‘ऑनलाईन गेमिंग’ हा जुगार आहे कि खेळ याविषयी विविध मते आहेत. काही राज्यांनी ‘ऑनलाईन गेमिंग’ला रोखण्यासाठी काही राज्यांनी कायदे केले; परंतु ते न्यायालयात टिकले नाहीत. त्यामुळे असे असले तरी सद्यःस्थितीत ‘ऑनलाईन गेमिंग’ हा केवळ खेळ राहिलेला नाही, हे कुणीही नाकारू शकत नाही. हे लक्षात घेऊन याविषयी सरकारने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे, याविषयी आपण १३ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात पाहिले. ज्याप्रमाणे ‘ऑनलाईन गेमिंग’ खेळ कि जुगार ? याची सीमारेषा निश्चित झालेली नाही, त्याप्रमाणे ‘ऑनलाईन गेमिंग’ मुळे आत्महत्या होणे, हा विषयही वादाचा ठरला आहे. त्यात ‘ऑनलाईन गेमिंग’चा उपयोग धर्मांतरासाठी करण्यात आल्याचे उघड झालेले प्रकरण पहाता यावर कोणत्या उपाययोजना करता येतील, याचा ऊहापोह आपण या लेखामध्ये करणार आहोत.
संकलक : श्री. चंद्रकांत भदिर्के, मुंबई
(भाग ३)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/691749.html
१४. ‘ऑनलाईन गेमिंग’विषयी कोणती काळजी घ्यावी ?
अ. सर्वप्रथम वयाची मर्यादा पाळणे आवश्यक आहे. आपल्या कुटुंबातील मुलांना त्याचे महत्त्व आणि खेळापासून उद्भवणारे धोके समजावून सांगणे आवश्यक आहे. मुलांशी संवाद असल्यास हस्तक्षेप करण्याची वेळ कोणती ? हे समजू शकते.
आ. मुळात जुगारासारख्या व्यसनामध्ये कुणीही फसू नये. अगदीच जुगाराच्या आहारी गेलेल्या व्यक्तीने त्यातून बाहेर पडण्यासाठी कालमर्यादा निश्चित करून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा.
इ. कोणत्याही प्रकारच्या जुगारामध्ये हरण्याची शक्यताच अधिक असते, हे प्रथम समजून घ्यावे. या प्रकारचे खेळ खेळत असल्यास त्याची कल्पना स्वत:चे कुटुंबीय किंवा मित्र यांना द्यावी.
ई. कोणताही ऑनलाईन खेळ ‘डाऊनलोड’ करतांना अनावश्यक अनुमती देऊ नयेत. वैयक्तिक माहिती ‘शेअर’ होणार नाही, अशा प्रकारची ओळख वापरावी. संकेतांक (पासवर्ड) अन्यांना देऊ नये आणि ठराविक कालावधीने तो पालटावा.
उ. आर्थिक व्यवहार करण्याआधी किंवा क्रेडिट कार्डची माहिती देण्यापूर्वी सुरक्षिततेची खात्री करून घ्यावी.
ऊ. संकेतस्थळ ‘https://’ ने प्रारंभ होणारी असावी. (यातील ‘s’ सिक्युअर म्हणजे सुरक्षित असल्याचे सूचित करतो.)
ए. खेळून झाल्यानंतर खेळ केवळ बंद करण्याऐवजी पूर्ण ‘लॉग आऊट’ करणे हा सुरक्षित मार्ग आहे. विशेषतः अन्यांचे ‘लॅपटॉप’ किंवा संगणक यांवर खेळत असल्यास ही काळजी निश्चितपणे घ्यावी.
ऐ. ऑनलाईन व्यवहारासाठी वेगळे ‘वॉलेट’ किंवा ‘अकाऊंट’ ठेवावे आणि त्यात ठराविकच रक्कम ठेवावी. जेणेकरून फसवणूक झाली, तर हानी मर्यादित ठेवता येते.
ओ. क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट (खात्याची छापील प्रत) नियमितपणे पडताळावे. त्यात संशयास्पद व्यय किंवा शुल्क दिसल्यास ते अधिकोषाच्या लक्षात आणून द्यावे.
औ. ‘लॅपटॉप’ आणि संगणक यांमध्ये ‘अँटिव्हायरस’ असावा. आपण किती वेळ खेळत आहोत यावर, तसेच होणारा व्यय यांवर बारीक लक्ष ठेवावे.
जुगार हा काही झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग नाही. जुगारात जिंकण्याची सर्वाधिक शक्यता किंवा हमी केवळ खेळाच्या आयोजकांची असते, हे प्रथम लक्षात घ्यायला हवे. ‘ऑनलाईन गेमिंग’ हे जुगाराचे व्यापक स्वरूप भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे. जुगाराला आळा घालण्यासाठी भारतात विविध कायदे करण्यात आले; मात्र जुगाराला कायद्याने नियंत्रित करणे शक्य झालेले नाही. ज्याप्रमाणे मद्य हे व्यसन आहे, तसे जुगारही हे एक व्यसनच आहे. त्यावर बंदी घालता आली नाही, तरी ते नियंत्रित करणे आवश्यक आहे. तसेच त्यावर पूर्णतः बंदी घालण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासनाकडून कायद्याची प्रभावी कार्यवाही हवी.
