रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ‘अकौन्टन्सी’ संग्रहालय होणार

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ‘अकौन्टन्सी म्युझियम ’

रत्नागिरी – येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ‘अकौन्टन्सी म्युझियम (संग्रहालय)’ साकारण्यात येणार आहे. याकरता ‘सीए इन्स्टिट्यूट’च्या पश्चिम विभागीय समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेच्या अध्यक्ष अन् पदाधिकारी यांनी महाविद्यालयास नुकतीच भेट दिली. त्यानुसार हे संग्रहालय सिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये प्राचीन काळापासून आजपर्यंत ‘अकौन्टन्सी’मध्ये होत गेलेली प्रगती प्रदर्शनाच्या रूपात पहायला मिळणार आहे.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालय

या संग्रहालयामध्ये व्यवहाराच्या पालटत्या पद्धती, विकसित होत गेलेल्या प्रणाली, जुन्या काळातील हस्तलिखिते, शिल्पे, जगभरातील संग्रहालयांमध्ये साठवलेल्या कलाकृतींची छायाचित्रे, महत्त्वाची जर्नल्स, नाणी, पदके, पहिल्या अकौन्टन्सीच्या प्रतिमा, जुने ताळेबंद आदी गोष्टी पहायला मिळणार आहेत. सुमेरियन, हडप्पा संस्कृतीच्या काळातील चलने, पहिले भारतीय नाणे, मोहरा, हस्तलिखित धनादेश, खातेपुस्तक, मुनीमची परंपरा आदी गोष्टींचा यात समावेश आहे. नव्या पिढीला अकौन्टन्सीविषयी माहिती व्हावी, गोडी लागावी आणि अकाउंटचा इतिहास, व्यवहाराच्या पद्धती समजून घेता याव्यात, यासाठी हे संग्रहालय उपयुक्त ठरणार आहे.

देशाच्या आर्थिक विकासात योगदान देणार्‍या ‘आयसीएआय’ ही सर्वांत मोठी  जगातील दुसर्‍या क्रमांकाची संस्था आहे. विद्यार्थी आणि सनदी लेखापाल यांच्या प्रगतीसाठी सातत्याने नवीन उपक्रम राबवण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील वाणिज्य महाविद्यालयांमध्ये अकौन्टन्सी संग्रहालय स्थापन करण्यात येणार आहेत, असे सीए इन्स्टिट्यूट शाखाध्यक्ष सीए मुकुंद मराठे यांनी सांगितले.