एकाधिकारशाही, दमनतंत्र पुष्कळ काळ चालत नाही, हे रशियाच्या उदाहरणातून लक्षात घेऊन देशासाठी जनहितकारी पितृशाहीच हवी !
रशियातील खासगी सैन्य ‘वॅगनर ग्रुप’ने देशाविरुद्ध उठाव केला असून त्यांनी रोस्तोव-ऑन-डॉन हे शहर कह्यात घेतले आहे. या ठिकाणच्या सैन्यतळावरही ताबा मिळवल्याचे वृत्त असून मॉस्कोच्या दिशेने त्यांनी कूच चालू केली होती; मात्र बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी मध्यस्थी करून ‘वॅगनर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी प्रिगोजिन यांच्याशी बोलणी केली अन् ‘वॅगनर’ने मॉस्कोकडे कूच करणे सध्या तरी थांबवल्याचे वृत्त आहे. खासगी सैन्य युक्रेनविरुद्ध त्यांच्या लढायांच्या तळांवर पुन्हा रूजू झाले असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे रशियात होऊ शकणारा भयानक रक्तपात आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना असलेला धोका तूर्तास टळला आहे. ‘वॅगनर ग्रुप’ने रशियाचे एक शहर आणि युक्रेनच्या सीमेजवळील सैन्यतळ कह्यात घेतल्यानंतर एकाएकी हलकल्लोळ झाला अन् रशियन सैन्य, खासगी सैन्य आणि नागरिक यांच्यात यादवीची परिस्थिती निर्माण होते कि काय ? असे वाटले होते.
प्रिगोजिन : गुन्हेगार ते खासगी सैन्यप्रमुख प्रवास
येवगेनी प्रिगोजिन ही सध्या तरी सामान्य व्यक्ती नसून एक शक्तीशाली सैन्य नेता म्हणून उदयास आली आहे. येवगेनी प्रिगोजिन हे रशियातील सेंट पिटर्सबर्ग येथे पुतिन महापौर असतांना त्यांच्या अगदी निकटचे सहकारी होते. प्रिगोजिन यांचे बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले आणि बालसुधारगृहातच त्यांना रहावे लागले. नंतर गुन्हेगारी कारवायांमुळे ते काही वर्षे कारागृहात होते. तेथून बाहेर आल्यानंतर त्यांनी खाण्याच्या वस्तू विकण्याचा व्यवसाय चालू केला आणि नंतर मात्र तो पुष्कळ चांगला चालल्याने प्रिगोजिन नावारूपास आले. रशियाच्या सैन्याला आणि मुलांना जेवण पुरवण्याचे कंत्राट त्यांना मिळाले. ते त्यांनी काही वर्षे केले. याच वेळी त्यांनी सैन्याधिकार्यांच्या साहाय्याने ‘वॅगनर ग्रुप’ चालू केला, असे म्हटले जाते. काही मतांनुसार एका सैन्याधिकार्याने हे खासगी सैन्य चालू केले आणि नंतर प्रिगोजिन त्याचे मुख्य बनले असेही आहे. या खासगी सैन्यात निवृत्त सैन्य अधिकारी, सैनिक, गुन्हेगार अशा सर्वांचा भरणा आहे. या खासगी सैन्याची संख्या स्थापनेच्या वेळी ५० सहस्र, तर सध्याची २५ सहस्र अशी सांगितली जाते. या सैन्याने सीरिया, लिबिया, इराक इत्यादी देशांमध्ये रशियासाठीच्या अनेक मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. अरब देशांनीही या खासगी सैन्याचे साहाय्य त्यांच्या शत्रूंना धडा शिकवण्यासाठी घेतले आहे. त्यासाठी मोठी रक्कम प्रिगोजिन यांना मिळाली आहे. प्रिगोजिन हे रशियातील अब्जाधिशांपैकी एक आहेत. यातूनच प्रिगोजिन हे स्वत:ला आणि रशियाला खासगी सैन्य किती लाभ मिळवून देत असेल ? याची कल्पना येते. विशेष म्हणजे खासगी सैन्य रशियन कायद्याच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे रशियन सैन्य जे काम करू शकत नाही, तेही काम ‘वॅगनर’चे सैन्य उघडउघड करू शकते. याचाच लाभ रशियाने युक्रेन विरुद्धच्या युद्धात घेतला आहे. युक्रेन युद्धात अनेक आघाड्यांवर ‘वॅगनर’चेच सैनिक लढत आहेत. विशेष म्हणजे युक्रेनवर रशियाने आक्रमण करण्यास निमित्त म्हणून रशियावर काही खोटी आक्रमणे याच खासगी सैन्याकडून पुतिन यांनी घडवून आणल्याचे बोलले जाते. यातून पुतिन आणि प्रिगोजिन यांचे किती जवळचे संबंध असतील, हे लक्षात येते.
