भारताने पाकिस्तानला गहू पाठवून शेजारधर्म पाळावा ! – रा.स्व. संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल

रा.स्व. संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांचा केंद्र सरकारला सल्ला

डॉ. कृष्ण गोपाल

नवी देहली – भारताने आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला २५-५० लाख टन गहू पाठवून शेजारधर्म पाळावा, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांनी केंद्र सरकारला दिला. चित्रपट निर्माते इक्बाल दुर्रानी यांनी देहलीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी संघाचे ज्येष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार हेही उपस्थित होते.

डॉ. कृष्ण गोपाल पुढे म्हणाले,

१. पाकिस्तानमध्ये गव्हाचे पीठ २५० रुपये किलो झाले आहे. याचे वाईट वाटते. आपण त्यांना पीठ पाठवू शकतो. पाक मागत नाही; परंतु भारत त्याला २५-५० लाख टन गहू देऊ शकतो. ७० वर्षांपूर्वी ते आपल्या समवेतच होते.

२. पाकिस्तान आपल्याशी भांडत रहातो. भारताविरुद्धे ४ युद्धे झाली आहेत. आक्रमण नेहमी पाकिस्तानच करतो. रात्रंदिवस आपला अपमान करतो. तरीही त्याने सुखी रहावे, अशी आमची इच्छा आहे.

३. दोन्ही देशांमधील एवढ्या दुराव्याचा लाभ काय आहे ? त्यांच्या देशात एक कुत्राही उपाशी राहू नये, अशी आमची इच्छा आहे. आपण ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ (सर्व सुखी व्हावेत) मानणारा देश आहोत. पाकिस्तान आपल्याकडे मागत नाही; परंतु भारताने पाकला गहू पाठवावा. भारताच्या भूमीवरील कोणतीही व्यक्ती, मग ती जैन, शीख, वैष्णव, आर्य असो, ती ‘सर्वे भवन्तु सुखिनः’विना अपूर्ण आहे.