१५. आत्महत्येसाठी कारणीभूत
गुजरातमधील वापी येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसर्या वर्षात शिकणार्या एका मुलाने वसतीगृहामध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. तो एक हुशार आणि परीक्षेत उत्तम गुण मिळवणारा विद्यार्थी होता. ‘ऑनलाईन गेम्स’ खेळतांना त्याला ऑनलाईन जुगाराची सवय लागली. जुगार खेळण्यात वारंवार हरल्यामुळे त्याने अनेक लोकांकडून कर्ज घेतले. त्याची परतफेड करता येत नसल्याने त्याने आत्महत्या केली. ‘ऑनलाईन जुगारामुळे अशा घटना वाढत आहेत. गंमत म्हणून चालू केलेल्या खेळाचे परिणाम इतके भयंकर असू शकतात. या घटनेसारख्या अन्यही अनेक घटना भारतात, तसेच भारताबाहेर घडल्या असतील; परंतु या आत्महत्या ‘ऑनलाईन गेमिंग’मुळेच झाल्या आहेत, या निष्कर्षापर्यंत पोचता आलेले नाही.
१६. तज्ञांची मतांतरे !
याविषयी विविध तज्ञ आणि अभ्यासक यांनी आत्महत्या हा विषय गुंतागुंतीचा असल्याचा निष्कर्ष नोंदवला आहे. त्यामुळे मानसिक स्थिती, ताणतणाव, आर्थिक तोटा, घरगुती समस्या, प्रेमप्रकरणे असे विविध पैलू त्यामध्ये येत असल्याचे म्हटले आहे, तर अनेकांनी ‘ऑनलाईन गेमिंग’ला जुगार ठरवणे, हे या खेळातील कौशल्याला मारण्याचा प्रकार आहे’, असे नमूद केले आहे. यामध्येही तथ्य आहे. कोणताही कायदा किंवा नियम सिद्ध करतांना त्याचा सर्वांगाने विचार होणे आवश्यक आहे. कायद्यामध्ये त्रुटी राहिल्या, तर त्याचा दुरुपयोग होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे ‘ऑनलाईन गेमिंग’ म्हणजे जुगार किंवा ऑनलाईन गेमिंगमुळेच आत्महत्या झाली, असे सध्या तरी थेट म्हटले जाऊ शकत नाही.
१७. …हेही दुर्लक्षित करून चालणार नाही !
‘खेळ’, ‘खेळातील कौशल्य’ हे खरे असले, तरी ‘ऑनलाईन गेमिंग’ मुळे दिसणार्या दृश्य हानीकारक परिणामांनाही दुर्लक्षित करून चालणार नाही. ‘ऑनलाईन गेमिंग’ हा कौशल्याचा खेळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. हा कौशल्याचा खेळ आहे, हे सत्यच आहे. कोणता खेळच काय, तर जुगारही कौशल्यावरच खेळता येतो; परंतु येथे मुद्दा हा की, ‘ऑनलाईन गेमिंग’ हा खरोखरच केवळ ‘खेळ’ म्हणून मर्यादित राहिला आहे का ? तर त्याचे उत्तर ‘नाही’, असे आहे, ही वस्तूस्थितीही नाकारून चालणार नाही. त्यामुळे ‘कौशल्याचा खेळ’ या नावाखाली त्याच्या विघातक परिणामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. असे दुर्लक्ष करणे हे यातून निर्माण होणारा धोका भविष्यात आणखीही वाढण्याला निमंत्रित करणारा ठरू शकतो. ऑनलाईन गेमिंगमुळेच आत्महत्या झाल्या आहेत, हे अद्याप जरी सिद्ध होऊ शकले नसेल, तरी याच्या आहारी जाऊन त्यावर पैसे लावणे, पैसे हरल्यामुळे तणावात जाणे, या गोष्टी उघडपणे दिसत आहेत यांविषयी काय करावे ? यावर धोरण ठरवणे आवश्यक ठरते.
१८. कौशल्याचा वापर केवळ खेळासाठी होत नाही !
कोणत्याही गोष्टीत कौशल्य असणे आणि त्यावर पैसे लावणे या दोन्ही गोष्टी वेगळ्यात आहेत. ज्याप्रमाणे क्रिकेट खेळामध्ये जिंकणारा संघ हा खेळातील कौशल्यामुळे जिंकतो; परंतु पैसे लावून जेव्हा कोणत्या खेळाडूचा खेळ आधीच नियंत्रित केला जातो किंवा कोण जिंकणार ? म्हणून त्यावर लावलेला सट्टा हा जुगार ठरवला गेला आहे. ऑनलाईन गेमिंगमध्ये थेट अशा प्रकारे सट्टा लावला जात नाही. ऑनलाईन गेमिंगमध्ये कोण जिंकेल ? यावर सट्टा लावला जात नाही, तर जिंकण्यासाठी पैसे लावले जातात.
