लांजा येथील सकल हिंदु समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन
लांजा – २९ जून या दिवशी असणार्या देवशयनी एकादशी निमित्ताने आषाढी वारी चालू आहे. आषाढी वारी सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते. आषाढी वारीच्या कालावधीत कुठेही गोवंशियांची तस्करी आणि हत्या होऊ नये. यासाठी प्रशासनाने प्रतिबंध करावा, अशा मागणीचे निवेदन येथील सकल हिंदु समाजाच्या वतीने तहसीलदार प्रमोद कदम आणि पोलीस निरीक्षक घुटुकडे यांना देण्यात आले.
प्रशासनाला दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, २९ जून या दिवशी श्री देव पंढरपूर यात्रा आणि बकरी ईदही आहे. लांजा तालुक्यातून वारंवार गोवंशियांची तस्करी झाल्याचे उघड झाले आहे. या कालावधीत गोवंशियांची तस्करी होण्याची दाट शक्यता आहे. गोमाता ही आमची धार्मिक आस्था असून अशा प्रकारे तस्करी झाल्यास आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार आहेत, तरी याविषयी योग्य ती कार्यवाही करून गोवंशियांच्या तस्करीला प्रतिबंध करावा.