(नॅरेटिव्ह म्हणजे काल्पनिक कथानक)
‘हिंदूंच्या श्रद्धास्थानांना कसेही दाखवलेले चालते’, असे गृहीत धरल्यानेच ‘आदिपुरुष’सारखे चित्रपट निघतात !
ओम राऊत दिग्दर्शित आणि संवाद लेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांचा ‘आदिपुरुष’ हा व्ही.एफ्.एक्स.(दृश्यप्रभाव) तंत्रज्ञानाने युक्त रामायणावर आधारित चित्रपट हिंदूंच्या टीकेला पात्र ठरला नसता, तर नवलच होते. रामायण म्हटले की, प्रभु श्रीराम, सीतामाई, हनुमान, रावण आदी त्यांच्या वेशभूषेसह आणि त्रेतायुगातील रामायणाचा सुवर्णकाळ प्रत्येक हिंदूच्या डोळ्यांसमोर उभा रहातो. श्रीराम आणि सीतामाता ही नावे उच्चारताच अत्यंत सात्त्विक, सोज्वळ, मर्यादाशील, तरीही अत्यंत प्रभावी, कर्तृत्ववान आणि चैतन्यदायी व्यक्तीमत्त्वे मनात साकारली जातात. रामायणाच्या सर्वच पात्रांचे एकमेकांशी असलेलेे संवाद हे कुणाच्याही मनात प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे चटकन भावाचा ओलावा निर्माण करतात. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या सादरीकरणात या सर्वांचाच मोठा अभाव जाणवत असल्याने श्रीराम, त्रेतायुग आणि रामायणाची कथा या सार्यांविषयीच्या हिंदूंच्या मनातील भक्तीभावालाच मोठा तडा गेला आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग कलेच्या उच्चतम सादरीकरणासाठी झाला, तर ते तंत्रज्ञान कलेला पूरक ठरते. जसे ‘तान्हाजी’ चित्रपटात दिग्दर्शक ओम राऊत यांनी केवळ शत्रूवर आक्रमण करण्याच्या प्रसंगात हे तंत्रज्ञान वापरले होते. या चित्रपटात ते तंत्रज्ञान पदोपदी आल्याने ‘रामायण काल्पनिक कथा होती कि काय ?’, असे एखाद्या लहान मुलाला वाटले, तर ते चूक नव्हे. द्रोणागिरी पर्वत उचलणे किंवा हनुमानाचे उड्डाण या घटनांसाठी या तंत्रज्ञानाचे परिणाम हे पूरक ठरू शकतात; मात्र ‘श्रीरामावर असंख्य वटवाघूळसदृश पक्ष्यांनी आक्रमण करणे आणि त्याने बाणाने त्यांना उडवणे’, यासारखे प्रसंग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दाखवल्यामुळे हा चित्रपट ‘हॉलीवूड चित्रपटा’सारखा भासतो. इथेच नेमकी गफलत झाली आहे. ‘आधुनिक रामायण’ दाखवण्याची राऊत यांची संकल्पनाच मुळात चुकीची आहे. रामायणाचा काळ जर त्रेतायुगाचा आहे, तर तो त्रेतायुगाचाच वाटला पाहिजे, तो कलियुगासारखा वाटून कसा चालेल ? श्रीराम हा साक्षात् अवतार होता. त्याचा काळ सनातन हिंदु धर्माच्या अतीप्राचीन परंपरेची महानता दर्शवणारा अत्यंत तेजस्वी आणि चैतन्यदायी काळ होता. इथे तर चित्रपटात बहुसंख्य वेळा इतकी गडद निळ्या आणि काळ्या प्रकाशातील दृश्ये आहेत की, तो कलियुगांतर्गत कलियुगातील भीषण काळ वाटत आहे. सध्या सर्वत्र असलेल्या प्रदूषणाची हीच गती राहिली, तर वर्ष ३००० मध्ये जसे वातावरण सर्वत्र निर्माण होईल, त्या काळात गेलो आहोत, असे चित्रपटातील काही दृश्ये पहातांना वाटते. ते वातावरण पाहून एकाने समाजमाध्यमांवर लिहिले आहे, ‘सोन्याची लंका ही कोळशाच्या खाणीसारखी वाटत आहे.’ रामायणातील चैतन्यमय प्रसंगांतील उल्हासदायक वातावरण गडद प्रकाशझोतामुळे अनुत्साही, कृत्रिम आणि चैतन्यविहीन झाले आहे. शब्द (संवाद), रूप (दृश्य) यांतून रामायणकालीन नव्हे, तर विचित्र स्पंदने येत आहेत.
श्रद्धास्थानांची विटंबना !
