पिंपरी महापालिकेचे साहाय्यक उद्यान निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कह्यात !

( संग्रहीत छायाचित्र )

पिंपरी (पुणे) – उद्यानामध्ये केलेल्या देखभालीच्या कामाचे देयक संमत करण्यासाठी १७ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या साहाय्यक उद्यान निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे. नेहरूनगर येथील उद्यान विभागाच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. किरण अर्जुन मांजरे असे साहाय्यक उद्यान निरीक्षकांचे नाव आहे. यासंदर्भात ४७ वर्षीय ठेकेदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्या अन्वये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून नेहरूनगर येथील गुलाब पुष्प उद्यानात लाच स्वीकारतांना मांजरे यांना कह्यात घेतले. भोसरी एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

संपादकीय भूमिका 

अशा लाचखोर अधिकार्‍यांवर बडतर्फीची कारवाई करायला हवी. ‘त्यांच्यावर कुणाचा वचक नसल्याने लाच घेण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत’, असेच कुणालाही वाटेल !