादा, मला यातून तुम्‍हीच बाहेर काढा. मी काय करू ?’ तेव्‍हा ते म्‍हणाले, ‘प्रारब्‍ध.’ मला त्‍यांचे ते बोलणे ऐकून आश्‍चर्य वाटले. ‘जीवनातील प्रत्‍येक प्रसंगाकडे ‘प्रारब्‍धाचा भाग’ म्‍हणून बघायला शिका’, असेच त्‍यांनी मला त्‍यातून शिकवले.

सूत्र क्र. ७. – कासवी जशी केवळ दृष्‍टीने पिल्‍लांचे पोषण करते, तद्वत् गुरु केवळ कृपावलोकनाने शिष्‍याचा उद्धार करतात.

श्री. संजय जोशी

आम्‍हा कुटुंबियांची परात्‍पर गुरुदेवांशी पहिली भेट झाली तेव्‍हा गुरुदेव म्‍हणाले, ‘‘आपल्‍याला सौरभला जगभर पोेचवायचे आहे.’’ गुरुदेवांच्‍या त्‍या करुणामय आणि प्रेमळ कृपाकटाक्षाने पू. दादांचे जीवनच पालटून गेले आणि त्‍या क्षणीच पू. दादांचा उद्धार झाला. नंतर ‘केवळ औपचारिकता म्‍हणून आणि जगाला समजावे, यासाठी गुरुदेवांनी पू. दादांना ‘संत’ म्‍हणून घोषित केले असावे’, असे मला वाटते.

सूत्र क्र. ८. – श्री शंकराचार्यांनी म्‍हटले आहे, ‘‘ज्ञानदान करणार्‍या सद़्‍गुरूंना शोभेल, अशी उपमा या त्रिभुवनात कुठेही नाही.’’

गुरुदेवांची ही कृपा केवळ पू. सौरभदादांच्‍या बाबतीत आहे, असे नाही, तर अनेक साधकांना गुरुदेवांनी प्रथम साधक, नंतर संत आणि आता सद़्‍गुरु बनवले आहे. आता ते त्‍यांची वाटचाल ‘परात्‍पर गुरु’ या पदाकडे करवून घेत आहेत. याचाच अर्थ ‘गुरुदेव सर्वांना त्‍यांच्‍यासारखेच बनवत आहेत’; म्‍हणूनच गुुरुदेवांना देण्‍यासारखी कोणतीही उपमा या त्रिभुवनात कुठेही नाही.

सूत्र क्र. ९. – चंद्र उगवताच चंद्रकांत मण्‍याला पाझर फुटतो, त्‍याप्रमाणे केवळ अंतःकरणातील दयाद्रवाने गुरु शिष्‍याला तारतात.

जगाच्‍या दृष्‍टीने पू. सौरभदादांसारख्‍या निरुपयोगी जिवाला या जगात गुरुदेवांविना कुणी जवळ केले असते ? गुरुदेवांच्‍या चरणी करोडपती साधकांपासून ते गरिबातील गरीब साधकही आला आहे आणि गुरुदेवांनी अशा अनेक साधकांची जीवनरूपी नाव या भवसागरातून पार केली आहे. हे केवळ गुरुदेवांच्‍या कृपाळू, दयाळू आणि दयाघन प्रीतीस्‍वरूप अंतःकरणामुळेच शक्‍य होत आहे. पू. सौरभदादांनाही गुरूंच्‍या दयेनेच तारले आहे.

सूत्र क्र. १०. – मंद प्रारब्‍ध भोगण्‍याची क्षमता मध्‍यम साधनेने, मध्‍यम प्रारब्‍ध भोगण्‍याची क्षमता तीव्र साधनेने, तर तीव्र प्रारब्‍ध भोगण्‍याची क्षमता केवळ गुरुकृपेनेच प्राप्‍त होते.

‘पू. दादा बहुविकलांग असल्‍याने त्‍यांचे जीवन म्‍हणजे तीव्र प्रारब्‍धच आहे’, याविषयी निश्‍चिती पटते आणि केवळ गुरुदेवांच्‍या कृपेमुळेच हे तीव्र प्रारब्‍धही सहजतेने आणि आनंदाने भोगण्‍याची क्षमता पू. दादांमध्‍ये निर्माण झाली आहे.

सूत्र क्र. ११. – सहजध्‍यान चालू करण्‍याकरता गुरूंची आवश्‍यकता भासते; कारण केवळ त्‍यांचीच अंतःस्‍थिती उच्‍च कोटीची असते. गुरूंमुळे चालू झालेले हे सहजध्‍यानच शेवटी योग्‍याला पूर्णत्‍व प्राप्‍त करून देऊ शकते.

पू. सौरभदादा अनेक वेळा त्‍यांच्‍या खोलीतील गुरुदेवांच्‍या छायाचित्राकडे एकटक पहात असतात. त्‍या वेळी त्‍यांना हाक मारली किंवा खोलीत कुणाची कितीही हालचाल होत असली, तरी त्‍यांना त्‍याची जाणीव नसते. थोड्या वेळाने पुन्‍हा ते मूळ स्‍थितीत येऊन नेहमीप्रमाणे वागू लागतात. त्‍यांचा ‘श्री’ ‘श्री’ असा गुरुदेवांचा सतत धावा चालू असतो. गुरुदेवांमुळे चालू होत असलेल्‍या या सहजध्‍यानानेच पू. दादांना पूर्णत्‍व प्राप्‍त करून दिले आहे.

सूत्र क्र. १२. – शिष्‍यात मुमुक्षुत्‍व असले, तर त्‍याच्‍या चुका झाल्‍या, तरी गुरु त्‍याला सांभाळून घेतात. शिष्‍य कितीही अविचारी, हट्टी, अशिक्षित वा अयोग्‍य असला, तरीही त्‍याला सांभाळून घेणे, हेच गुरूंचे खरे कौशल्‍य होय ! शिष्‍य जरी गुरूंवर पुष्‍कळ रागावला असला, तरी गुरु मात्र त्‍याला सांभाळून घेतात.

१२ अ. पू. सौरभदादा गत जन्‍मातील चुकीचे प्रायश्‍चित्त भोगत असणे : पू. दादांना भेटण्‍यासाठी आलेल्‍या काही संतांनी ‘पू. दादा गतजन्‍मात त्‍यांच्‍याकडून झालेल्‍या काही चुकांचे प्रायश्‍चित्त भोगत आहेत’, असे सांगितले. याचा अर्थ पू. दादांकडून चुका झालेल्‍या असल्‍या, तरी त्‍यांच्‍यातील तीव्र मुमुक्षत्‍वामुळे गुरुदेवांनी त्‍यांना क्षमा करून या जन्‍मी संतपदावर विराजमान केले आहे.

१२ आ. गुरुदेव सांभाळून घेणार असल्‍याविषयी पू. सौरभदादांची श्रद्धा असणे : काही वेळा पू. दादा फार खट्याळपणा करतात. कधी कधी पुष्‍कळ मोठ्याने ओरडतात किंवा कधी पोट दुखेपर्यंत हसतात. त्‍यांना त्रास होऊ नये; म्‍हणून मी त्‍यांना विचारतो, ‘पू. दादा, ‘श्रीं’ना सांगू का तुमचा हा खट्याळपणा ?’ त्‍यावर ते लगेच ‘हो’ म्‍हणतात; कारण त्‍यांना ठाऊक असते, ‘ते खट्याळपणा का करतात, हे गुरुदेवांना ठाऊक असल्‍याने ते त्‍यांना सांभाळूनच घेणार आहेत.’

सूत्र क्र. १३. – पिता हा पुत्राला केवळ जन्‍म देतो, तर गुरु त्‍याची जन्‍म-मरणातून सुटका करतात; म्‍हणून पित्‍यापेक्षाही गुरूंना श्रेष्‍ठ मानले आहे.

मी पू. सौरभदादांना केवळ जन्‍म दिला आहे; मात्र गुरुदेवांनी पू. दादांंना त्‍यांच्‍या चरणांशी घेतले आहे. त्‍यांचा सांभाळही गुरुदेवच करत आहेत. एवढेच नव्‍हे, तर त्‍यांनी त्‍यांची जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून सुटकाही केली आहे. ‘पू. दादांचा जन्‍म आमच्‍या पोटी होणे’, ही त्‍या जगन्‍नियंत्‍या परमेश्‍वराची, म्‍हणजेच गुरुदेवांचीच कृपा होती.

कृतज्ञता

‘गुरुमाऊलीने (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी) आमच्‍या पोटी संतरत्न जन्‍माला घातले आणि आम्‍हाला संतसेवेची संधी दिली. ‘संतांच्‍या जीवनाच्‍या माध्‍यमातून गुरु कार्य कसे करतात ?’ हे लक्षात आणून दिले आणि ते लिहूनही घेतले, यासाठी मी गुरुदेवांच्‍या चरणी शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– श्री. संजय जोशी, कुडाळ, जिल्‍हा सिंधुदुर्ग

(समाप्‍त)