‘पंचमहाभूत लोकोत्सवाच्या’ माध्यमातून सर्वांनी पर्यावरणजागृतीसाठी कृतीशील व्हावे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • उत्साही वातावरणात ‘पंचमहाभूत लोकोत्सवास’ प्रारंभ !

  • साधू-संतांची मांदियाळी !

कोल्हापूर, २० फेब्रुवारी (वार्ता.) – आपला देश कृषीप्रधान असून आपण पूर्वापार निसर्गाची पूजा करत आलो आहात. याच्या मुळाशी ‘पर्यावरणरक्षण’ हाच हेतू आहे. शासनाचे प्रयत्नही सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आहेत. यापुढील काळात आपल्याला सेंद्रीय शेती, गोशाळा यांसह प्रत्येक पर्यावरणाच्या हिताच्या उपक्रमांना प्राधान्य द्यावे लागेल. पंचमहाभूत लोकोत्सव प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, शास्त्रज्ञ यांनी पाहिला पाहिजे आणि त्यातून कृतीशील व्हायला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते कणेरी मठ येथे २० फेब्रुवारीपासून चालू झालेल्या पंचमहाभूत लोकोत्सवाच्या उद्घाटनसत्रात बोलत होते. हा लोकत्सव २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

पंचमहाभूत लोकोत्सवात उद्घाटनप्रसंगी उपस्थित विविध मान्यवर

या प्रसंगी प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार महेश शिंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, ‘दैनिक’ पुढारीचे योगेश जाधव, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, तसेच विविध प्रशासकीय अधिकारी, तसेच मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाने नागपूर समृद्धी महामार्गावर ३३ लाख झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक विकासाची व्याप्ती वाढवून ती राज्यव्यापी करावी लागेल.’’

पंचमहाभूत लोकोत्सवात उपस्थित साधू-संत आणि मान्यवर

या प्रसंगी तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘हा उत्सव शासनाने पुरस्कृत केला आहे, असे नाही, तर ‘हे माझे आहे’, या भूमिकेतून जे जे करणे आवश्यक आहे, ते सर्व केले आहे. हा उत्सव काळाची मोठी आवश्यकता आहे.’’

प्रारंभी सर्वांचे स्वागत करतांना सिद्धगिरी कणेरी मठाचे पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, ‘‘समाजातील विविध संस्था, संघटना आणि प्रशासन यांनी मिळून आपले सामूहिक दायित्व म्हणून पंचमहाभूतांच्या मानवी हस्तक्षेपामुळे वाढत चाललेल्या प्रदूषणाला आवर घालण्यासाठी सामूहिकपणे प्रयत्न करावेत. याचसमवेत शालेय आणि महाविद्यालयीन युवकांमध्ये पर्यावरणविषयी जागृती निर्माण होणे आवश्यक आहे. त्याचा प्रारंभ या लोकोत्सवातून होईल. मनुष्य भौतिक प्रगती वेगाने करत असतांना वेड्यांची रुग्णालये वाढणे आणि मानसोपचारतज्ञांची संख्या वाढणे हे चिंताजनक आहे. त्याचे उत्तर या लोकोत्सवाच्या मंथनातून मिळेल.’’

पंचमहाभूत लोकोत्सवात उद्घाटन सत्रात मनोगत व्यक्त करतांना प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी

भारतीय जीवनपद्धतीत संन्यासापेक्षा कोणताही अलंकार मोठा नाही ! – प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी

या प्रसंगी काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, ‘‘मी कोणत्याही प्रकारची निवडणूक या जन्मात तरी लढवणार नाही. भारतीय जीवनपद्धतीत संन्यासापेक्षा कोणताही अलंकार मोठा नाही आणि संन्यास हाच मोठा सन्मान आहे.’’

आपण वेळीच जागृत झालो नाही, तर येणारी पिढी आपल्याला क्षमा करणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यंत्री

या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘आपण वेळीच जागृत झालो नाही, तर येणारी पिढी आपल्याला क्षमा करणार नाही, अशी सध्याची स्थिती आहे. जगातील अनेक संस्कृतींचा र्‍हास झाला; मात्र भारतीय संस्कृती अद्यापही टिकून आहे. भारतीय संस्कृतीत नदीला माता मानले असून आपण पर्यावरणाला ईश्वर मानून कृती केली जाते. जल आणि वायू परिवर्तन ही आपल्यासमोरील गंभीर समस्या बनत असून भारत कर्करोगाची राजधानी होते कि काय ? इतकी वाईट स्थिती आहे. कोल्हापूरच्या पंचगंगेच्या नदीची इतकी वाईट स्थिती आहे की, तिला ‘गंगा’ म्हणावे का ? असे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यापुढील काळात पंचगंगेचे प्रदूषण दूर करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू.

यापुढील काळात आम्ही राज्यात २५ लाख हेक्टर सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणार आहोत. कोळशापासून वीज उत्पादन अल्प करून सोलर ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही शेतीसाठी ८ सहस्र मेगावॅटचा सोलर प्रकल्प सिद्ध करत आहोत. सरकार ज्या ज्या योजना आणते किंवा ज्या ज्या गोष्टींवर प्रबोधन करते, त्यावर सामान्य लोक लगेच कृती करत नाहीत; मात्र जर तुमच्यासारख्या साधू-संन्यासी यांनी सांगितले, तर ते लगेच ऐकून कृतीत आणतात. त्यामुळे हा लोकोत्सव अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.’’

या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी म्हणाले, ‘‘देवभूमी असलेल्या भारतात आपण जन्म घेतला, हे आपणा सर्वांचे भाग्य आहे. पंचमहाभूतांचे रक्षण केल्यास आपले जीवन सुरक्षित राहील. विकासाच्या मार्गावर आपण पुढे-पुढे जात असतांना तुर्कीयेसारखे मोठे भूकंप, अतीवृष्टी, दुष्काळ या समस्यांना आपल्याला का सामोरे जावे लागत आहे ? याचा आपण गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.’

कणेरी मठाचे विश्वस्त श्री. उदय सावंत यांनी अंती आभार व्यक्त केले.

अन्य घडामोडी

१. सकाळच्या सत्रात तंत्र शिक्षणमंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तारांगणाचे उद्घाटन करण्यात आले.
२. कार्यक्रमस्थळी विविध आयुर्वेदिक, सेंद्रीय शेती उत्पादने, पारंपरिक बी-बियाणे, रोपे, तसेच मूल्यशिक्षण, धार्मिक ग्रंथ यांचे प्रदर्शन कक्ष लावण्यात आले.

क्षणचित्रे

१. प्रारंभी कणेरी मठाची व्याप्ती, तसेच त्या माध्यमातून चालू असलेले विविध कार्य यांची माहिती देणारा दृकश्राव्यपट दाखवण्यात आला.
२. उभारण्यात आलेले व्यासपीठ अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होते. येथे पृथ्वी, तेज, आकाश, वायू, जल यांची माहिती देणारे विशेष फलक उभारण्यात आले होते.
३. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या विचारांवर आधारित पत्रकार गुरुबाळ माळी यांनी लिहिलेल्या ‘सुमंगलम विचार संपदा’ या पुस्तकाच्या मराठी आणि कन्नड आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.