भारतात धार्मिक स्वातंत्र्य आहे !

सिडनी विश्‍वविद्यालयाच्या अहवालातून बीबीसीला चपराक !

प्राध्यापक साल्वाटोर बबोन्स

कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – भारत जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला देश आहे जिथे जगातील सुमारे निम्मे लोक मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांद्वारे त्यांचे मत व्यक्त करण्यास सक्षम आहेत. भारतात धार्मिक स्वातंत्र्य आहे, असे आस्ट्रेलियातील सिडनी विश्‍वविद्यालयाच्या एका अहवालात प्राध्यापक साल्वाटोर बबोन्स यांनी म्हटले आहे. बीबीसीसारख्या आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमाकडून होत असलेल्या भारताच्या अपकीर्तीवरून बबोन्स यांचे हे म्हणणे भारतासाठी सकारात्मक असल्याचे म्हटले जात आहे.

या अहवालात म्हटले आहे की,

अ. ‘हिंदु’ आणि ’इंडिया’ हे शब्द मूळ भाषा संस्कृत भाषेतून आलेले आहेत.

आ. ६ डिसेंबर २०२२ या दिवशी ब्रिटनमील बर्मिंगहॅममध्ये एका ४५ वर्षीय महिलेला शांतपणे प्रार्थना केल्यावरून अटक करण्यात आली होती; परंतु भारतात विविध धर्माचे लोक सार्वजनिक ठिकाणी देवाची पूजा करू शकतात, तेही अनेकदा असे करतांना दिसतात. जर कोणत्याही देशावर धर्माविषयी सामाजिक शत्रुत्व वाढवल्याचा आरोप होत असेल तर तो नास्तिक प्रवृत्तीचा ब्रिटन आहे.

इ. ‘आदरणीय’ प्यू संशोधन केंद्राने भारताला धार्मिक वैमनस्यसाठी ‘जगातील सर्वांत वाईट देश’ म्हणून स्थान दिले आहे. प्यू संशोधन केंद्र काही विशिष्ट हेतूने भारतीय संस्थांवर आक्रमण करत आहे.

ई.  मोठ्या संख्येने भारतीय म्हणतात की, ते त्यांच्या धर्माचे पालन करू शकतात; परंतु प्यू  संशोधन केंद्राचा दावा आहे की, हिंदूबहुल देशातील काही मुसलमानांंमध्ये भेदभावाच्या तक्रारी आहेत. भारताला लक्ष्य करणार्‍यांमध्ये ‘यूएस् स्टेट डिपार्टमेंट ऑफ इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम’, ‘यूएस् सरकार प्रायोजित युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजन फ्रीडम’ आणि संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालय यांचा समावेश आहे.