सातारा जिल्ह्यातील सनातनच्या साधकांनी ‘घरोघरी लागवड मोहिमे’च्या अंतर्गत केलेले प्रयत्न !

१. सौ. दीपाली गिते, शाहूपुरी, सातारा.

१ अ. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये प्रसिद्ध होणारी लागवडीविषयीची चौकट वाचून झाडांवर नैसर्गिक उपचार करणे आणि त्‍यानंतर झाडांमध्‍ये झालेले पालट पाहून आनंद होणे : ‘सनातन संस्‍थेच्‍या वतीने ‘घरोघरी लागवड’ मोहीम राबवण्‍यात येत आहे. माझ्‍याकडे लागवडीसाठी पुरेशी जागा उपलब्‍ध नाही. मी ‘सुभाष पाळेकर कृषी पद्धती’ने शहर शेती करणार्‍या पुणे येथील श्रीमती ज्‍योती शहा यांचे मार्गदर्शन ऐकले. मी त्‍यांनी सांगितल्‍याप्रमाणे ‘ह्यूमस’ (सुपीक माती) आणि जीवामृत (देशी गायीचे शेण, गोमूत्र, बेसन आणि गूळ यांच्‍यापासून बनवलेले मिश्रण) करायला आरंभ केला; तसेच सौ. राघवी कोनेकर यांची प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये येणारी लागवडीविषयीची चौकट वाचली. त्‍यात सांगितल्‍याप्रमाणे कीड आणि ‘मिलीबग (पिठ्या ढेकूण)’ यांचा संसर्ग होऊ नये; म्‍हणून नीमास्‍त्राची (कडूनिंब, देशी गायीचे शेण आणि गोमूत्र यांपासून बनवलेले औषध) फवारणी केली.

वरील उपचार केल्‍यावर झाडे आणि रोपे अधिकच तेजस्‍वी अन् पानेही चकचकीत दिसू लागली. आमच्‍याकडे पूर्वीपासून असलेले आंबा, नारळ, चिंच, कागदी लिंबू, तसेच फुलझाडे आणि कुंडीत लावलेल्‍या आयुर्वेदाच्‍या वनस्‍पती यांना मी मासातून दोनदा जीवामृत घालायला आरंभ केला. त्‍यामुळे आंब्‍याच्‍या झाडाला मागील वर्षापेक्षा अधिक आंबे आले. झाडांना फुले यायला लागली. कागदी लिंबाच्‍या झाडालाही लिंबे येऊ लागली. ती लिंबे बाजारातील लिंबांपेक्षा रसरशीत, टपोरी आणि सुवासिक आहेत. निशिगंधाच्‍या झाडांना डिसेंबर मासात फुले येतात; पण बहर नसतांनाही निशिगंधाला ४ – ५ फुले आणि कळ्‍याही आल्‍या. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये प्रसिद्ध झालेल्‍या लेखांचे वाचन करून त्‍याप्रमाणे कृती केल्‍यावर स्‍वतः प्रयत्न करून लावलेली झाडे, त्‍यांना आलेली फळे आणि फुले पाहून मला पुष्‍कळ चांगले वाटले. फुलझाडांना नियमित येणारी ताजी फुले देवाला वहातांना मला वेगळाच आनंद मिळू लागला.

नैसर्गिक पद्धतीच्‍या शेतीची कास धरून सर्वांना निरपेक्षपणे नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून देणारे ॠषितुल्‍य व्‍यक्‍तीमत्त्व पद्मश्री सुभाष पाळेकरगुरुजी यांच्‍या चरणी मी कृतज्ञ आहे !

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळाची भीषणता ओळखून आम्‍हा साधकांना लागवडीचे अमूल्‍य ज्ञान दिले. त्‍यामुळे माझा झाडांकडे पहाण्‍याचा दृष्‍टीकोन पालटला. माझ्‍याकडून झाडांना प्रार्थना आणि कृतज्ञता व्‍यक्‍त होऊ लागली. मला निसर्गदेवता आणि वृक्षदेवता यांच्‍या अनंत उपकारांची जाणीव झाली. मला ‘झाडांची काळजी कशी घ्‍यावी ?’, हे समजले’, यासाठी त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

२. सौ. शारदा टिकोले, रघुनाथपूर, सातारा.

२ अ. भाजीपाल्‍याची लागवड करतांना पुष्‍कळ आनंद मिळणे : ‘घरोघरी लागवड’ मोहिमेप्रमाणे गुरुमाऊलींनी (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) माझ्‍याकडून प्रयत्न करून घेतले. मी शेतातील माती आणून घराजवळ पालक, चाकवत, वांगी, मेथी, दोडका, हिरवी मिरची इत्‍यादी भाज्‍यांची लागवड केली. मी लहान असतांना आम्‍ही शेतात रहात होतो. माझे आई-वडील नेहमी फळभाज्‍या आणि पालेभाज्‍या यांची लागवड करायचे. त्‍यामुळे आता भाजीपाला लावतांना मला पुष्‍कळ आनंद मिळाला.

२ आ. घरी केलेल्‍या लागवडीतून पुष्‍कळ भाजीपाला आणि फुले मिळणे : माझ्‍या घरच्‍या वेलीला दोडकी लागल्‍यामुळे मला २ मास दोडकी विकत आणावी लागली नाहीत. घोसावळीही पुष्‍कळ आल्‍या आहेत. पालक, मेथी, चाकवत आणि अंबाडी या भाज्‍याही पुष्‍कळ आल्‍या होत्‍या. नवरात्रीत विड्याची पाने घरच्‍याच लागवडीतून मिळाली. घरी लावलेल्‍या भाज्‍यांची चवही चांगली होती. अंजिराच्‍या झाडाला शंभरहून अधिक अंजिर नियमितपणे लागत होते. देवाला वहाण्‍यासाठी प्रतिदिन पुरतील एवढी फुले, बेल, दूर्वा, तुळस इत्‍यादी लागवडीत मिळतात.

