‘गुरुकृपाही केवलं शिष्‍यपरममंगलम् ।’ याची दिव्‍यानुभूती प्रत्‍येक क्षणी घेणारे आणि विकलांग असूनही सतत आनंदावस्‍थेत असलेले सनातनचे संत पू. सौरभ जोशी !

‘गुरुकृपाही केवलं शिष्‍यपरममंगलम् ।’
(‘केवळ गुरुकृपेनेच शिष्‍याचे जीवन परम मंगल होते’)

‘गुरुपौर्णिमा जवळ आली की प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्‍ये ‘गुरुपौर्णिमेला … दिवस शिल्लक आहेत ’, या मथळ्‍याखाली ‘गुरूंचे महत्त्व, गुरु शिष्‍याचा सांभाळ कसा करतात ? शिष्‍याला कसे घडवतात ?’ आदीविषयक उद़्‍बोधक सूत्रे प्रसिद्ध होतात. ही सूत्रे वाचतांना ‘साधकांच्‍या जीवनात गुरुकृपा कशी कार्यरत असते ?’, याची जाणीव गुरुदेवांनी मला करून दिली.  गुुरुपौर्णिमेच्‍या कालावधीत गुरूंचे महत्त्व विशद करणारी ‘सनातन प्रभात’मध्‍ये प्रसिद्ध झालेली सूत्रे (ठळक शब्‍दांत दिली आहेत.) आणि पू. सौरभदादांच्‍या साधनाप्रवासाच्‍या संदर्भात मी त्‍या अनुषंगाने अनुभवलेले त्‍यांचे महत्त्व परात्‍पर गुरुदेवांच्‍या सुकोमल चरणी अर्पण करतो.

पू. सौरभ जोशी

सूत्र क्र. १. – तीव्र मुमुक्षत्‍व किंवा गुरुप्राप्‍तीची तीव्र तळमळ या एका गुणामुळे गुरुप्राप्‍ती लवकर होते आणि गुरुकृपेत सातत्‍य रहाते !

‘पू. सौरभदादा बहुविकलांग आहेत. त्‍यामुळे त्‍यांना स्‍वतःचे काहीच करता येत नाही; परंतु तीव्र मुमुक्षत्‍व आणि गुरुप्राप्‍तीची तीव्र तळमळ या गुणांमुळे पू. सौरभदादांच्‍या जीवनात फार लवकरच ‘श्रीं’चे (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना पू. सौरभदादा ‘श्री’ या नावाने संबोधतात.) पदार्पण झाले आणि तेव्‍हापासून ते श्रींच्‍याच कृपाछत्रछायेखाली जीवन व्‍यतीत करत आहेत.

सूत्र क्र. २. – निरनिराळ्‍या योगमार्गांनी साधना करण्‍यात कित्‍येक वर्षे फुकट न घालवता, म्‍हणजे या सर्व मार्गांना डावलून ‘गुरुकृपा लवकर प्राप्‍त कशी करायची ?’, ते ‘गुरुकृपायोगा’त साधक शिकतो. त्‍यामुळे साहजिकच या मार्गाने जलद उन्‍नती होते.

‘काही संतांनी पू. सौरभदादा गतजन्‍मी योगी होते’, असे सांगितले. पुरीपीठाचे शंकराचार्य जगद़्‍गुरु निश्‍चलानंद सरस्‍वती यांनीही पू. दादांना पाहिल्‍यावर ‘ये तो योगी है !’, असे उद़्‍गार काढले होते. याचा अर्थ पू. सौरभदादा यापूर्वीच्‍या जन्‍मातही साधना करत होते. त्‍या वेळी त्‍यांचा साधनामार्ग कदाचित् वेगळा असेल; परंतु या जन्‍मात गुरुदेवांनी पू. दादांना त्‍यांच्‍या चरणांशी घेतले असून ते त्‍यांची ‘गुरुकृपायोगा’नुसार साधनाही करून घेत आहेत. त्‍यामुळे त्‍यांची जलद उन्‍नती होऊन ते वयाच्‍या अवघ्‍या १६ व्‍या वर्षी संतपदी विराजमान झाले आहेत.

