सातारा, ९ जून (वार्ता.) – श्रीक्षेत्र चाफळ येथे हिंदु एकता आंदोलन आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने ३५० वा ‘श्री शिवराज्याभिषेकदिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी गावातील श्री मारुति मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती बैठ्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. नंतर मूर्तीचे विधीवत् पूजन करण्यात आले. या वेळी मंगलकलश पूजन करण्यात आले. मारुति मंदिरात सडा, रांगोळी आणि फुलांची आरास करण्यात आली होती. या वेळी उपस्थितांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’ आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. सायंकाळी श्रीक्षेत्र चाफळ गावातून छत्रपती शिवरायांची पालखीमधून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला गावातील माता-भगिनी, युवक-युवती आणि ज्येष्ठ शिवभक्त उत्साहाने सहभागी झाले. मिरवणुकीच्या अग्रभागी धर्मध्वज, लहान मुले, युवती, महिला, ज्येष्ठ शिवभक्त आणि युवक अशी शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यात आली. श्री मारुति मंदिर येथे मिरवणुकीची सांगता झाली. गावातील १०० हून अधिक शिवभक्त या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.
शिवराज्याभिषेकदिन सोहळा पार पाडण्यासाठी सर्वश्री पुरुषोत्तम पाटील, अभिजित पाटील, विनायक देशमुख, शिवानंद वेल्हाळ, सागर चव्हाण, बबलू बाबर, टायगर माने, रविराज पवार, रोहित पाटील, सूरज चव्हाण, अजिंक्य पाटील, श्रीकांत पाटील, किशोर बोबडे, सौरव थोरात, उमेश विभूते, कु. गायत्री साळुंखे, कु. वर्षा काटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
क्षणचित्रे
१. मिरवणूक घरांसमोर आल्यावर सुवासिनींनी श्री शिवप्रभूंच्या मूर्तीचे औक्षण केले.
२. मिरवणुकीमध्ये जागोजागी श्री शिवप्रभूंच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती.