‘ऑनलाईन गेमिंग’विषयीच्या १२ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये काही राज्यांनी यावर बंदी घातल्याचे आपण पाहिले; मात्र न्यायालयात ही बंदी टिकली नाही. काही राज्यांनी ‘ऑनलाईन गेमिंग’चा धोका ओळखून तो नियंत्रित करण्यासाठी स्वतंत्र कायदे निर्माण केले आहेत; मात्र अद्यापही तो कौशल्याचा खेळ म्हणून गणला जात आहे. त्यामुळे अनेक दिग्गज कलाकार त्याचे विज्ञापन करत असल्याने सद्यःस्थितीत ‘ऑनलाईन गेमिंग’ देशात झपाट्याने वाढत आहे आणि केवळ खेळ नव्हे, तर हे एक पैसे मिळवण्याचे किंवा गमावण्याचे साधन झाले आहे. याचा धोका लक्षात घेऊन ‘ऑनलाईन गेमिंग’मध्ये खेळ कोणता आणि जुगार कोणता ? याची स्पष्टता आणणे अनिवार्य झाले आहे. यातून निर्माण होणारा धोका या लेखातून मांडत आहोत, जेणेकरून सरकारने याविषयी तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा.
(भाग २)
संकलक : श्री. चंद्रकांत भदिर्के, मुंबई
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/691396.html
६. ‘ऑनलाईन गेमिंग’ नियंत्रित करण्यासाठी विविध राज्यांत करण्यात आलेले कायदे
ई. तेलंगाणा : वर्ष २०१७ मध्ये तेलंगाणा गेमिंग कायद्यात दुरुस्त्या करून त्याद्वारे सर्व प्रकारचे ‘ऑनलाईन गेमिंग’ आणि जुगार यांवर बंदी घातली.
उ. कर्नाटक : कर्नाटक सरकारने वर्ष २०२१ मध्ये ‘कर्नाटक पोलीस कायदा, १९६३’ मध्ये सुधारणा करून सर्व ‘ऑनलाईन गेम’वर (कौशल्य आणि संधी दोन्हींवर) बंदी घातली होती; पण कर्नाटक उच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०२२ मध्ये हे रहित केले.
आंध्रप्रदेश, तेलंगाणा, ओडिशा आणि आसाम या राज्यांत ‘फँटसी स्पोर्ट्स लीग’वर (प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेले काल्पनिक खेळ चालवणारी यंत्रणा) सट्टेबाजीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. नागालँड आणि मेघालय वगळता भारतातील कोणत्याही राज्यांमध्ये कौशल्याच्या खेळांचे नियमन करण्यासाठी वेगळे कायदे नाहीत. काल्पनिक फुटबॉल, क्रिकेट आणि अन्य काल्पनिक क्रीडा यांवरील सट्टेबाजीचा संदर्भ देणारी कल्पनारम्य लीग सट्टेबाजी उर्वरित भारतात अनियंत्रित आहे. केरळ, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये कौशल्याच्या खेळांसह सर्व ‘ऑनलाईन गेम’वर बंदी घालणारे असेच कायदे संमत करण्यात आले होते. केरळ आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये या कायद्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले आणि ‘कौशल्याचे खेळ’ म्हणून बंदी हटवण्यात आली.
७. तमिळनाडूमध्ये ‘ऑनलाईन गेमिंग’वर बंदी घालण्यासंबंधी अध्यादेश
तमिळनाडू राज्य सरकारने २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी ‘रमी’ (१३ पत्त्यांद्वारे खेळला जाणारा पानांचा खेळ) आणि ‘पोकर’ (५२ पत्त्यांद्वारे खेळला जाणारा पानांचा खेळ) यांसह सर्व ‘ऑनलाईन गेम’वर बंदी घालणारा अध्यादेश काढला. अनुमाने ३ आठवड्यांनंतर राज्य सरकारने हा अध्यादेश पालटण्यासाठी विधेयक संमत केले. हे विधेयक राज्यपालांच्या स्वाक्षरीच्या प्रतीक्षेत आहे. हा अध्यादेशही लागू व्हायचा आहे.
८. काळानुसार जुगाराची संकल्पना अधिकच व्यापक
काळानुसार जुगाराची संकल्पना अधिक विकसित होत आहे. सद्यःस्थितीत ‘क्रीडा सट्टेबाजी’ आणि ‘ऑनलाईन गेम’ यांच्या लोकप्रियतेमुळे भारतात जुगाराला व्यापक रूप प्राप्त झाले आहे. ‘ऑनलाईन गेम’च्या नावाने देशभरात जुगार झपाट्याने पसरत असून तो युवा पिढीला गिळंकृत करत आहे. जुगाराला नियंत्रित करण्यासाठी वर्ष १८६७ मधील ‘सार्वजनिक जुगार कायदा’, तसेच वर्ष १९७६ मधील ‘गेमिंग कमिशन’ची निर्मिती यानंतरही जुगाराचे नियंत्रण कितपत झाले ? हा प्रश्नच आहे.
