वर्ष २०२२ मधील दत्तजयंतीच्या दिवशी, म्हणजे ७.१२.२०२२ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना स्वहस्ताक्षरात लिहिलेले आध्यात्मिक उत्तराधिकार पत्र दिले. हे उत्तराधिकार पत्र धातूच्या पत्र्यावर कोरण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये ते धातूवर कोरलेले उत्तराधिकार पत्र सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना प्रदान केले. सनातनच्या गुरुपरंपरेतील हे अनमोल क्षण साधकांनी भावपूर्णरित्या अनुभवले. श्री. विनायक शानभाग यांनी उत्तराधिकार पत्राचे वाचन केले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हस्ताक्षरातील उत्तराधिकार पत्र
अध्यात्म आणि धर्म प्रसारकार्य उत्तरोत्तर जोमाने वाढत जाईल !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि साधकांना दिलेले कृपाशीर्वाद !
मी माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी प्रार्थना करून माझे मनोगत व्यक्त करतो ! प.पू. भक्तराज महाराज गुरु म्हणून मला लाभल्यानंतर त्यांनी मला सर्व काही शिकवले आणि विश्वभर अध्यात्मप्रसार करण्याचा आशीर्वाद दिला. त्या आशीर्वादाचे परिणाम आज आपण बघत आहोत. गेल्या ८ वर्षांपासून पू. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून परमवंदनीय महर्षि जी आज्ञा करत आहेत, त्यानुसारही आपण साधना करत आहोत. आज पू. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून परमवंदनीय महर्षींच्या आज्ञेनुसार आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या निमित्ताने मला तुम्हा सर्वांशी बोलायची संधी मिळाली, यासाठी मी महर्षींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. आता मी कार्याबाबत थोडे सांगतो.
१. देश : गुरुकृपायोगानुसार २७ देशांमध्ये जिज्ञासू साधना करत आहेत.
२. साधक : अध्यात्मप्रसार, हिंदूसंघटन अशा विविध क्षेत्रांतील साधक दायित्व घेऊन कार्य करू लागले आहेत. मुख्य म्हणजे ते साधक स्वतः कार्य करत असतांना अन्य साधकांनाही घडवत आहेत. हे कार्य किती मोठ्या प्रमाणात वाढले आहे ! केवळ कार्यच वाढले आहे, असे नाही, तर त्या प्रमाणात साधकांची आध्यात्मिक उन्नतीही होऊ लागली आहे.
३. संत : सनातनचे १२४ संत अध्यात्माच्या सूक्ष्म क्षेत्रामध्ये इतके कार्य करत आहेत की, त्यामध्ये मला काही करण्याची आवश्यकताच राहिली नाही.
वयोमानानुसार वाढत्या थकव्यामुळे मी गेले अनेक वर्षे कुठे बाहेर गेलेलो नाही, अनेक साधकांनी मला प्रत्यक्ष कधीच बघितलेलेही नाही, तरी पण आपण सर्व साधकमंडळी माझ्या गुरूंनी सांगितलेले हे कार्य जोमाने पुढे नेत आहात. त्यामुळे आज मी तुम्हा सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो ! हे सर्व बघून मला खात्री झाली आहे की, हे कार्य पुढील काळात असेच जोमाने उत्तरोत्तर वाढत जाईल !
प.पू. भक्तराज महाराज, परमवंदनीय सप्तर्षि आणि पू. ॐ उलगनाथन्जी यांच्या चरणी वंदन करून मी माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार !
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (११.५.२०२३)
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकार्यांना ‘उत्तराधिकार पत्र’ प्रदान करत असतांना घडलेली सूक्ष्मातील प्रक्रिया
श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे धातूवर कोरलेले शब्द, म्हणजे ‘ब्रह्मवाक्यच’ आहे. उत्तराधिकार पत्रातील प्रत्येक शब्दातून प्रकट झालेल्या ब्रह्मवाक्यातून साक्षात् ‘ब्रह्मवाणीच’ कार्यान्वित झाली होती. ही सूक्ष्मतम वाणी ‘परात्पर परा’ स्तरावरील ‘ब्रह्मवाणी’ असून ती सूत्रसंचालक श्री. विनायक शानभाग यांच्या माध्यमातून स्थुलातून आणि सगुण स्तरावर वैखरी-मध्यमा वाणी यांच्या स्वरूपात साकार झाली होती. ही वाणी ऐकण्यासाठी अवकाशात समस्त दिक्पाल, लोकपाल आणि त्रिदेव अन् त्रिदेवी उपस्थित होत्या. या दैवी शक्तींच्या साक्षीने श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या अवतारी शक्तीतील सौदामिनी शक्ती भूदेवीचा अवतार श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि योगशक्ती श्रीदेवीचा अवतार श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना प्रदान केली. अशा प्रकारे भूदेवीचा अवतार श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीदेवीचा अवतार श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी असल्याची ब्रह्मघोषणा करण्यात आली.
त्यामुळे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामध्ये श्रीविष्णूची क्रियाशक्ती स्थुलातून आणि सगुण स्तरावर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी प्रगट स्वरूपात कार्यरत झाली. तसेच श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामध्ये श्रीविष्णूची ज्ञानशक्ती पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना सूक्ष्म स्तरावर करण्यासाठी प्रकट स्वरूपात कार्यरत झाली. त्यामुळे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामध्ये श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून निळसर रंगाची कड असलेले सोनेरी रंगाचे तेज:पुंज गोळे आणि विजेप्रमाणे चमकणार्या दिव्य शलाका जातांना दिसल्या. या प्रक्रियेला ‘अवतारी शक्तीचे संक्रमण होणे’ असे म्हणतात. अशा प्रकारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सद्गुरुद्वयींना उत्तराधिकार पत्राच्या माध्यमातून त्यांची अवतारी शक्ती प्रदान करून त्यांच्याकडून पृथ्वीवर समस्त जिवांच्या उद्धारासाठी हिंदु राष्ट्र स्थापनेचे दैवी कार्य पूर्णत्वाला नेण्याचे उत्तरदायित्व देऊन हे उत्तरदायित्व पूर्णत्वाला नेण्यासाठी जणू अवतारी संकल्पच केला.
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(१३.५.२०२३)
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या कृपाशीर्वादात्मक संदेशाद्वारे वैश्विक कल्याणाचा संकल्प करणे
ब्रह्मोत्सव सोहळ्यात जेव्हा श्री. विनायक शानभाग श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मनोगताचे वाचन करत होते, तेव्हा श्री. विनायक शानभाग यांच्या ठिकाणी श्रीविष्णूचे परमभक्त देवर्षि नारद यांचे दर्शन झाले. ते कीर्तनभक्तीच्या माध्यमातून श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दिव्य वचन श्रीविष्णुवाणीच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवत असल्याचे जाणवले. त्याचप्रमाणे श्रीविष्णूचे गुणगान करण्यासाठी समर्पितभावाच्या मुद्रेतील श्रीविष्णुवाहन गरुडदेव आणि दास्यभावातील हनुमान यांचे तत्त्व श्री. विनायक शानभाग यांच्यामध्ये कार्यरत झाल्याचे जाणवले. श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या मनोगतातून संपूर्ण सृष्टीच्या कल्याणाचा संकल्प समष्टीपुढे व्यक्त करून वैश्विक कल्याणाचा संकल्प केल्याचे जाणवले. तेव्हा श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हृदयातून ओसंडून वहाणार्या गुलाबी रंगाच्या प्रीतीगंगेचे असंख्य प्रवाह दशदिशांना उपस्थित असणार्या भक्तांकडे वेगाने वाहू लागले. हे प्रवाह सर्वांचे कल्याण करण्यासाठी त्यांच्यावर प्रीतीमय चैतन्य आणि वात्सल्य यांचा भरभरून वर्षाव करत असल्याचे जाणवले. त्यामुळे गुरुमाऊलीचे मनोगत ऐकून सर्व साधकांचा त्यांच्याप्रती असणारा कृतज्ञताभाव दाटून आल्याचे जाणवले.
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(१३.५.२०२३)
|