आतंकवादी महंमद अरिफ शेख याचे अनधिकृत घर प्रशासनाने पाडले !

आतंकवादी बनलेला महंमद आरिफ शेख याचे अनधिकृत घर प्रशासनाने पाडले.

श्रीनगर – रियासी जिल्ह्यातील बरनसाल येथील शिक्षक आणि नंतर आतंकवादी बनलेला महंमद आरिफ शेख याचे अनधिकृत घर प्रशासनाने पाडले. (अशा आतंकवाद्याने विद्यार्थ्यांना कसले धडे दिले असतील, याचा विचारच न केलेला बरा ! – संपादक) त्याने सरकारी भूमीवर घर बांधले होते. (सरकारी भूमीवर घर बांधेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? – संपादक)

कटरा येथील कडमाल येथे झालेला बाँबस्फोट, तसेच जम्मू येथील नरवाल येथे झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. कडमाल येथील बसगाडीमध्ये झालेल्या बाँबस्फोटात ५ जण ठार झाले होते, तसेच नरवाल येथे झालेल्या बाँबस्फोटात ९ जण घायाळ झाले होते. या बाँबस्फोटांच्या चौकशीनंतर महंमद अरिफ शेख याचे नाव समोर आले होते. त्याला अटक केल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने त्याला नोकरीवरून काढून टाकले होते.