छत्रपती संभाजीनगर येथे एकाच वेळी १ सहस्र १९८ ग्रामपंचायत सदस्‍य अपात्र !

जिल्‍हाधिकारी आस्‍तिककुमार पांडेय यांचा निर्णय !

आस्‍तिककुमार पांडेय

छत्रपती संभाजीनगर – विहित मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणार्‍या १ सहस्र १९८ ग्रामपंचायत सदस्‍यांना जिल्‍हाधिकारी आस्‍तिककुमार पांडेय यांनी अपात्र ठरवले आहे. विशेष म्‍हणजे यात अनेक सरपंच आणि उपसरपंच यांचाही समावेश आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्‍या जिल्‍ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया १८ जानेवारी २०२१ या दिवशी पूर्ण झाली होती.

जात वैधता प्रमाणपत्र ( संग्रहीत छायाचित्र )

या निवडणुकीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्‍या जाती, भटक्‍या विमुक्‍त जमाती, इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्गातील राखीव जागेवर निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र उमेदवारी अर्जासमवेत सादर करणे आवश्‍यक होते; पण विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्‍याने जिल्‍ह्यातील १ सहस्र १९८ ग्रामपंचायत सदस्‍यांना जिल्‍हाधिकार्‍यांनी अपात्र ठरवले आहे. राज्‍यशासनाने जानेवारी २०२१ साली मुदत सपलेल्‍या ग्रामपंचायतींच्‍या निवडणुका घोषित केल्‍या होत्‍या. त्‍यात जिल्‍ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींचा समावेश होता.

महामारीमुळे निवडणुकीतील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्‍यास १७ जानेवारी २०२३ पर्यंतची मुदत दिली होती; मात्र या मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्‍याने १ सहस्र १९८ उमेदवारांना जिल्‍हाधिकारी आस्‍तिककुमार पाण्‍ड्ये यांनी अपात्र ठरवले आहे. या निर्णयामुळे अनेक ठिकाणी समीकरण पालटण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्‍यामुळे सकाळपासूनच जिल्‍ह्यातील मंत्र्यांसह खासदार आणि आमदार यांनी दूरभाष करून निर्णय मागे घेण्‍यासाठी जिल्‍हाधिकार्‍यांवर दबाव तंत्र चालू केल्‍याचे कळते.

संपादकीय भूमिका 

एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत सदस्‍य अपात्र असणे गंभीर आहे ! अशांना सदस्‍यत्‍व कुणी दिले ? सदस्‍यत्‍व देणार्‍यांचीही चौकशी होेणे आवश्‍यक !