सूत्र क्र. ३. – कृपा’ हा शब्‍द ‘कृप’ या धातूपासून होतो. ‘कृप्’ म्‍हणजे दया करणे आणि ‘कृपा’ म्‍हणजे दया, करुणा, अनुग्रह किंवा प्रसाद. गुरुकृपेच्‍या माध्‍यमातून जीव शिवाशी जोडला जाणे, याला ‘गुरुकृपायोग’, असे म्‍हणतात.

परम कृपाळू गुरुदेवांनी गुरुकृपेच्‍या माध्‍यमातून पू. सौरभदादांचा जीव शिवाशी जोडलेला आहे. त्‍यामुळे पू. दादा संतत्‍व प्राप्‍त करू शकले, म्‍हणजेच परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेमुळे ‘गुरुकृपायोगा’द्वारे त्‍यांचा जीव शिवाशी जोडण्‍याचा योग घडून आला आहे.

सूत्र क्र. ४. – अध्‍यात्‍मप्रसार ही गुरूंच्‍या निर्गुण रूपाची सेवा आहे. ही गुरुकृपेसाठी ७० टक्‍के महत्त्वाची आहे, तर गुरूंच्‍या सगुण रूपाची सेवा ही ३० टक्‍के महत्त्वाची आहे. पूर्ण गुरुकृपेसाठी दोन्‍ही करणे आवश्‍यक आहे.

श्री. संजय जोशी

४ अ. पू. सौरभदादा गुरूंच्‍या कार्याशी एकरूप झाल्‍याने त्‍यासाठी कुठेही जाण्‍यास सिद्ध असणे : ‘पू. सौरभदादांची गतजन्‍मात गुरूंच्‍या सगुण रूपाची सेवा पूर्ण झाली असावी आणि त्‍यांची गुरूंच्‍या निर्गुण रूपाची सेवा करणे शेष राहिले होते’, असे वाटते. ‘ही निर्गुण रूपाची, म्‍हणजे अध्‍यात्‍मप्रसाराची सेवा ते कशा प्रकारे करत आहेत’, ते आता पाहूया.

४ अ १. स्‍थूलरूपाने गुरुकार्यासाठी कुठेही जाण्‍याची मनाची सिद्धता असणे

अ.  पू. सौरभदादांना अनेक साधक, धर्माभिमानी भेटायला येतात. त्‍या वेळी ते पू. दादांना ‘आमच्‍यासमवेत येता का ?’, असे विचारतात. तेव्‍हा पुष्‍कळ वेळा पू. दादा ‘हो’, असे उत्तर देतात.

आ. एकदा सद़्‍गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ पू. दादांना भेटायला आल्‍या होत्‍या. तेव्‍हा त्‍यांनी पू. दादांना ‘‘विदेशात जाऊया ना ?’’, असे विचारले होते. तेव्‍हाही त्‍यांनी लगेचच ‘‘हो’’ म्‍हटले होते.

याचा अर्थ पू. दादा स्‍थूलदेहाने जरी गुरूंच्‍या निर्गुण रूपाची, म्‍हणजे अध्‍यात्‍मप्रसाराची सेवा करू शकत नसले, तरी ‘ते गुरूंच्‍या कार्याशी एवढे एकरूप झाले आहेत की, ते त्‍यासाठी कुठेही जाण्‍यास सिद्ध असतात’, असे जाणवले.

४ अ २. पू. सौरभदादा सूक्ष्मरूपाने गुरुकार्य करत असल्‍याचे जाणवणे : ‘पू. दादा आमच्‍या स्‍वप्‍नात आले होते’, असे काही साधक सांगतात. याचा अर्थ ‘ते स्‍थूलरूपाने कुठे जाऊ शकत नसले, तरी त्‍यांनी त्‍यांचे मन सर्वस्‍वी गुरुचरणी अर्पण केल्‍याने ते सूक्ष्म रूपाने गुरुकार्य करतच आहेत’, असे वाटते.