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या नादात त्याचा अतिरेक आणि अयोग्य ठिकाणी वापर झाल्यामुळे रामायणाच्या मूळ ढाच्याला छेद गेला आहे. ‘हिंदूंचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेले, हिंदूंच्या राष्ट्राचे प्रेरणास्रोत असणारे, हिंदूंच्या आदर्श राजाचे प्रतिनिधित्व करणारे रामायण आणि त्यांतील प्रमुख पात्रे अशा प्रकारे चैतन्यहीन दाखवणे’, हे हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे मोठे विडंबन आहे. लेखक, दिग्दर्शक, निर्माते, परिनिरीक्षण मंडळ कुणाच्याच हे लक्षात कसे आले नाही ? ‘हिंदूंच्या श्रद्धास्थानांना आधुनिकतेच्या नावाखाली चैतन्यविहीन करून दाखवणे’, हेही एक ‘नॅरेटिव्ह’ (काल्पनिक कथानक) यातून पसरू शकते, हा धोका येथे लक्षात घेतला पाहिजे. सीतेची वस्त्रे अयोग्य पद्धतीची किंवा अंगप्रदर्शन करणारी दाखवली आहेत. श्रीरामाच्या पायात पादुकांऐवजी ‘सँडल’सारखे चामड्याचे पादत्राण दाखवले आहे. मारुतिरायाचे केस मागे अयोग्य पद्धतीने बांधलेले दाखवले आहेत. रावणाकडे पुष्पक विमान होते. सुंदर पुष्पक विमानाऐवजी अत्यंत किळसवाणा पक्षी दाखवणे, ही हिंदूंच्या सांस्कृतिक अवमानाची परिसीमा आहे. चित्रपटात श्रीराम, हनुमान, रावण यांच्या अंगावर चामड्याचा वापर असणार्या अनेक गोष्टी दाखवल्या आहेत. हे काही १८ व्या किंवा १९ व्या शतकातील पाश्चात्त्य देशांतील सैनिक नाहीत. ते अत्यंत प्रगत संस्कृतीतील सर्व ‘लोक’ पादाक्रांत करू शकण्याची क्षमता असणारे वीरपुरुष आहेत. एका टीकाकाराने पूर्वी रावणाची भूमिका केलेल्या नटाच्या छायाचित्रावर लिहिले आहे, ‘माझ्यात पुष्कळ दुर्गुण होते; पण मी ‘छपरी’ नव्हतो.’ ही प्रतिक्रियाच पुरेशी बोलकी आहे. एकाने म्हटले आहे, ‘आम्ही रामायणाची ‘कार्टुन’ मालिका पाहिली, तीही पुष्कळ चांगली होती.’ एकूणच काय, तर दिग्दर्शकाने रामायणाचा अत्युच्च दर्जा आधुनिकता आणि तंत्रज्ञान यांनी चांगला करण्याऐवजी तो पुष्कळच खालच्या स्तरावर आणला आहे. सीतेच्या दृष्टीने प्रभु श्रीराम हे केवळ पती नव्हते, तर ‘प्रभु श्रीराम’ होते. प्रसिद्ध अभ्यासक रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या दूरदर्शन मालिकेतील सीतेच्या पात्रातील डोळ्यांत तो आदर जाणवत असे. त्या मालिकेत सीता, हनुमान, भरत, लक्ष्मण आदी सर्वांच्याच विनम्र बोलण्याच्या पद्धतीमुळे श्रीरामाविषयीचा भक्तीभाव आपसूक दाटून येत असे. भाषा, संवाद बोलण्याची पद्धत यांतून त्यांच्या अत्युच्च आदर्श अशा व्यक्तीरेखा खुलल्या होत्या. आदिपुरुष चित्रपटात दाखवल्याप्रमाणे आधुनिक काळातील खालच्या दर्जाची भाषा हिंदूंच्या देवतांच्या तोंडी घालणे, हे कुणीही स्वीकारू शकणार नाही. गेल्या २-३ दिवसांत चित्रपटाने जो मोठा गल्ला जमवला आहे, तो केवळ हिंदूंच्या श्रीरामावरील श्रद्धेपोटी आहे, हे निर्मात्यांनी लक्षात घेतले पाहिजे. अनेक जण मधून उठून जात आहेत, सामाजिक माध्यमातून मोहीम चालू झाली आहे आणि चित्रपटाच्या विरोधात याचिकाही प्रविष्ट झाली आहे. हिंदूंच्या श्रद्धास्थानावरील आघाताचे या काळातील हे मोठेच उदाहरण छुप्या पद्धतीने पुढे आले आहे. ‘अन्य धर्मियांनी हे जरातरी खपवून घेतले असते का ? आणि त्यांनी काय केले असते ?’, एवढाच प्रश्न केवळ हिंदूंनी स्वतःला विचारावा !