#Exclusive : किमान स्वच्छता ठेवण्याविषयीही जळगाव बसस्थानकाची अनास्था !

जळगाव बसस्थानक परिसरात इतरत्र पडलेला कचरा आणि वाढलेली जंगली झुडपे

एस्.टी. महामंडळाच्‍या ‘बसस्‍थानक स्‍वच्‍छता मोहिमे’चे खरे स्‍वरूप उघड करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची वृत्तमाला !

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केवळ घोषणा, प्रत्यक्षात बहुतांश बसस्थानकांची दुरवस्था !

राज्य परिवहन मंडळाने यंदाच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्षात ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम’ हाती घेऊन कार्यक्रमही निश्‍चित केला आहे. या मोहिमेला साहाय्य व्हावे, या हेतूने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींना लक्षात आलेली विविध शहारांतील बसस्थानकांची दुःस्थिती येथे मांडत आहोत. बसस्थानकांची ही विदारक स्थिती पालटली आणि तिथे मूलभूत सोयी उपलब्ध झाल्या, तर ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे परिवहन मंडळाचे ब्रीदवाक्य अधिक खरे ठरेल. ‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.

– श्री. रवींद्र हेंबाडे, जळगाव

जळगाव, ३० मार्च (वार्ता.) – परिसरात खाऊची वेष्टने, प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या आदींसह अनेक दिवस साचलेला कचरा, वेळच्या वेळी तोडणी न केल्यामुळे वाढलेली जंगली झुडपे, सर्वत्र पसरलेली राख अन् मातीचे ढीग यांकडे जळगाव बसस्थानकाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. एकीकडे ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम’ चालू असतांना जळगाव बसस्थानकाची किमान स्वच्छता राखण्याकडेही महामंडळाची अनास्था दिसून येत आहे.

अपुर्‍या आसनव्यवस्थेमुळे बससाठी ताटकळत उभे असलेले प्रवासी

१. जळगाव बसस्थानकाच्या आवारात विज्ञापनांसाठी काही लोखंडी चौकटी उभारण्यात आल्या आहेत. त्यांवर लावलेले काही फलक तुटून लोंबकळत आहेत.

२. वाढलेली जंगली झुडपे वेळीच न तोडल्यामुळे ती बरीच वाढली आहेत.

३. स्थानकाच्या परिसरात पडलेला कचरा एकाच ठिकाणी न जाळता वेगवेगळ्या ठिकाणी जाळल्यामुळे परिसरात अनेक ठिकाणी राख साचली आहे.

कचरा जाळण्याने साचलेली राख

४. दुचाकी लावण्यासाठी जागा निश्‍चित केल्यास एक शिस्त येईल; मात्र तशी व्यवस्था नसल्यामुळे बसस्थानकाच्या परिसरात दुचाकी इतरत्र लावल्या जातात.

अस्थाव्यवस्तपणे लावण्यात आलेल्या दुचाकी

५. बसस्थानकाच्या काही परिसरात लाद्या बसवण्यात आल्या आहेत; मात्र हे काम करतांना खणण्यात आलेली माती अनेक मास होऊनही परिसरात तशीच साचली आहे.

परिसरात इतरत्र साचलेली माती

६. बसस्थानकाची इमारत जुनी झाली असून अनेक ठिकाणी बांधकाम निखळले आहे. इमारतीची डागडुजी करणे आवश्यक आहे. बसस्थानकाच्या भिंती धुळीने काळवंडल्या आहेत.

७. बसस्थानकाच्या परिसरात करण्यात आलेल्या डांबरीकरणावरील डांबर निघून गेले असून खडी वर आली आहे. बसस्थानकाच्या परिसराचे डांबरीकरण, इमारतीची डागडुजी ही कामे आर्थिक प्रावधान नसल्यामुळे रखडले असण्याची शक्यता आहे.

बसस्थानकाच्या आवारात डांबर निघून वर आलेली खडी

एस्.टी. महामंडळाने जरी ‘बसस्थानक मोहीम’ घोषित केली असली, तरी त्यानुसार कार्यवाही होत आहे कि नाही ? याकडे नेमके कोण लक्ष ठेवत आहे ? कि ही मोहीम केवळ कागदोपत्रीच आहे ? असे प्रश्‍न सर्वसामान्यांमध्ये निर्माण होत आहेत.

बसस्‍थानकांच्‍या दुरवस्‍थेची छायाचित्रे पाठवा !

आपापल्‍या भागांतील बसस्‍थानकांची अस्‍वच्‍छता आणि दुरवस्‍था यांविषयी छायाचित्रांसह माहिती एस्.टी. महामंडळाच्‍या ‘@msrtcofficial’ या ‘ट्‍विटर हँडल’वर पाठवा आणि ही माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’साठी ९२२५६३९१७० या ‘व्‍हॉट्‍सअप’ क्रमांकावरही पाठवा. बसस्‍थानकांची दयनीय स्‍थिती दाखवून स्‍वच्‍छता मोहिमेसाठी एस्.टी.ला सहकार्य करा.