सूत्र क्र. ५. – गुरु हे २४ घंटे शब्‍द आणि शब्‍दातीत अशा दोन्‍ही माध्‍यमांतून शिष्‍याला सतत मार्गदर्शन करत असतात. गुरु हे कोणत्‍याही संकटातून शिष्‍याला तारतात.

५ अ. पू. सौरभदादांच्‍या रुग्‍णाईत अवस्‍थेत सूक्ष्मातून निराश झालेल्‍या त्‍यांच्‍या आईला त्‍यांचा सांभाळ करण्‍याविषयी एका व्‍यक्‍तीने मार्गदर्शन करणे आणि ती अंतर्धान पावणे : पू. दादा जन्‍मापासूनच बहुविकलांगतेमुळे कष्‍टप्रद जीवन जगत आहेत. लहानपणी एकदा पू. दादा पुष्‍कळ रुग्‍णाईत होते. आधुनिक वैद्यांना त्‍यांच्‍या जगण्‍याविषयी साशंकता वाटत होती. हे कळल्‍यामुळे पू. दादांच्‍या आईच्‍या मनात (सौ. प्राजक्‍ता जोशी) विचार आला, ‘एवढे सगळे करूनही त्‍याचा काही लाभ होणार नसेल, तर काय उपयोग ?’ त्‍यांच्‍या मनातील या नैराश्‍याच्‍या विचाराची तीव्रता वाढली आणि त्‍याच वेळी एक व्‍यक्‍ती रुग्‍णालयात आली. तिने सौ. प्राजक्‍ता जोशी यांना ‘पू. दादांची सेवा करतांना कसा भाव ठेवायचा ? सेवा कशा प्रकारे करायची ?’ याविषयी मार्गदर्शन केले आणि ती तिथेच अंतर्धान पावली.

५ आ. यापूर्वी सौ. प्राजक्‍ता जोशी यांनी प्रत्‍यक्षात गुरुदेवांना पाहिलेले नसणे आणि त्‍यांचे छायाचित्र पाहून ते गुरुदेवच असल्‍याची निश्‍चिती होणे : ती व्‍यक्‍ती म्‍हणजे गुरुदेवच होते. तेच रुग्‍णालयात सूक्ष्मरूपाने आले होते. त्‍यापूर्वी आम्‍ही उभयतांनी गुरुदेवांना कधीही प्रत्‍यक्ष पाहिले नव्‍हते. सौ. प्राजक्‍ता जोशी यांनी मला उपरोक्‍त प्रसंग सांगून सूक्ष्मरूपाने आलेल्‍या व्‍यक्‍तीचे वर्णन सांगितले. तेव्‍हा मी प्रास्‍ताविक विवेचन या ग्रंथावरील आणि सनातनच्‍या पूर्वी प्रकाशित झालेल्‍या ध्‍वनिफितींवरील गुरुदेवांचे छायाचित्र त्‍यांना दाखवले. ते पाहिल्‍यावर ‘ते परात्‍पर गुरु डॉ. आठवलेच होते’, याविषयी आमची निश्‍चिती झाली.

५ इ. सूक्ष्म रूपाने आलेल्‍या गुरुदेवांच्‍या कृपाकटाक्षाने पू. सौरभदादांच्‍या प्रकृतीत झपाट्याने पालट होऊन त्‍यांना त्‍यांचा कृपाशीर्वाद लाभणे : त्‍या वेळी गुरुदेवांची सूक्ष्मातून पू. दादांवर कृपादृष्‍टी पडल्‍याने पू. दादांच्‍या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली. त्‍याच वेळी ‘गुरुदेवांनी कृपाकटाक्षाने पू. दादांना जीवनाचे सार सांगितले’, असे जाणवले. त्‍यामुळेच ‘पू. दादा २२ वर्षे कष्‍टप्रद जीवन जगूनही आनंदावस्‍थेत असतात’, याची मला जाणीव झाली. या सर्व संकटांतून गुरुदेवांनी पू. दादांना एखाद्या नाजूक फुलासारखे अलगद उचलून त्‍यांच्‍या चरणी घेऊन जीवनमुक्‍त केले आहे.

– श्री. संजय जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(क्रमश:)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/696519.html