३. सौ. वैशाली अमित घाडगे, शाहूपुरी, सातारा.

३ अ. पूर्वी शेतीविषयी आवड नसणे आणि दैनिक ‘सनातन प्रभात’मधील मार्गदर्शन वाचून लागवडीसंबंधी कृती चालू करणे : ‘पूर्वी मला शेतीविषयी काहीच आवड नव्‍हती. शेतात गेल्‍यावर माझ्‍याकडून नामजप आणि प्रार्थना होत नसत. त्‍यामुळे शेतात पुष्‍कळ नकारात्‍मकता जाणवत होती. शेतात उत्‍पन्‍नही पुष्‍कळ अल्‍प यायचे. वर्ष २०२२ मध्‍ये सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी लागवडीविषयीचा सत्‍संग घेतला. तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या माध्‍यमातून ‘आपत्‍काळ आणि लागवड कशी करायची ?’, याविषयी मार्गदर्शन मिळू लागले. तेव्‍हा मी त्‍याप्रमाणे लागवडीसंबंधी कृती चालू केली.

३ आ. झाडांवर नैसर्गिक उपचार करणे आणि त्‍यांना नामजप ऐकवणे : आम्‍ही देगाव (जिल्‍हा सातारा) येथील आमच्‍या शेतामध्‍ये फेब्रुवारी २०२२ मध्‍ये भुईमूग लावला होता. तो जून मासात काढला. मला या ५ मासांत पुष्‍कळ ईश्‍वरी तत्त्व अनुभवायला मिळाले. शेतात गेल्‍यावर माझ्‍याकडून भूमातेला प्रार्थना होत होती आणि तिच्‍याविषयी मला पुष्‍कळ कृतज्ञताही वाटत होती. मी प्रतिदिन सकाळी ६.३० वाजता शेतात गेल्‍यावर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा ध्‍वनीमुद्रित केलेला नामजप लावत असे. त्‍या कालावधीत मी निसर्गदेवतेचा नामजप (‘ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदं प्रमाणम् । हरि ॐ । जय मे जयम् । जय गुरुदेव ।’) करत होते. मी झाडांना जीवामृत, तसेच गायीचे शेण आणि घरातील भाजीपाल्‍याचे अवशेष या सर्वांचे खत घातले. मी ‘झाडांजवळ जाऊन त्‍यांच्‍या पानांवरून प्रेमाने हात फिरवणे, त्‍यांना ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप ऐकवणे’, अशा कृती केल्‍या. झाडांना नामजप ऐकवतांना मी त्‍यांच्‍यासाठी प्रार्थना करत असे. मी झाडांना ‘तुम्‍ही नामजप करा. गुरुमाऊलींच्‍या कृपेने तुमचीही साधना होऊ दे’, असे म्‍हटल्‍यानंतर ‘ती झाडे जोराने हलतात’, असे अनुभवले.

३ इ. नैसर्गिक उपचार; तसेच नामजप आणि प्रार्थना यांमुळे शेतात पुष्‍कळ चैतन्‍य जाणवणे अन् अधिक चविष्‍ट भाजीपाला मिळणे : नामजप आणि प्रार्थना यांमुळे झाडे टवटवीत दिसू लागली. जेव्‍हा झाडांची पाने हलायची, तेव्‍हा ‘ती हसत आहेत’, असे मला वाटायचे. मला शेतात पुष्‍कळ चैतन्‍य जाणवायला लागले. ‘झाडे आणि भाजीपाला सर्व शेतात चैतन्‍य पसरवत आहेत’, असे मला वाटत होते. आंब्‍याची सुकून गेलेली झाडे परत उगवली. आंब्‍याच्‍या झाडांना जवळजवळ १ ते दीड किलो वजनाचेे आंबे लागले होते. भुईमुगाचेही उत्‍पन्‍न नेहमीपेक्षा दुपटीने आले. मेथी आणि कोथिंबीर यांची चव अप्रतिम लागत होती. काकडी पुष्‍कळ रसदार होती. २ मास भेंडी आणि गवार या शेतातीलच भाज्‍या मिळत होत्‍या. साधक शेतात येऊन गेले तेव्‍हा त्‍यांनाही शेतामध्‍ये चैतन्‍य आणि सात्त्विकता जाणवली. ‘निसर्गातच ईश्‍वर असतो’, हे मला अनुभवण्‍यास मिळाले.

३ ई. ‘सात्त्विक भाज्‍या खायला मिळाल्‍यामुळे यजमानांच्‍या स्‍वभावामध्‍ये पुष्‍कळ पालट झाला आहे’, असे मला वाटले. तेही सत्‍संग ऐकू लागले आहेत.

‘मला हे सर्व केवळ गुरुमाऊलींची कृपा आणि साधकांचे मार्गदर्शन यांमुळे साध्‍य झाले. ‘लागवड कशी करावी ?’, हे मला शिकता आले’, यासाठी त्‍या सगळ्‍यांच्‍या प्रती कोटीशः कृतज्ञता !’

(सर्व सूत्रांचा मास : फेब्रुवारी २०२३)