वारकर्‍यांच्या सेवेसाठी पिंपरी पालिकेकडून १२ पथके !

( प्रतिकात्मक छायाचित्र )

पिंपरी (जिल्हा पुणे) – जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी वारकर्‍यांना विविध सेवासुविधा पुरवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी १२० अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. त्यांची १२ पथकांत विभागणी केली असून प्रत्येक पथकात एक ‘ग्रुप कमांडर’, एक ‘साहाय्यक ग्रुप कमांडर’ आणि ८ साहाय्यक आहेत. असे १२ अधिकारी ग्रुप कमांडर आणि १२ अधिकारी ‘साहाय्यक ग्रुप कमांडर’ आणि साहाय्याला ९६ अधिकारी आणि कर्मचारी असतील. त्यांच्यावर आपत्ती नियंत्रण कक्षाचे दायित्व आहे.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील निगडी ते दापोडी दरम्यान ८ आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर ४ टप्पे निश्चित केले असून प्रत्येक टप्प्याचे दायित्व एका पथकावर आहे. पालखी मुक्काम आणि विसाव्यासह दिंड्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता विषयक सुविधा पुरवण्याचे दायित्व या पथकांवर आहे.