गोवा : शासनाकडून पणजी परिसर, तसेच पणजी ते बाणस्तारी आणि पणजी ते झुआरी पूल या मार्गांवर वाहनांसाठी वेगमर्यादा अधिसूचित

पणजी, ३१ मे (सप) – उत्तर गोवाचे जिल्हा दंडाधिकारी यांनी वाहतूक कक्ष पणजी, पणजी पोलीस ठाणे, आगशी पोलीस ठाणे आणि जुने गोवे पोलीस ठाणे यांच्या कार्यक्षेत्रातील वाहनांसाठी वेगमर्यादा त्वरित प्रभावाने अधिसूचित केली आहे.

अधिसूचनेत असे नमूद केले आहे की राष्ट्रीय महामार्ग ४अ साठी दिवजा सर्कल ते दर्गा जंक्शन आणि  जुने गोवे येथील हात कातरो खांब ते बाणस्तारी पूल (धुळापी बाजू) यांवर सर्व वाहनांसाठी वेगमर्यादा ४० किमी प्रतिघंटा असावी. मेरशी येथील सर्कल ते हाथ कातरो खांबपर्यंत सर्व वाहनांची वेगमर्यादा ७० किमी प्रतिघंटा असावी. राष्ट्रीय महामार्ग १७साठी कदंबा बसस्थानक सर्कल पणजीपासून शिरदोन बाजूपर्यंतचा पूल आणि पुलाची गोवा वेल्हा बाजू ते झुआरी पूल आगशी बाजूपर्यंत दुचाकी आणि मालवाहतूक वाहने यांसाठी वेगमर्यादा ६० किमी प्रतिघंटा, तर अन्य चारचाकी वाहनांसाठी ७० किमी प्रतिघंटा असावी. गोवा वेल्हा बगलमार्ग जंक्शन (पिलारमार्गे) ते आगशी बगलमार्ग जंक्शन (पिलारमार्गे) ४० किमी प्रतिघंटा असावी.

 (सौजन्य : OHeraldo Goa)

मिरामार सर्कल ते सायन्स सेंटर जंक्शनपर्यंत जॅक सिक्वेरा रस्त्यावर वेगमर्यादा ४० किमी प्रतिघंटा असावी. जॅक सिक्वेरा मार्गावर सायन्स सेंटर जंक्शन, मिरामार ते राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था (एन्आयओ) सर्कल, दोनापावला वेगमर्यादा ६० किमी प्रतिघंटा असावी. दिवजा सर्कल ते मिरामार सर्कल पर्यंत दयानंद बांदोडकर मार्गासाठी वेगमर्यादा ५० किमी प्रतिघंटा असावी. रुआ दी ओरेम मार्गासाठी जुना पाटो पूल ते ४ खांब जंक्शन आणि राजभवन मार्गासाठी राजभवन मेन गेट ते Y जंक्शन वेगमर्यादा ४० किमी प्रतिघंटा असावी. समुद्रविज्ञान संस्था (एन्आयओ) सर्कल, दोनापावला ते गोवा वैद्यकीय महाविद्यालय जंक्शनपर्यंतच्या प्रमुख जिल्हा रस्त्यासाठी वेगमर्यादा ६० किमी प्रतिघंटा असावी. मिरामार सर्कल ते दोनापावलापर्यंतच्या इतर रस्त्यांसाठी (करंझाले अंतर्गत रस्ता), पिलार जंक्शन ते जुने गोवे येथील हात कातरो खांबपर्यंतच्या इतर रस्त्यांसाठी (नेवरा मार्गे) वेगमर्यादा ४० किमी प्रतिघंटा असावी. सायन्स सेंटर जंक्शन, मिरामार ते सांत मिंगेल हायस्कूल, ताळगाव आणि मधुबन बिल्डिंग जंक्शन, सांत इनेज ते चर्च जंक्शन, ताळगाव वेगमर्यादा ५० किमी प्रतिघंटा असावी. पणजीतील इतर सर्व रस्ते (दयानंद बांदोडकर मार्ग वगळता), तसेच राष्ट्रीय महामार्ग ४ अ वरील बाणस्तारी पूल, राष्ट्रीय महामार्ग-१७ वरील शिरदोन पूल, राष्ट्रीय महामार्ग-१७ वरील जुना आणि नवीन मांडवी पूल यांवर वेगमर्यादा ४० किमी प्रतिघंटा असावी. झुआरी पुलावर वेगमर्यादा ३० किमी प्रतिघंटा असावी.