नथुराम गोडसे यांची वेदना !

नथुराम गोडसे यांनी केलेल्या गांधी हत्येवर देशात वस्तूनिष्ठ चर्चा होण्याची वेळ आली आहे !

अमेरिकेचे राष्ट्रपती जॉन एफ केनेडी यांची वर्ष १९६३ मध्ये हत्या झाली; मात्र ही हत्या कुणी केली ? हे आज ६० वर्षांनंतरही गूढ राहिलेले आहे. भारतात जनसंघाचे नेते शामाप्रसाद मुखर्जी आणि दिनदयाळ उपाध्याय यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. त्या दोघांची हत्याच करण्यात आली, असे म्हटले जाते; मात्र हेही एक गूढ राहिलेले आहे. भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा ताश्कंद येथे मृत्यू झाला. ‘हीसुद्धा हत्या आहे’, असे म्हटले जाते; मात्र ते सिद्ध होऊ शकलेले नाही. भारतात मोहनदास गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्या झाल्या. या तीनही हत्या राजकीय होत्या. म्हणजे राजकीय कारणांवरून त्यांच्या हत्या झाल्या. ‘या तिघांच्या हत्यांना त्यांची धोरणे आणि त्यांनी घेतलेले निर्णय कारणीभूत आहेत’, असे म्हटले जाते. मोहनदास गांधी यांनी भारताच्या फाळणीला मान्यता दिली आणि नंतर १० लाख हिंदूंची मुसलमानांकडून हत्या करण्यात आली. त्यामुळे गांधी यांची हत्या करण्यात आल्याचे पंडित नथुराम गोडसे यांनी न्यायालयात सांगितले होते. इंदिरा गांधी यांनी भिंद्रनवाले याला प्रथम अकाली दलाला शह देण्यासाठी मोठे केले आणि नंतर तो डोईजड झाल्यावर सुवर्णमंदिरात सैन्य घुसवून त्याच्यावर कारवाई केली. यामुळे धार्मिक भावना दुखावलेल्या शिखांनी इंदिरा गांधी यांना ठार केले. इंदिरा गांधी यांच्या काळात श्रीलंकेतील ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम्’ (लिट्टे) या संघटनेला भारताकडून सर्व प्रकारचे साहाय्य करण्यात आले. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी याच लिट्टेच्या विरोधात भारतीय सैन्य श्रीलंकेत पाठवले. त्या रागातून लिट्टेने राजीव गांधी यांची हत्या केली. इंदिरा गांधी यांनी भस्मासूर उभा केला आणि शेवटी त्याने त्यांना संपवले. हा भस्मासूर आजही देशाला त्रासदायक ठरत आहे. राजकीय नेतृत्व चुकते, तेव्हा काय होते ? ते राजीव गांधी यांच्या हत्येतून लक्षात आले; मात्र मोहनदास गांधी यांच्यामुळे भारताची आणि हिंदूंची भरून न येणारी हानी झाली. हिंदूंमधील क्षात्रवृत्ती नष्ट करून धर्मांध आणि देशद्रोही मुसलमानांना या देशात राहू देण्याचा राष्ट्रघातकी निर्णय घेतला गेल्याने त्यांना त्याचा परिणाम भोगावा लागला, असेच नथुराम गोडसे यांनी न्यायालयात मांडलेल्या त्यांच्या या हत्येमागील विचारांतून जनतेला लक्षात आलेले आहे.

इच्छापत्रावर चर्चा व्हावी !

