हिंदु राष्ट्राचे समर्थन ठामपणे करा !

भाजपच्या महाराष्ट्र राज्याच्या ट्विटर हँडलवरून भारत हे हिंदु राष्ट्र होते, हिंदु राष्ट्र आहे आणि हिंदु राष्ट्रच राहील, असे ट्वीट करण्यात आले आहे. यासमवेत  महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्रही देण्यात आले आहे. यावरून काही प्रसिद्धीमाध्यमांनी भाजपची ही भूमिका अधिकृत आहे का ?, असा प्रश्‍न उपस्थित केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर ही भाजपची अधिकृत भूमिका नसल्याचे म्हटले, तर भाजपच्या काही नेत्यांनी हिंदु राष्ट्राच्या भूमिकेचे समर्थनही केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांच्या नेत्यांनी भाजपला धर्मांध ठरवण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीही जेव्हा जेव्हा हिंदु राष्ट्र हा शब्द येतो, तेव्हा तो घटनाबाह्य, तसेच धर्मनिरपेक्षतेच्या विरोधी ठरवला जातो. हिंदु राष्ट्राची संकल्पना काहींना तालिबानी वृत्तीप्रमाणे धर्मांध वाटते, तर काहींना ही संकल्पना म्हणजे भाजपचा सत्ता मिळवण्याचा अजेंडा वाटतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांसारख्या धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या पक्षांसाठी ती अल्पसंख्यांकविरोधी वाटते. मुळात या सर्व अपसमजातूनच हिंदु राष्ट्राच्या विरोधात या प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांनी राजकीय स्वार्थासाठी हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेची अपकीर्ती करणे स्वाभाविक आहे; परंतु हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेचे समर्थन हे राज्यघटनेच्या विरोधात आहे, असे वाटून भाजप, शिवसेना आदी हिंदुत्वनिष्ठ पक्ष, हेच काय, तर हिंदुत्वाविषयी आस्था बाळगणारे अनेक नेतेही हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेचे समर्थन करायला कचरतात. असे कुणी केलेच, तर त्यांना राज्यघटनाविरोधी ठरवायला पुरो (अधो)गामी मंडळी टपलेलीच असतात. हिंदु राष्ट्राची संकल्पना स्पष्ट नसल्यामुळेच हिंदुत्वनिष्ठ राजकीय नेते आणि धर्मप्रेमी हिंदु यांची संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यासाठी मुळात हिंदु राष्ट्र या संकल्पनेची व्यापकता समजून घेणे आवश्यक आहे.

हिंदु राष्ट्राची संकल्पना ही राज्यघटनाच काय, तर अखिल मानवजातीमध्ये किंवा अखंड विश्‍वामध्ये कुणाच्याच विरोधात नाही. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्यामुळे हिंदु राष्ट्र ही संकल्पना केवळ जन्महिंदूंचा विचार करणारी आहे, असे वाटून तिला राज्यघटनाविरोधी ठरवले जाते. मुळात केवळ हिंदु धर्मातच विश्‍वकल्याणासाठी संकल्पना आहे. धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव यांसह मानवता, भूतदया यांसारख्या संकल्पना यामध्ये अंतर्भूत आहेत. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते, तसेच हिंदुत्वनिष्ठ पक्षांचे नेते यांनी ही संकल्पना राज्यघटनाविरोधी असल्याच्या पुरोगाम्यांच्या बागुलबुव्याला फसून एक पाऊल मागे येऊ नका. हिंदु राष्ट्राची विश्‍वकल्याणकारी संकल्पना समजून घेऊन तिचा ठामपणे पुरस्कार करा.

राजकीय आरोपांनी विचलित होऊ नका !