पुतिन आणि प्रिगोजिन तणाव
पुतिन हे स्वत: गुप्तचर संस्थेत कार्यरत होते. त्यांना प्रिगोजिन यांच्या शक्तीची कल्पना आहे. रशियातील सैन्याची बलस्थाने, देशाची मर्मस्थाने माहिती आहेत. त्यामुळे पुतिन यांनी या एका उठावाची भीषणता जाणून देशाला संबोधित केले आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी जावे लागले. प्रिगोजिन यांनी आता शस्त्र म्यान केले असले, तरी ते पुन्हा कधी उसळून येईल, हे सांगता येत नाही. रशियानेही ‘प्रिगोजिन यांच्या सैन्यावर काही कारवाई करणार नाही’, असे सांगितले, तरी पुतिन यांचा शत्रूप्रति क्रूर स्वभाव जगाला माहिती आहे. ते त्यांच्या विरोधात जाणार्या कुणालाही जिवंत सोडत नाहीत. याची जाण प्रिगोजिन यांनाही असणार. ‘खासगी सैन्यावर आक्रमणे केली, त्यांना युद्धात रसद पुरवली नाही’, अशी कारणे प्रिगोजिन यांनी उठावासाठी दिली आहेत, तसेच रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगु यांच्याशी त्यांचे ताणलेले संबंधही उठावाचे कारण मानले जाते. यामुळे संशयाचे वातावरण कायम रहाणार असले, तरी पुतिन ते दीर्घकाळ ठेवतील, असे वाटत नाही. या असुरक्षित वातावरणाचा अपलाभ युक्रेनने घेतला असून तो काही आघाड्यांवर आक्रमक झाला आहे.
सध्याच्या आधुनिक युगात खासगी सैन्य बाळगणे याचा एकतर संबंधितांकडून पैसे कमावणे, दादागिरी करणे वा शत्रूंना नष्ट करणे यांसाठी वापर होऊ शकतो. राजकारणात भाडोत्री गुंडांना स्वत:च्या प्रतिस्पर्ध्याचे दमन करण्यासाठी पोसले जाते; मात्र गुंडासमवेत बिनसले की, हेच गुंड अडथळा बनतात. भारतात इंदिरा गांधी यांनी भिंद्रनवाले या आतंकवाद्याला अकाली दलाच्या विरुद्ध उभे केले. नंतर भिंद्रनवाले त्यांना डोईजड होऊ लागला, तेव्हा सुवर्णमंदिरात सैन्य पाठवून ठार करण्यात आले. त्यानंतर इंदिरा गांधींचीही हत्या झाली. अमेरिकेने त्याच्या शत्रूराष्ट्रांवर वचक ठेवण्यासाठी आतंकवादी ओसामा बिन लादेन याला मोठे केले, पाठबळ दिले आणि नंतर लादेनशी बिनसल्यावर लादेनने अमेरिकेवरच मोठे आक्रमण केले. त्यानंतर अमेरिकेने लादेनला ठार केले, म्हणजे हे चक्र चालूच रहाते. कुणाचे साहाय्य घेत आहोत ? ते कोणत्या टप्प्यापर्यंत घ्यायचे हेसुद्धा ठरवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा विनाश ठरलेला आहेच. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असे जरी असले, तरी देशाच्या रणनीतीमध्ये ते अपवादात्मक असू शकते. रशियात पुतिन यांचे दमनतंत्र आणि एकाधिकारशाही असते. त्यामुळे साम्यवादी रशियात कधी ना कधी उठाव होईलच, असे म्हटले जाते. सोव्हिएत संघाचा आतापर्यंतचा इतिहासच असा आहे. रशियाने आताही त्याच्या धोरणांमध्ये सुधारणा न केल्यास पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. जगानेही रशियातील घडमोडींवरून बोध घेऊन पावले टाकण्याची आवश्यकता आहे.