अन्य खेळांमध्ये जसे की बुद्धीबळ, टेनिस किंवा अन्यही खेळ, यामध्ये विजेत्या खेळाडूला पारितोषिक स्वरूपात पदक कंवा पैसे मिळतात; परंतु हरल्यास त्यांच्या खात्यातील पैसे जात नाहीत. हा ‘ऑनलाईन गेमिंग’ आणि अन्य खेळ यांतील भेद आहे.
१९. ‘ऑनलाईन गेमिंग’ मधून धर्मांतराची आणखी एक समस्या !
उत्तरप्रदेशमधील गाझियाबाद येथून तेथील पोलिसांनी ‘ऑनलाईन गेमिंग’च्या माध्यमातून धर्मांतर करणार्या अब्दुल रहमान नामक व्यक्तीला अटक केली. ‘ऑनलाईन गेमिंग’मधील कौशल्य आणि तंत्रज्ञान यांचा असाही गैरवापर होऊ शकतो, याची कुणी कल्पनाही केली नसेल; परंतु याविषयीचे धागेदोरे पोलिसांच्या हाती आले आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शाहनवाज खान याला पोलिसांनी महाराष्ट्रातील मुंब्रा येथून अटक केली आहे. शाहनवाज खान आणि त्याच्या सहकार्यांनी बनावट खाते सिद्ध करून आणि स्वत:ची खोटी ओळख निर्माण करून ‘ऑनलाईन गेम’ खेळणार्या हिंदु मुलांना लक्ष्य केले. या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत ४०० जणांचे धर्मांतर केल्याची वृत्ते माध्यमांतून प्रसिद्ध झाली आहेत. हा आकडा खोटाही असू शकतो किंवा याची व्याप्ती आणखीही मोठी असू शकते. ही संख्या छोटी असो वा मोठी ‘जुगार’, ‘आत्महत्या’ आणि यानंतर ‘धर्मांतर’ हा आणखी एक गैरप्रकार ‘ऑनलाईन गेमिंग’ ला जोडला गेला आहे. त्यामुळे भविष्यात ‘ऑनलाईन गेमिंग’ याकडे केवळ ‘कौशल्याचा खेळ’ म्हणून पाहून चालणार नाही. या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करण्यासाठी सरकारने देशपातळीवर तज्ञांची समिती नियुक्त करून त्याविषयी धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे.
२०. नैतिक मूल्यांचा प्रसार, हीच प्रभावी उपाययोजना !
सद्यःस्थितीत अल्प श्रमात झटपट पैसा मिळवण्याची चढाओढ लागली आहे आणि ‘ऑनलाईन गेमिंग’मुळे स्वत:ची नोकरी, व्यवसाय सांभाळूनही फावल्या वेळेत ही अधिकची कमाई करण्याचीही संधी म्हणूनही याकडे पाहिले जात आहे. वरकरणी झटपट पैसा मिळवण्याचा मार्ग म्हणून दिसत असले, तरी यामागील अध्यात्मशास्त्राचा अभ्यास केल्यास यांतील बहुतांश अडचणी सुटतील. एखाद्याची पिडा, वासना घेऊन येणारे धन ज्याकडे येते, त्यामधील या संवेदना त्या व्यक्तीचे जीवन आणि कुटुंब यांमध्येही ते प्रक्षेपित करते. ‘ऑनलाईन गेमिंग’मधून मिळणारा पैसा हाही काही स्वखुशीने देत नाही. त्यामुळे त्यातून येणार्या संवेदनांचा मोठा परिणाम पैसे येणार्या व्यक्तीवर होण्याचा धोका अधिक असतो. यातूनच नैराश्य, त्रागा, मानसिक विकार, ताणतणाव आणि त्यातून आत्महत्येपर्यंतचा धोका उद्भवू शकतो. काही पैशांसाठी असे स्वत:चे आरोग्य आणि जीवन पणाला लावणे, हे कधीही हिताचे ठरू शकत नाही; मात्र हे समजून घेण्यासाठी अध्यात्मशास्त्र समजून घ्यायला हवे आणि त्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. साधना करणारी व्यक्ती अनैतिक मार्गाने येणार्या पैशांचा धोका सहजपणे समजू शकते. त्यामुळे ‘ऑनलाईन गेमिंग’ आणि त्यातून मिळणारा पैसा, हे एक प्रलोभन आहे. त्यासाठी स्वत:चे सुख दावणीला लावणे कधीच हितकारी ठरणारे नाही. त्यावर भविष्यात कायदे येतीलही; मात्र नैतिक मूल्यांचा अंगीकार, हाच त्यावरील प्रभावी मार्ग होय.
(समाप्त)