हिंदु राष्ट्राची भूमिका मांडली, तर मुसलमान इस्लामी राष्ट्राची, ख्रिस्ती ख्रिस्ती राष्ट्राची, तर बौद्धजन बौद्ध राष्ट्राची मागणी करतील, असा बुद्धीभेद करून पुरोगामी मंडळी हिंदूंना गप्प करतात; परंतु मुळात हिंदु राष्ट्र असलेला भारत वर्ष १९७६ मधील घटना दुरुस्तीत धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) करण्यात आला आहे, याविषयी कुणी बोलत नाही. मुसलमान, ख्रिस्ती आणि बौद्ध यांची जगात अनेक राष्ट्रे अस्तित्वात आहेत; मग भारताने प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या आपल्या धर्माचा अंगीकार केला, तर ते राज्यघटनाविरोधी कसे ?  आणीबाणीमध्ये केलेली घटनादुरुस्ती, हीच मुळात राज्यघटनाविरोधी होती, हे आता हिंदूंनी ठामपणे सांगायला हवे. हिंदु राष्ट्र संकल्पनेला धर्मांध ठरवणे, मुसलमान आणि अल्पसंख्यांक यांच्याविरोधी ठरवणे, हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा राजकीय अजेंडाच आहे. या अजेंड्यावरच त्यांची मतांची झोळी भरते. हिंदु राष्ट्रामध्ये मुसलमान, ख्रिस्ती किंवा अन्य पंथ यांचे काय होईल ?, असा प्रश्‍न उपस्थित करणार्‍यांच्या लक्षात आणून द्या की, फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये असलेल्या हिंदूंची वाताहात झाली; मात्र भारतात असलेल्या अल्पसंख्यांकांना सर्वाधिक सुविधा मिळाल्या. हे हिंदूंच्या पर्यायाने हिंदु धर्माच्या व्यापकतेचे उदाहरण आहे. स्वराज्यावर चालून आलेले औरंगजेब आणि अफझलखान यांच्याही कबरी येथे आहेत. त्यांच्या कबरीवर डोकी ठेवणार्‍यांना हिंदू स्वत:चे बांधवच म्हणवून घेतात. याहून हिंदु धर्माच्या सहिष्णुतेचे आणखी कोणते उदाहरण असेल ? त्यामुळे जेव्हा जेव्हा हिंदु राष्ट्राचा विषय येईल, तेव्हा राज्यघटना, धर्मनिरपेक्षता, अल्पसंख्यांक यांच्याविरोधी हे विषय पुढे करून ही तथाकथित निधर्मीवादी सर्व मंडळी एकत्र होऊन त्याला विरोध करणे, हे स्वाभाविकच आहे. त्यामुळे विचलित न होता हिंदु राष्ट्राची व्यापक संकल्पना सर्व हिंदूंपर्यंत पोचणे आवश्यक आहे.

रामराज्याचा पुरस्कार करायला भीती कुणाची ?

इतिहासामध्ये हिंदूंनी कुणावर आक्रमण केल्याचे एकही उदाहरण नाही. हिंदूंनी आक्रमण केले, ते केवळ आणि केवळ स्वरक्षणासाठी ! हिंदु राष्ट्राची संकल्पना ही रामराज्याचीच संकल्पना आहे. छत्रपती शिवरायांच्या राज्यात ज्याप्रमाणे सर्व प्रजेच्या सुखाचा विचार होत होता. तोच विचार हिंदु राष्ट्राचा असेल; परंतु अल्पसंख्यांक म्हणून कुणाच्या राष्ट्रविरोधी कारवायांना हिंदु राष्ट्रात पाठीशी घातले जाणार नाही. हिंदु राष्ट्राची ही संकल्पना स्पष्ट असेल, तर त्याचे समर्थन करण्याविषयी अडचण रहाणार नाही.

हिंदु राष्ट्रातील राजा हा पक्षहितापुरता संकुचित नसेल, तर राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा आणि स्वत: धर्माचरण करणारा अन् कर्तव्यपरायण असेल. त्यामुळे सध्याच्या पक्षीय स्वार्थी राजकारणाची तुलना हिंदु राष्ट्राशी करू नका. हिंदु राष्ट्राची व्यापक संकल्पना समजून घ्या आणि असे विश्‍वकल्याणकारी हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी कटीबद्ध व्हा !

धर्मांध नव्हे, तर विश्‍वकल्याणकारी असल्याचे ठामपणे सांगून हिंदु राष्ट्र संकल्पनेचे समर्थन करा !