९. कोरोना महामारीनंतर ‘ऑनलाईन गेमिंग’मध्ये झपाट्याने वाढ !
जगाचा इतिहास पहाता विश्वयुद्ध, दुष्काळ, आर्थिक आणीबाणी किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती यांच्या काळात तेथील समाजामध्ये काही पालट घडून येतात. त्यांतील एक म्हणजे अनेक व्यक्तींची धोका पत्करण्याची क्षमता वाढते. कदाचित् ‘आता आहे त्यापेक्षा अधिक काय वाईट होणार ?’, असे विचार असतात किंवा त्या परिस्थितीमधून झटपट बाहेर पडण्याची इच्छा निर्माण होते. याचा परिणाम म्हणजे गुन्हेगारी, अमली पदार्थांचे सेवन, देहविक्री, जुगार या वाममार्गांकडे कल वाढतो. कोरोना महामारीनंतरही जगात आणि भारतात आलेल्या आर्थिक मंदीसदृश स्थितीनंतर गुन्हेगारी वाढलेली दिसत आहे. कोरोना महामारीनंतर ‘ऑनलाईन गेमिंग’मध्ये झपाट्याने वाढ होऊन त्याद्वारे पैशांच्या पैजा (बेट) लावल्या जात आहेत.
१०. ‘ऑनलाईन गेमिंग’ हा खेळ कि जुगार ?
सद्यःस्थितीत भ्रमणभाषचा उपयोग केवळ संपर्क आणि संवाद यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. भ्रमणभाषचा उपयोग मनोरंजनासाठी अधिक काळ होऊ लागला आहे. मनोरंजनामध्ये माध्यमे, सामाजिक माध्यमे आणि अनेक खेळ बनवणारे अन् तत्सम सेवा पोचवणारे उद्योग चालू झाले. विविध ऑनलाईन विज्ञापने पाहून खेळ आणि जुगार हे समजणेही कठीण झाले. त्यामुळे खेळ आणि जुगार यांमध्ये नेमका भेद कोणता ? याची माहिती असणे महत्त्वाचे झाले आहे. ‘आपल्या नियंत्रणात नसणाऱ्या; परंतु लाभ होण्याची शक्यता असणाऱ्या खेळ वा स्पर्धा यांमध्ये आपल्याकडून पैसे, एखादी वस्तू किंवा अन्य काही संपत्ती डावाला लावणे’ याला जुगार म्हणतात. खेळात निव्वळ मनोरंजन किंवा स्पर्धा असते; परंतु जुगारात हरण्याच्या शक्यतेसह हानीही होऊ शकते. ही शक्यता जिंकण्याच्या शक्यतेपेक्षा अधिक असते. अनेकदा जुगारात खेळाप्रमाणे कौशल्य अथवा विशेष क्षमता असण्याचीही आवश्यकता नसते. थोडक्यात जुगार म्हणजे ‘शक्यता न्यून असतांनाही अधिक पैसे मिळवण्याच्या अपेक्षेने थोडा पैसा जाऊ देण्याचा पत्करलेला धोका होय.’ सद्यःस्थितीत मात्र ‘ऑनलाईन गेमिंग’मधील खेळ आणि जुगार कोणता ? यांमधील सीमारेषा स्पष्ट करणे आवश्यक आहे. सरकारने याविषयी पुढाकार घेऊन जागृती करणे आवश्यक आहे.
११. अल्पवयीन मुले जुगाराच्या विळख्यात !
खेळ म्हटल्यावर जय-पराजय होणारच; पण जुगारात मद्य किंवा अन्य अमली पदार्थांप्रमाणेच मेंदूच्या ठराविक भागाला उत्तेजन मिळते. जेणेकरून त्याचे व्यसन लागण्याची शक्यता असते. प्रचलित जुगारापेक्षा ‘ऑनलाईन जुगार’ अधिक धोकादायक असतो. त्याचे कारण म्हणजे तो भ्रमणभाषवर कधीही, कोणत्याही ठिकाणी आणि कुणाच्या नकळतही खेळता येऊ शकतो. ‘ऑनलाईन जुगारासाठी केवळ इंटरनेट आणि ‘मोबाईल वॉलेट’ (भ्रमणभाषद्वारे ऑनलाईन पैसे हस्तांतरण करण्याची एक प्रक्रिया) किंवा ‘क्रेडिट कार्ड’ यांची आवश्यकता असते. तेवढे असले की, कामाच्या ठिकाणी, प्रवासात, घरी, महाविद्यालय आदी कुठूनही ‘ऑनलाईन जुगार’ खेळला जाऊ शकतो. ऑनलाईन असल्यामुळे वयाने लहान मुलेही वयाच्या मर्यादा न पाळता हा जुगार खेळू शकतात आणि खेळतातही. हे अधिक धोकादायक आहे.
१२. ऑनलाईन जुगाराचे गंभीर धोके ओळखा !
अ. ग्राहकांना आकर्षित करण्याच्या हेतूने प्रारंभी हे खेळ खेळण्याची संधी विनामूल्य दिली जाते. खेळासाठी लागणारे पैसे किंवा कुपन संबंधित आस्थापनाकडून भेट स्वरूपात दिले जाते. एकदा जिंकल्यावर खेळाची चटक लागते आणि त्यानंतर ती व्यक्ती स्वतःचे पैसे व्यय करून जुगारात अडकते.
आ. ऑनलाईन जुगार खेळतांना व्यक्तीची प्रत्यक्ष ओळख समोर येत नाही. त्यामुळे अन्यांच्या नकळत आणि स्वत:ची ओळख लपवून खेळणे शक्य होते.
इ. अनेकदा समस्या अगदी टोकापर्यंत पोचत नाही, तोपर्यंत जुगार खेळणाऱ्या व्यक्तीचे कुटुंबीय किंवा मित्र यांनाही याची कल्पना नसते. वेळीच योग्य पावले उचलण्याची संधीही मिळत नाही.
ई. ‘मोबाईल वॉलेट’ आणि ‘क्रेडिट कार्ड’ यांचा उपयोग करतांना प्रत्यक्ष रोख रक्कम जातांना दिसत नाही. त्यामुळे हरण्याची आणि हानी होण्याच्या धोक्याची तीव्रता फारशी जाणवत नाही. त्यामुळे अधिकाधिक पैसे व्यय होतात आणि तोटा होतो.
उ. काही वेळा खेळ ‘डाऊनलोड’ करतांना संबंधित आस्थापनांकडून अनावश्यक माहिती घेतली जाते. या माहितीचा अपलाभ होण्याची शक्यता असते.
ऊ. अनेकदा तात्काळ कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या व्यक्तींना विशेष ग्राहक म्हणून लक्ष्य करतात. त्यांना अशा प्रकारच्या मार्गातूनही माहिती मिळत असण्याची शक्यता आहे. फारशा कागदपत्रांविना त्वरित मिळणारे कर्ज आणि ऑनलाईन जुगार हे समीकरण फार धोकादायक ठरते.
या सर्वांतून कर्जबाजारी होणे, मानसिक आरोग्य बिघडणे, एकलकोंडे होणे किंवा अगदी आत्महत्येपर्यंत पोचणे अशा घटना जगभरात घडल्या आहेत.
१३. संभाव्य गंभीर धोके !
अन्य धोके म्हणजे खेळत असतांना प्रत्येक वेळी प्रतिस्पर्धी खरी व्यक्ती असतेच असे नाही. काही वेळा प्रतिस्पर्धी एखादा ‘सॉफ्टवेअर’ किंवा ‘बॉट’(‘बॉट’ म्हणजे एक प्रकारची स्वयंचलित संगणकीय प्रणाली जी रोबोटप्रमाणे चालते) असू शकतो. ज्याची रचना खेळाच्या सर्व शक्यता गृहीत धरून जिंकण्यासाठी तज्ञांनी केलेली असते. यामुळे हरण्याची शक्यता अधिक असते. यासह विविध प्रकारांनी फसवून ‘पासवर्ड’ (संकेतांक) चोरी होणे किंवा छायाचित्र आणि अन्य ओळख ‘कॉपी’ करून अपप्रकार केला जातो. काही ‘अॅप’ जमा केलेल्या माहितीचा गैरवापर करणे, ‘ब्लॅकमेल’ करणे, आपल्या संपर्क सूचीमधील अन्य व्यक्तींना संपर्क करणे असे प्रकारही करतात. मोठ्या बक्षिसाचे आमीष दाखवून आर्थिक फसवणूक केली जाते. हे सर्व धोके पहाता या प्रकारापासून दूर रहाणे उत्तम; परंतु गंमत किंवा रोमांचक खेळ म्हणून नियंत्रित स्वरूपात खेळायचे असल्यास काही काळजी घेणे आवश्यक ठरते.
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/692060.html