आरोग्‍य विज्ञान विद्यापिठात हरकती आल्‍यामुळे ९ सिनेट सदस्‍यांच्‍या नियुक्‍त्‍या रद्द !

( संग्रहीत छायाचित्र )

पुणे – महाराष्‍ट्र राज्‍य आरोग्‍य विज्ञान विद्यापिठाने हरकती आल्‍या म्‍हणून ९ नामनिर्देशित सिनेट सदस्‍यांच्‍या नियुक्‍त्‍या कोणतीही सूचना, तसेच कोणतीही प्रक्रिया न राबवता २० दिवसांत रद्द केल्‍या आहेत. मंत्रालयातील उच्‍चपदस्‍थ अधिकार्‍यांनी ठराविक लोकांची सदस्‍यपदी नियुक्‍ती करण्‍यासाठी दबाव टाकल्‍यामुळे नियुक्‍त्‍या रद्द केल्‍याचा आरोप होत आहे. आरोग्‍य विज्ञान विद्यापिठाच्‍या सिनेटवर विद्यापीठ कायद्यातील तरतुदी अन्‍वये सरकारी विद्यापिठाकडून सदस्‍यांची नेमणूक केली जाते. अशा ९ सदस्‍यांची ४ मे या दिवशी सिनेट सदस्‍य म्‍हणून नियुक्‍ती केली होती.

कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी नियुक्‍तांचे परिपत्रकही प्रसिद्ध केले; मात्र काही हरकती नोंदवल्‍यामुळे नियुक्‍त्‍यांच्‍या संदर्भात डॉ. बंगाळ यांनी ‘परिपत्रक मागे घेत असून अंतिम यादी लवकरच प्रसिद्ध करू’, असे नवीन परिपत्रक प्रसिद्ध केले. विद्यापीठ प्रशासनाच्‍या या कारभाराच्‍या संदर्भात सदस्‍यांनी आक्षेप नोंदवला असून कायद्यातील कलम ४० चा भंग केला असल्‍याचे म्‍हटले आहे, तसेच विद्यापिठाच्‍या कार्यशैलीला न शोभणारे प्रकार चालू असल्‍याची टीका सदस्‍यांकडून होत आहे.

संपादकीय भूमिका 

विद्यापिठात असे होणे अशोभनीय आहे ! संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्‍यक आहे !