पुरी येथील पूर्वाम्नाय पीठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनी नथुराम गोडसे यांच्या याच वेदनेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यावर आता देशभरात वस्तूनिष्ठ चर्चा होण्याची आवश्यकता आहे. शंकराचार्य यांनी बोलतांना हेही स्पष्ट केले आहे, ‘मी नथुराम यांच्या विचारांशी सहमत आहे किंवा नाही, यापेक्षा त्यांची वेदना समजून घ्यायला हवी.’ हा वस्तूनिष्ठ अभ्यास आणि त्यावर चिंतन होणे आवश्यक आहे. काँग्रेसच्या काळात ते शक्य नव्हते; पण ते आता शक्य आहे. काँग्रेसने नथुराम गोडसे यांचे बंधू आणि गांधी यांच्या हत्येतील एक आरोपी गोपाळ गोडसे यांनी त्यांच्या सुटकेनंतर लिहिलेले ‘५५ कोटींचे बळी’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आल्यावर काँग्रेसने त्यावर बंदी घातली होती. या बंदीच्या विरोधात न्यायालयीन लढा देण्यात आल्यावर ही बंदी हटवण्यात आली. हे पुस्तक वाचल्यावर नथुराम गोडसे यांची वेदना कुणाच्याही लक्षात येईल. ‘गोडसे यांचे पुस्तक वाचून तुमचे हृदय स्वीकारेल की, गोडसे किती व्यथित होते ?’, असे शंकराचार्यच म्हणत आहेत. गांधी यांची हत्या केल्यानंतर आपल्याला फाशी होईल, हे नथुराम गोडसे यांना ठाऊक होते, तरी गोडसे यांनी त्यांची हत्या केली. कुणाची हत्या करण्यामागे काहीतरी उद्देश, मानसिकता आदी असते आणि त्यातून कृती होते. युद्धात देशाचे रक्षण करण्यासाठी शत्रूराष्ट्राच्या सैनिकांना ठार केले जाते. युद्धात लक्षावधी लोकांचा मृत्यू होऊ शकतो किंवा काही वेळा होतोही. तरीही या हत्यांना शिक्षा नसते. उलट पुरस्कार दिले जातात. नथुराम गोडसे यांनी जे विचार मांडले आहेत, त्यात त्यांनी देशाच्या रक्षणासाठी आणि आदर्शांसाठीच गांधी यांना मारल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ‘गोडसे यांनी वाईट केलेले नाही’, अशी धारणा असलेल्यांची संख्या या देशात मोठी आहे, हे नाकारता येणार नाही. दुसरीकडे गांधी यांनीही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्यामुळे त्यांना मानणाऱ्यांची संख्याही लक्षावधी आहे, हेही कुणी नाकारू शकत नाही; मात्र या दोघांच्या राष्ट्रभक्तीविषयी चर्चा होणे आवश्यक आहे, असा शंकराचार्य यांच्या बोलण्याचा आशय आहे, असे वाटते. ‘नथुराम गोडसे हिंदुत्वनिष्ठ होते आणि गांधी नव्हते, त्यामुळेच त्यांना मारण्यात आले’, असाच प्रचार आतापर्यंत काँग्रेस, निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी करत आले आहेत आणि करत आहेत. या काळात अनेकांनी ‘गोडसे देशभक्त होते’, अशीही विधाने केलेली आहेत. ते असे का म्हणत आहेत ? हे गोडसे यांचे पुस्तक वाचल्यावर कुणाच्याही लक्षात येईल. पंडित नथुराम गोडसे यांनी, ‘फाशी दिल्यानंतर माझ्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर ज्या अस्थी मिळतील, त्या फाळणीमुळे पाकिस्तानात गेलेली सिंधू नदी पुन्हा भारतात येत नाही, तोपर्यंत त्या विसर्जित करू नयेत’, असे इच्छापत्र लिहिलेले आहे. हे किती जणांना ठाऊक आहे ? ‘अशी व्यक्ती देशभक्त नाही’, असे कुणी म्हणत असेल, तर चर्चा होणे आवश्यक आहे. नथुराम यांची सिंधू नदी पाकिस्तानात जाण्यामागील जी वेदना आहे, ती समजून घ्यावीच लागेल. १० लाख हिंदूंची हत्या होत असतांना पाकिस्तानला त्याच्या वाट्यातील ५५ कोटी (आताचे सुमारे ७० सहस्र कोटी रुपयांहून अधिक) रुपये देण्यासाठी गांधी यांनी उपोषण केल्याची चीड गोडसे यांच्या मनात होती, हे त्यांनी सांगितलेले आहे. आणखी बरेच काही या पुस्तकात लिहिले आहे. आज देशात अखंड भारताची चर्चा होत असतांना नथुराम गोडसे यांच्या इच्छापत्राची आठवण येणे आवश्यक आहे. गोडसे यांनाही तेच अपेक्षित होते. त्यामुळे गोडसे यांच्याविषयी आता शंकराचार्यही बोलू लागल्याने यावर देशभरात ऊहापोह होणे आवश्यक ठरते !