जगातील ५ वी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था !
(३.७५ ट्रिलियन डॉलर म्हणजे ३०९ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम, तर जीडीपी म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन)
न्यूयॉर्क (अमेरिका) – भारताचा जीडीपी, म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन हे ३.७५ ट्रिलियन डॉलर्स, म्हणजे ३०९ लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. भारताच्या अर्थ मंत्रालयाने ट्वीट करून ही माहिती दिली. वर्ष २०१४ मध्ये भारताने दोन ट्रिलियन डॉलर्सचा (१६४ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचा) जीडीपीचा टप्पा पार केला होता. भारत जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे, असेही ट्वीटमध्ये सांगण्यात आले आहे.
#ETGraphics | India’s GDP swells to $3.75 trillion as it topples other biggies#India #GDP #IndianEconomy pic.twitter.com/lkAg1d1HiP
— Economic Times (@EconomicTimes) June 12, 2023
विकसित देशांशी तुलना केल्यास अमेरिकेचा जीडीपी हा २ सहस्त्र २१३ लाख कोटी रुपयांहून अधिक (२६ ट्रिलियन डॉलर), चीन साधारण १ सहस्त्र ६०० लाख कोटी रुपये (१९ ट्रिलियन डॉलर), जपान अनुमाने ३६० लाख कोटी रुपये (४.४ ट्रिलियन डॉलर) आणि जर्मनीचा जीडीपी हा ३५५ लाख कोटी रुपयांहून अधिकचा (४.३ ट्रिलियन डॉलर) आहे. त्यापाठोपाठ आता भारताचा क्रमांक लागतो. भारताचा जीडीपी हा ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा, रशिया आणि ऑस्ट्रेलिया या विकसित देशांच्या जीडीपीपेक्षा अधिक आहे.
अमेरिकेतील ‘मूडीज’ या आर्थिक क्षेत्रातील जागतिक आस्थापनाच्या अंदाजानुसार, एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था ६ ते ६.३ टक्क्यांनी वधारेल. गेल्या आठवड्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मात्र हा आकडा ८ टक्के इतका असेल. जीडीपीचे आकडे कोणत्याही देशासाठी अतिशय महत्त्वाचे असून ते देशाच्या वास्तविक अर्थव्यवस्थेचे संपूर्ण चित्र दर्शवतात.