हरिनामाच्‍या अखंड जयघोषात संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊली यांच्‍या पालखीचे पंढरपूरच्‍या दिशेने प्रस्‍थान !

संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्‍थान

आळंदी (जिल्‍हा पुणे) – वारकर्‍यांच्‍या टाळ मृदुंगाच्‍या गजरात ११ जून या दिवशी दुपारी ४ ते ६ या वेळेत संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्‍थान सोहळा पार पडला. इंद्रायणीच्‍या काठावर सहस्रों वारकरी आलेे होते. या पालखी सोहळ्‍याची सहस्रों विठ्ठल भक्‍त प्रतिक्षा करत असतात. ज्ञानोबा माउलींच्‍या पालखी सोहळ्‍यात सहभागी होण्‍यासाठी मोठ्या संख्‍येने भाविक आळंदीत आले होते.

( सौजन्य : abp माझा )

पालखी प्रस्‍थान सोहळ्‍यासाठी दिव्‍यांची रोषणाई केली असल्‍यामुळे सोपान पुलावरील दर्शनबारी झगमगत होती. हरिनामाचा अखंड गजर होत होता. त्‍यानंतर संस्‍थानच्‍या वतीने आरती, नारळप्रसाद, विधीवत् मानपानाचा कार्यक्रम झाला. माउलींच्‍या मानाच्‍या दोन्‍ही अश्‍वांना मंदिरात प्रवेश देण्‍यात आला. नंतर महाद्वारातून पालखी प्रस्‍थान झाले. ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी सोहळा प्रदक्षिणा मार्गाने आजोळघरी मुक्‍कामासाठी जाणार आहे.

पायी प्रवास करून २८ जूनला पालखी पंढरपूरमध्‍ये पोचेल आणि २९ जूनला संत ज्ञानेश्‍वर माऊलींची विठुरायांशी भेट घडेल. यंदा पालखी सोहळ्‍याचे ३३८ वे वर्ष आहे.

कसा असेल आषाढी वारी पालखी सोहळा मुक्‍काम ?

पालखी सोहळा दिनक्रम

सोहळ्‍यात श्रींचा पालखी सोहळा पुण्‍यनगरीत २ दिवस पाहुणचार घेत १४ जूनला सासवड मुक्‍कामास दिवे घाटातून हरिनाम गजरात मार्गस्‍थ होईल. १४ आणि १५ जूनला सासवड येथे मुक्‍काम करेल. १६ जूनला जेजुरीकडे प्रस्‍थान, १७ जूनला जेजुरीला मुक्‍कामी असेल. १८ जूनला लोणंद येथे सोहळा विसावेल. १९ जूनला अधिक एक दिवसाचा मुक्‍काम आणि २० जूनला तरडगाव, २१ जूनला फलटणकडे प्रस्‍थान करेल. २२ जूनला पालखीचा फलटणमध्‍ये मुक्‍काम असेल. २३ जूनला नातेपुते, २४ जूनला माळशिरस मुक्‍काम, २५ जूनला वेळापूर, २६ जूनला भंडी शेगाव, २७ जूनला वाखरी, २८ जूनला पंढरपूर, २९ जूनला आषाढी एकादशी सोहळा साजरा होईल.